अमृतसर रेल्वे अपघातात हरवलेलं बाळ तिला परत मिळालं तेव्हा...

  • रविंदर सिंग रॉबिन
  • बीबीसी पंजाबीसाठी
बाळ आणि आई

फोटो स्रोत, Ravinder singh robin/bbc

राधिकाच्या मांडीवर जेव्हा तिचं 10 महिन्यांचं बाळ होतं, तेव्हा तिला तर विश्वासच बसत नव्हता. तिचे डोळे आसवांनी भरून आले होते. बाळाला पाहून सर्व दुःख आणि कटू आठवणी ती क्षणात विसरली.

19 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी अमृतसर येथे झालेल्या दुर्घटनेत राधिका जखमी झाली आणि बेशुद्ध पडली आणि तिचा 10 महिन्यांचा मुलगा विशाल हरवला.

राधिकाला अमनदीप रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला हे देखील माहीत नव्हतं की तिचं बाळ या जगात आहे की नाही. जेव्हा राधिकाला जाग आली तेव्हा आपलं बाळ हरवलंय, याची तिला जाणीव झाली. जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा बाळ हरवल्याचं दुःख तिला अधिक जाणवू लागलं.

आता ती काय करणार?

दोन बहिणींची मुलं हरवली होती

राधिका तिची बहीण प्रीती आणि तिच्या कुटुंबीयासोबत रावण दहन पाहायला गेली होती. तेव्हा अचानक रेल्वे आली आणि रावणदहन पाहत रुळावर उभ्या असलेल्या पन्नासएक लोकांना चिरडून पुढे निघून गेली. त्या दुर्घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला होता.

सुदैवाने राधिका वाचली, पण ती जखमी झाली. राधिका आणि प्रितीची ताटातूट झाली. प्रीतीचं साडेतीन वर्षाचं मूलसुद्धा हरवलं होतं.

दुर्घटनेनंतर प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे. जखमींची देखभाल करणं, त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फाईल तयार करणं ही कामं प्रशासनातील अधिकारी करत आहेत. याच वेळी प्रशासनातील District Legal Services Authority (DLSA) नावाचा एक विभाग ताटातूट झालेल्या नातेवाईकांना एकत्र आणण्याचं काम करत आहे.

फोटो स्रोत, Ravinder singh/ robin

फोटो कॅप्शन,

DLSA च्या अधिकारी हरप्रीत जीवन कौर बाळाची देखभाल करताना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

चीफ ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेट आणि DLSA सचिव सुमित मक्कर यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी या केंद्राची स्थापना पंजाब स्टेट लीगल सर्व्हिस अॅथॉरिटीच्या सदस्य सचिव हरप्रीत कौर जीवन यांच्या मदतीने गुरू नानक देव रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयात केली होती.

जेव्हा DLSAची टीम गुरू नानक रुग्णालयात गेली, तेव्हा तिथं त्यांची भेट प्रीती नावाच्या एका महिलेशी झाली. ती जखमी होती आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा आरूष हरवला होता.

तिनं सांगितलेल्या वर्णनाच्या मुलाचा ही टीम शोध घेत होती. त्या वर्णनाशी साधर्म्य असणारा मुलगा त्यांना अमनदीप रुग्णालयात दिसला. विचारपूस केल्यावर कळलं की त्या मुलाचे आई-वडील दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत आणि त्या मुलाला उत्तर प्रदेशला घेऊन जाणार आहेत. आणखी विचारपूस केली असता कळलं की त्या मुलाच्या आईचं नाव प्रीती आहे.

मग DLSA टीमनं त्या मुलाचा फोटो काढला आणि इतर 6 फोटो प्रीतीला दाखवण्यात आले. यापैकी तुझा मुलगा शोध असं तिला म्हटलं गेलं. तिनं योग्य मुलगा ओळखल्यानंतर त्यांनी आरूषला तिच्या हवाली केलं.

आपली राधिका नावाची एक बहीण आहे आणि ती कुठे आहे, याचा आपण शोध घेत असल्याची माहिती तिनं DLSA टीमला दिली.

विशाल कसा मिळाला?

ही टीम जेव्हा सरकारी रुग्णालयाच्या पाहणीवर होती तेव्हा त्यांना 10 महिन्यांचं एका बाळ सापडलं आहे हे कळलं. त्याच्याबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर कळलं की त्याचे आई-वडील दुर्घटनेत गेले.

मीना देवी नावाच्या एका महिलेला ते बाळ रेल्वे ट्रॅकवर मिळालं आणि तीच त्याला सांभाळत होती. तिला विचारल्यानंतर तिनं ते कसं मिळालं हे सांगितलं. ते बाळ मीनादेवीनं DLSAच्या हवाली केलं.

राधिका नावाच्या एका महिलेचं बाळ हरवलं आहे, असं तिची बहीण प्रीतीकडून समजलं होतं. तिच्या वर्णनावरून हे 10 महिन्यांचं बाळ राधिकाचं असावं असा अंदाज DLSAला आला. त्यांनी त्या बाळाचे फोटो काढले. आणि राधिकाला इतर बाळाच्या काही फोटोंसह ते दाखवले. राधिकानं आपलं बाळ ओळखलं. तिच्या हवाली ते बाळ करण्यात आलं.

अशा प्रकारे दोन्ही बहिणींची मुलं वेगवेगळ्या रुग्णालयात मिळाली. दुर्घटनेनंतर बहिणींची अद्याप भेट झालेली नाही.

काय घडलं होतं?

अमृतसर रेल्वे स्टेशनपासून किमी दूर असलेल्या जोडा फाटक जवळ धोबीघाट मैदानावर दसऱ्यानिमित्त रावण दहनाचं आयोजन केलं होतं. हे पाहण्यासाठी सात हजार लोक जमा झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images

त्या मैदानाची क्षमता कमी असल्यामुळे अनेक जण रेल्वे ट्रॅकवर उभं राहून हा कार्यक्रम पाहात होते. फटाक्यांचा आवाज झाल्यामुळे ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही आणि ट्रॅकवर उभे असलेले अनेक लोक रेल्वेखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत किमान 59 जण दगावल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

या दुर्घटनेचं सविस्तर वार्तांकन वाचा इथे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)