#MeToo : ‘शाब्बास बायांनो! तुम्ही करताय ते बरोबरच आहे’

  • अनघा पाठक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
#MeToo

फोटो स्रोत, AFP

"माझ्या लैंगिक छळाविषयी मी जाहिररीत्या बोलले. त्यानंतर जणू काही माझा आत्मविश्वासच परत आला. मला वाटतं की जर महिलांनी एकत्र येऊन लढा दिला तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो," पत्रकार गझाला वहाब सांगतात.

गझाला त्या 20 महिला पत्रकारांपैकी एक आहेत ज्यांनी पत्रकार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत.

भारतातल्या #MeToo चळवळीला एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर वेगळंच वळण लागलं. या आरोपांवरून राजीनामा देणारे ते सगळ्यात उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. मात्र त्यांनी सगळे आरोप खोडून काढले आहेत.

महिलांनी सोशल मीडियावद्वारे आपल्या लैंगिक छळाची व्यथा मांडली आणि #MeToo चळवळीची सुरूवात झाली. या चळवळीचे पडसाद बराच काळ जाणवत राहातील.

पण आपल्या लैंगिक छळाविषयी जाहीरपणे बोलायच्यानिर्णयापर्यंत या महिला कशा पोहोचल्या? महत्त्वाचं म्हणजे एकदा त्यांचे अनुभव सार्वजनिक झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदललं?

"माझ्या मनातली शंक, हे करावं की न करावं याविषयी होणारी घालमेल एकदम नाहीशी झाली," गझाला सांगतात.

द वायर या वेबसाईटमध्ये पत्रकार असणाऱ्या अनू भुयान यांना वाटतं की जेव्हा त्यांनी स्वतःचे अनुभव सोशल मीडियावर मांडले त्यानंतर अनेक जणींना त्यांचे अनुभव मांडण्याची हिंमत मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images

"माझ्या बाबतीत घडलेला सगळ्यांत मोठा बदल म्हणजे अधिकाधिक महिलांनी माझ्याशी संपर्क केला. काहींनी पाठिंबा दिला तर इतरांनी त्यांचे लैंगिक छळवणुकीचे अनुभव सांगितले. पण पुरूषांनी, मग भले ते माझे नातेवाईक असोत, सहकारी किंवा मित्र, अजिबात संपर्क केला नाही."

बायकांची लढाई लढायला बायकाच एकत्र आल्या हा सगळ्यांत मोठा बदल आहे असं गझालांना वाटतं. एकाच प्रकारचा त्रास सहन केलेल्या स्त्रिया त्यांच्यातल्या एकीला जरी लक्ष्य केलं तरी यापुढे त्याचा एकत्रितरित्या सामना करतील आता. त्या म्हणतात, ही लढाई आता एकटी-दुकटीची नाही तर सगळ्यांची आहे.

मला असा पाठिंबा कधी मिळाला नव्हता

"तू खरं बोलत आहेस, आमचा तुझ्यावर विश्वास आहे अशा मेसेजसचा जणू माझ्यावर पाऊस पडला. इतक्या साऱ्या लोकांनी दिलेला पाठिंबा बघून खरंच मला भरून आलं," द एशियन एज या वृत्तपत्राच्या संपादक सुपर्णा शर्मा सांगतात.

त्यांच्या परिवाराने आणि मित्र-मैत्रिणींनी तर त्यांना पाठिंबा दिलाच आहे, पण त्याबरोबरीनं त्यांना अनोळखी लोकांनीही भरभरून पाठिंबा दिला.

"फेसबुक, ट्विटरवर लोकांनी मला मेसेज पाठवले. इतकंच काय, रस्त्यात चालता चालता थांबवून सांगितलं की तुझं काम चांगलं आहे.

गेल्या शनिवारी मी दिल्लीतल्या खान मार्केट भागात फिरत होते आणि माझ्या आईच्या वयाच्या दोन अनोळखी स्त्रिया माझ्याजवळ आल्या. त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाल्या, 'शाब्बास बायांनो, तुम्ही करताय ते बरोबरच आहे.' मला मनापासून वाटलं की आपली लढाई वाया नाही गेली."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लैंगिक छळवणुकचे आरोप झाल्यानंतर आपलं पद सोडणारे अकबर, सगळ्यांत उच्चपदस्थ असले, तरी एकमेव नाहीत.

NewCorp च्या संस्थापक संपादक शुतापा पॉल यांनाही काहीसा असाच अनुभव आला आहे. "माझ्या आयुष्यात काही बदललं असेल तर सुरूवातीचे काही दिवस माझा फोन सतत वाजत होता, थांबायचं नावच घेत नव्हता. 'आम्ही तुझ्यासोबत आहोत' असं सांगणाऱ्या मेसेजसचा पूर आला होता. पण त्याव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यात काही बदललं नाही."

जेव्हा ती तिच्यावरील अत्याचाऱ्याविरूद्ध बोलते...

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आपण आपल्या लैंगिक छळवणुकीचा अनुभव का सोशल मीडियावर टाकला यावर बोलताना अनु म्हणतात, "मला खरं डॉ ख्रिस्टिन फोर्ड यांनी प्रेरित केलं. त्यावेळेस आताचे सुप्रीम कोर्ट जज ब्रेट कॅव्हनॉ यांच्याविरूद्ध त्यांनी लैंगिक छळवणुकीची केस दाखल केली होती.

मी विचार केला, या बाईने काय काय सहन केलं असेल, पण तरीही तिने अन्यायाविरूद्ध आवाज उठवला, मग मी का करू शकत नाही?"

लैंगिक छळवणुकचे आरोप झाल्यानंतर आपलं पद सोडणारे अकबर, सगळ्यांत उच्चपदस्थ असले, तरी एकमेव नाहीत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या हैद्राबाद आवृत्तीचे संपादक के.आर. श्रीनिवास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, साजिद खान यांनी हाऊसफुल-4 चं दिग्दर्शकपद सोडलं आहे, प्रशांत झा हिंदुस्तान टाइम्सच्या राजकीय संपादक पदावरून पायउतार झाले आहेत, मयांक जैन यांनी बिझनेस स्टँडर्डच्या मुख्य प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे तर कॉमेडियन गुरसिमरन खांबा यांना AIB मधून निलंबित केलं गेलं आहे.

अनु यांचा छळ केला त्या व्यक्तीनंही राजीनामा दिला आहे. "हो, त्या व्यक्तीला शिक्षा झाली नाही. पण त्यातल्या त्यात हे समाधान आहे की आपल्या कृत्याचा परिणाम म्हणून त्याला आपली नोकरी गमवावी लागली.

त्याच्या आधीच्या कंपन्यांनीही जाहीर केलं की ते त्याच्याविरूद्ध झालेल्या तक्रारींची चौकशी करतील. म्हणजे भविष्यात त्याला नोकरी देण्याआधी लोक दहा वेळा विचार करतील. स्त्रिया म्हणजे भोगवस्तू नाहीत हा धडा तो नक्कीच शिकला असेल."

#MeToo ने घडवलेल्या बदलाच्या चर्चा

या महिला पत्रकारांना आम्ही विचारलं की तुम्ही तुमच्या लैंगिक छळवणुकीबाबत सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर त्यांच्या घरचे, मित्र-मैत्रिणी यांच्याशी होणाऱ्या चर्चा बदलल्या का? "नक्कीच," शुतापा म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही अर्थातच #MeToo चळवळीमुळे घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी चर्चा करतो आणि हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की कामाच्या जागा स्त्री-पुरूष दोघांसाठीही अधिकाधिक सुरक्षित कशा बनवाव्यात."

सुपर्णां आणि त्याच्या आसपास असणाऱ्यांच्या चर्चांचेही विषय बदलले आहेत. "आम्ही अनेक विषयांवर, अगदी #MeToo चळवळीवर होणाऱ्या टीकेपासून ते आत्ताच का या महिला आवाज उठवायला लागल्या यावर सध्या बोलत आहोत, चर्चा करत आहोत. आणि अशा चर्चा होणं चांगलंच आहे."

भविष्यातला आशावाद

यातल्या अनेकींच्या पुढ्यात कायद्याची किचकट लढाई वाढून ठेवली आहे. पण सुपर्णांच्या दृष्टीने त्या 20 महिला पत्रकारच नाहीत तर कित्येकींना आपआपली लढाई लढायची आहे.

"जोपर्यंत सत्तेत आणि अधिकारपदांवर असणारे पुरूष महिलांना बरोबरीने आणि आदराने वागवत नाहीत तोवर सोशल मीडियाच कशाला, प्रत्यक्ष आयुष्यात, छोट्या-मोठ्या शहरात या लढाया चालूच राहातील."

फोटो स्रोत, Getty Images

तरीही या महिला आपल्या भविष्याबद्दल आशावादी आहेत.

"वकीलांची फौज सत्याला अंधारात ढकलू शकत नाही. मला खात्री आहे की आम्ही कोर्टात तर जिंकू पण कोर्टाबाहेरही महिलांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होऊ," गझाला नमुद करतात.

भारतातली #MeToo चळवळ कुठे जातेय?

या चळवळीवर केली जाणारी सगळ्यांत मोठी टीका म्हणजे हे सगळं फक्त पुरूषांची नावं घेऊन त्यांना बदनाम करण्यासाठी केलं जातंय.

पण गजाला यांना हा आरोप पटत नाही. "लोक काय म्हणतात याच्याशी खरं मला काही देणं-घेणं नाही. महिलांना आपल्या हक्कांची जाणीव होणं आणि त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरूध्द आवाज उठवणं हे या चळवळीचं फलित."

तरीही त्यांना वाटतं की या चळवळीने अजून ग्रामीण भारतात आपले पाय रोवले नाहीत. ते रोवायला हवेत. "सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती आणि एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असलेली ही चळवळ जेव्हा गावाखेड्यात पोहोचेल आणि तिथल्या महिलांनाही काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळेल अशी मला अशा आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)