#MeToo : अनू मलिकने स्वत: इंडियन आयडल सोडलं की त्यांना काढण्यात आलं?

अनू मलिक

'तू मुंबई आ रहा है, तू मुंबई आ रहा है...' हा संगीतकार अनू मलिकचा डायलॉग आता यापुढे इंडियन आयडलमध्ये ऐकायला मिळणार नाही. कारण लैंगिक छळवणुकीचे आरोप लागल्यानंतर मलिक या शोचे जज म्हणून यापुढे दिसणार नाहीत.

#MeToo चळवळीअंतर्गत गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांनी अनू मलिकवर लैंगिक शोषणाचा आरोप लावले आहेत. या आरोपांनंतर सोनी टीव्हीने एक निवेदन जारी करत अनू मलिक यांची इंडियन आयडलच्या ज्युरी पॅनलवरून हकालपट्टी केल्याचं म्हटलं आहे.

सोनी टीव्हीच्या या निवेदनानुसार, "अनू मलिक आता इंडियन आयडलच्या ज्युरी पॅनेल मध्ये नाहीत. शो आधीसारखा सुरू राहील. आम्ही शोमध्ये भारतीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींना जज म्हणून बोलावू. ते लोक विशाल दादलानी आणि नेहा कक्कड यांच्यासोबतीला इंडियन आयडल 10च्या प्रतिभावान स्पर्धकांचं परीक्षण करतील."

PTI या वृत्तसंस्थेनुसार अनू मलिक आपल्या निवेदनात म्हणाले, "मी इंडियन आयडलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. चॅनलनेही याबाबतीत माझ्याशी सहमती दाखवली आहे."

अनू मलिक 2004 पासून या इंडियन आयडलशी निगडित आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

#MeToo या मोहिमेत महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकीचे किस्से, विशेषतः कामाच्या ठिकाणी झालेले किस्से, सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच मोहिमेत गायिका श्वेता पंडितने आपला अनुभव ट्विटरवर शेअर केला होता.

श्वेता लिहितात, "2000 मध्ये मोहब्बतें या चित्रपटाद्वारे माझ्या करिअरची सुरुवात झाली. मी चांगल्या नवीन गाण्यांच्या शोधात होते, जेणेकरून माझ्या यशात सातत्य राहील. मला त्यावेळी अनू मलिक यांच्या मॅनेजरकडून फोन आला होता."

"2001 मध्ये अंधेरीच्या एंपायर स्टुडिओ मध्ये मला बोलावण्यात आलं. सगळ्या गायकांसारखीच मीसुद्धा उत्साहात होते. एका केबिनमध्ये फक्त मी आणि अनू मलिक होतो. अनू मलिक यांनी कोणत्याही वाद्यांशिवाय मला गायला सांगितलं. गाणं ऐकून अनू म्हणाले, 'मी तुला शान आणि सुनिधीबरोबर एक गाणं देईन. मात्र आधी मला एक चुंबन दे'."

फोटो कॅप्शन,

सोना मोहपात्रा

"हे म्हणून अनू हसू लागले. मला आठवतं ते अत्यंत वाईट पद्धतीचं हास्य होतं. मी तेव्हा फक्त 15 वर्षांची होते. शाळेत जात होते. तो क्षण असा होता ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मी या माणसाला अनू अंकल म्हणायचे, ते माझ्या पूर्ण परिवाराला ओळखायचे. त्याक्षणी मला असं वाटलं की कुणीतरी माझ्या पोटात ठोसा मारलाय."

गायिका सोना मोहपात्रा यांनी अनू मलिक यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत -

त्या लिहितात, "ज्या मुली आपले अनुभव सांगत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही एकट्या नाहीत. आणि या इंडस्ट्रीत असे आणखी अनू मलिक आहेत. मी 18-18 तास काम करते. त्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तीविषयी मी ट्वीट करू शकत नाही."

असं म्हणत सोनाने गायक कैलाश खेर यांच्यावरही अनुचित टिप्पणी करत चुकीची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. एकदा त्याने माझ्या मांडीवर हात ठेवत म्हटलं, "तू खूप सुंदर आहे. नशीबवान आहेस की एका संगीतकाराच्या घरी गेलीस, कुण्यास अॅक्टरच्या घरी नाही."

सोना मोहपात्राचा नवरा संगीतकार राम संपथ आहे.

अनू मलिकच्या वकिलांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणांचे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. "अनू मलिक #MeToo मोहिमेचा आदर करतात. मात्र एखाद्याचं चारित्र्यहनन करण्यासाठी या मोहिमेचा वापर करणं चुकीचं आहे," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)