दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

रणवीर आणि दीपिका यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रणवीर आणि दीपिका यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

14 आणि 15 नोव्हेंबर, हा शुभमुहूर्त दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवरून जाहीर केला आहे. पण तो कुठे होणार, हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही.

"आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आमच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आम्ही 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 ला विवाहबद्ध होत आहोत. तुम्ही आमच्यावर जे भरभरून प्रेम केलं, त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. प्रेम, मैत्री आणि विश्वासाने भारलेल्या या प्रवासासाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे," असं दीपिका आणि रणवीर यांनी या पत्रिकेत म्हटलं आहे.

या घोषणेच्या काही मिनटात ट्विटरवर #DeepVeer सह त्यांची नावं ट्रेंड होऊ लागली.

त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होतीच. त्यामुळे त्यांनी अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात "नोव्हेंबर महिन्यात बरीच लग्नं आहेत," अशा शब्दांत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.

"तुमच्या कानावर रोज काही ना काही येत आहे. अगदी माझ्या शेरवानीच्या रंगापासून ते बरंच काही. मात्र असं काही झालं तर मी आधी तुम्हाला येऊन सांगेन," असं रणवीर सिंगने काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या हिंदुस्तान टाइम्स लिडरशिप समिटमध्ये सांगितलं होतं.

मात्र आज त्यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. सिनेविश्वातून त्यांच्यासाठी भरभरून शुभेच्छा येत आहेत.

वधू परिचय

भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची कन्या असलेल्या दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी कोपनहेगनमध्ये झाला होता. पण तिचं बालपण बंगळूरूमध्ये गेलं.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ती काही काळ राष्ट्रीय स्तरावर बँडमिंटनही खेळली. मात्र बॅडमिंटनच्या कोर्टवरून ती आधी मॉडेलिंग रँपवर उतरली आणि तिथून तिने चंदेरी दुनियेची वाट धरली.

2006 साली 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 2007 मध्ये आलेल्या 'ओम शांती ओम' या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांनंतर 'लव्ह आज कल', 'लफंगे परिंदे', 'हाऊसफुल्ल', 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', 'पिकू', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या चित्रपटातल्या तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.  

Image copyright YouTube / ErosNow
प्रतिमा मथळा बाजीराव मस्तानी चित्रपटातील एक दृश्य

वर परिचय

रणवीर सिंहचं पूर्ण नाव रणवीर सिंह भवानी आहे. त्याचा जन्म 6 जुलै 1985 ला मुंबईत झाला होता.

ब्लुमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केल्यावर बॉलिवुडमध्ये करिअर करण्यासाठी तो भारतात परतला. यशराज फिल्म्सबरोबर पहिला ब्रेक मिळवत 2010 मध्ये आलेला 'बँड बाजा बारात' रणवीरचा पहिला चित्रपट ठरला. हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यासाठी रणवीरला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल', 'लुटेरा', 'गुंडे' या चित्रपटात तो दिसला. मात्र त्याच्या भूमिका विशेष गाजल्या त्या संजय लीला भंसाली यांच्या 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या सिनेमांमध्ये. विशेष म्हणजे या तीनही चित्रपटात हे दोघे एकत्र होते.

आज दीपिका आणि रणवीर बॉलिवुडमध्ये सगळ्यांत जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)