CBI विरुद्ध CBI : अंतर्गत धुसफूस अशी आली चव्हाट्यावर

सीबीआय Image copyright CBI

CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो ही भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणारी देशातली सगळ्यांत प्रमुख संस्था. CBI म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं राजकीय खेळणं, अशी या संस्थेविषयी जनमानसात प्रतिमा राहिली आहे.

सुप्रीम कोर्टानेसुद्धा एकदा या संस्थेच्या 'येस मॅन' कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब करत त्यांना 'पोपट' म्हटलं होतं. दुर्दैवाने CBI आज एक राजकीय शस्त्र म्हणून नाही तर आपल्या घरातले वाद चव्हाट्यावर आल्यामुळे चर्चेत आहे.

CBIचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला आहे की नरेंद्र मोदी सरकारसुद्धा गोंधळलं आहे.

CBIने आपल्याच संस्थेत धाडसत्र सुरू केलं. सोमवारी उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना तपासाच्या कागदपत्रांत हेराफेरी करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. ही हेराफेरी CBIचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या लाच प्रकरणात केल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या हवाल्याने असं सांगितलं जात आहे की, रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी CBI संचालक आलोक वर्मा यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणासंदर्भात चर्चा केली. याबरोबरच पंतप्रधानांनी रविवारीच संध्याकाळी गुप्तचर विभाग RAWचे प्रमुख अनिल धसमाना यांचीही स्वतंत्र भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

अस्थाना लाचप्रकरणात रॉचे विशेष सचिव सामंत कुमार गोयल यांच्या विरोधातसुद्धा FIR दाखल झाली आहे. पण ते या खटल्यात अद्याप आरोपी नाहीत.

हे प्रकरण समजून घेण्यासाठी आधी यात गोवलेल्या मुख्य पात्रांची ओळख होणं महत्त्वाचं आहे -

CBIचे वादात सापडलेले दोन अधिकारी कोण?

आलोक वर्मा CBIचे संचालक आहेत तर राकेश अस्थाना क्रमांक दोनचे अधिकारी आहेत. सध्या सुरू असलेला वाद सोडला तर दोघांच्याही कारकिर्दीवर कोणताही कलंक नाही.

वर्मा त्यांच्या बॅचमध्ये सगळ्यात कमी वयाचे अधिकारी होते. ते 22 वर्षांचे असतानाच IPS मध्ये दाखल झाले. वर्मा याआधी दिल्लीचे पोलीस आयुक्त, दिल्लीच्या तिहार तुरुंगाचे महानिरीक्षक, मिझोरमचे पोलीस महासंचालक, पुदुचेरीचे पोलीस आयुक्त आणि अंदमान-निकोबारचे पोलीस महानिरीक्षक होते.

CBIचा कोणताच अनुभव गाठीशी नसणारे ते पहिलेच संचालक आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राकेश अस्थाना हे गुजरात केडरचे असल्यामुळे मोदींसाठी नवीन नाहीत. उजवीकडे CBI संचालक आलोक वर्मा.

राकेश अस्थाना हे 1984च्या बॅचचे गुजरात कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्त्वांच्या खटल्यांचा तपास केला आहे, ज्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याचाही समावेश आहे.

त्याबरोबर 2002 साली झालेल्या गोध्रा ट्रेन जाळपोळीची चौकशीही त्यांनीच केली होती. म्हणजे आजचे पंतप्रधान मोदींसाठी राकेश अस्थाना हे नाव काही नवीन नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी अस्थानांवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.

सना सतीश बाबू कोण आहे?

सना सतीश बाबू यांचं वडिलोपार्जित घर आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे आहे. ते काही काळ राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी होते. नोकरी सोडल्यानंतर ते हैदराबादला गेले. त्यानंतर तिथे TDP, काँग्रेस-YSRच्या नेत्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित केले.

सना सतीश बाबू यांचं नाव पहिल्यांदा 2015मध्ये सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीत समोर आलं. हे प्रकरण मांस निर्यात करणाऱ्या मोईन कुरेशी यांच्याशी निगडित होतं.

2017मध्ये सना यांनी या प्रकरणात मोईन कुरेशी यांच्यातर्फे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय यांच्यासमोर आलं होतं.

सना सतीश बाबू यांनी रसमा इस्टेट LLP, गोल्डकोस्ट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, मॅट्रिक्स नॅचरल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, ईस्ट गोदावरी ब्रूव्हरीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून काम पाहिलं आहे.

मोईन कुरेशी कोण आहे?

CBIच्या दोन संचालकांमध्ये उद्भवलेल्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत मांस निर्यात व्यापारी मोईन कुरेशी.

मोईन कुरेशी यांचं संपूर्ण नाव मोईन अख्तर कुरेशी आहे. कुरेशी देहरादूनच्या डूनस्कुल आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिकलेले आहेत.

मोईन यांनी 1993मध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका छोट्या कत्तलखान्यापासून मांस व्यापार सुरू केला.

पुढच्या काही काळात कुरेशी भारताचे सगळ्यांत मोठे मांस व्यापारी झाले. पुढे जाऊन त्यांनी आपल्या कारभाराचा विस्तार केला आणि 25 वेगवेगळ्या कंपन्या उघडल्या. त्यात एक बांधकाम कंपनी आणि एक फॅशन कंपनीचा समावेश आहे.

कुरेशी यांचे CBIचे माजी संचालक ए. पी. सिंह आणि रणजीत सिन्हा यांच्याशी लागेबंधे असल्याचंही बोललं जातं. कुरेशी यांच्यावर इन्कम टॅक्स न भरण्याचा आरोप आहे. त्यांनी परदेशात 200 कोटी रुपये लपवून ठेवले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, ज्याची चौकशी सक्तवसुली संचलनालय करत आहे.

2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आरोप लावला होता की कुरेशी यांची तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी जवळीक असल्यामुळे त्यांची चौकशी होत नाही.

संपूर्ण प्रकरण काय?

राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक मोईन कुरेशी प्रकरणाची चौकशी करत होतं. याच विशेष चौकशी पथकाचे तपास अधिकारी होते देवेंद्र कुमार.

सूत्रांच्या हवाल्याने छापून आलेल्या काही बातम्यांनुसार देवेंद्र कुमार यांना तपासाशी निगडित कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर CBIच्या मुख्यालयात देवेंद्र कुमार यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली आणि सोमवारी दुपारनंतर दोन वाजता त्यांना अटक झाली.

याप्रकरणी CBIने मंगळवारी दाखल केलेल्या FIR मध्ये देवेंद्र कुमार संशयित क्रमांक दोन आहेत तर विशेष संचालक अस्थाना संशयित क्रमांक एक आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना (उभे)

सना सतीश बाबू हे मोईन कुरेशीच्या खटल्यात एक साक्षीदार आहेत. त्यांनी असा आरोप लावला आहे की या प्रकरणाची चौकशी करत असलेले अस्थाना यांनी त्यांच्या विरोधातील CBIच्या विशेष चौकशी पथकाच्या चौकशी थांबवण्यासाठी लाच घेतली होती.

आता कुमार यांच्यावर आरोप आहे की त्यांनी सना यांची एक काल्पनिक साक्ष सादर केली, ज्यामुळे या प्रकरणात राकेश अस्थाना यांनी CBIचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर लावलेल्या आरोपांना बळकटी आली असती.

इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने हेही सांगितलंय की सना यांची काल्पनिक साक्ष भारतीय गुन्हे संहिताच्या कलम 161 नुसार तयार करण्यात आली होती. ही साक्ष 26 सप्टेंबर रोजी नोंदवण्यात आली, असंही सांगण्यात आलं आहे.

उपस्थित झालेले प्रश्न

कुमार यांनी दाखल केलेल्या या काल्पनिक साक्षीत सना यांनी विशेष तपास पथकाला सांगितलं होतं की तेलुगू देसम पार्टीचे खासदार C. M. रमेश आणि CBI संचालक आलोक वर्मा यांच्या झालेल्या चर्चेनंतर त्याच्याविरुद्धची केस बंद करण्यात आली आहे.

पण ती साक्ष कशी खोटी निघाली, हे CBIचे प्रवक्ते अखिलेश दयाल यांनी आपल्या निवेदनात सांगितलं, "कलम 161 नुसार मोईन कुरेशी खटल्यातील सना सतीश बाबू यांची साक्ष नोंदवली आहे. ती दिल्लीत 26 सप्टेंबरला नोंदवली गेली आहे, असं सांगितलं आहे. चौकशीत असं लक्षात आलंय की सतीश बाबू त्या दिवशी दिल्लीत नव्हते. ते हैदराबाद मध्ये होते. सना 1 ऑक्टोबरला चौकशी प्रक्रियेत सहभागी झाले होते."

नोंद झालेली साक्ष प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे आणि या काल्पनिक साक्षीवर चौकशी अधिकारी म्हणून देवेंद्र कुमार यांची स्वाक्षरी आहे.

या साक्षीत सना सतीश बाबू यांना प्रश्न विचारला गेला आहे की त्यांच्याविरुद्ध जर चौकशी पूर्ण झाली होती तरी त्यांची पुन्हा चौकशी का करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर देताना सना म्हणाले, "जून 2018 मध्ये मी माझे मित्र आणि तेलुगू देसम पार्टीचे राज्यसभा खासदार C. M. रमेश यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. ते संबंधित संचालकाशी चर्चा करतील, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मी त्यांची नियमितपणे भेट घेत होतो."

Image copyright PTI

"एक दिवस रमेश म्हणाले की त्यांनी या खटल्यासंदर्भात CBI संचालकांशी चर्चा केली आणि CBI आता मला पुन्हा बोलावणार नाही. जूननंतर मला CBIने बोलावलं नाही. त्यामुळे मी आश्वस्त होतो की माझी चौकशी आता पूर्ण झाली आहे," असं सना यांनी या साक्षीत सांगितल्याची नोंद आहे.

याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना C.M. रमेश म्हणाले, "आतापर्यंत आयुष्यात CBIच्या एकाही अधिकाऱ्याशी माझी भेट झालेली नाही. या सगळ्या काल्पनिक कथा आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा कट आहे. आता आमचा पक्ष NDAमध्ये नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता तर CBIचं म्हणणं आहे की सतीश बाबूची साक्ष काल्पनिक आहे."

19 ऑक्टोबरला अस्थाना यांनी केंद्रीय दक्षता आयुक्तांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी आरोप लावला की, "सना यांनी रमेश यांच्याशी संपर्क साधला होता आणि रमेश यांनी आलोक वर्मा यांची खासगी भेट घेतली होती. सना यांना पुन्हा CBI मध्ये बोलावलं जाणार नाही, असं आश्वासनही या भेटीदरम्यान देण्यात आलं होतं."

लाच किती आणि कशी घेतली?

आता FIR मध्ये दुबईतील व्यापारी मनोज प्रसाद यांचं नाव समोर आलं, तेव्हा अस्थाना यांचं पत्र समोर आलं. मनोज प्रसाद यांच्यावर सना यांच्याकडून अस्थाना यांच्यासाठी लाचेच्या रकमेची व्यवस्था करण्याचा आरोप आहे.

मनोज यांना मंगळवारी सकाळी दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आणि त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे.

Image copyright Getty Images

अस्थाना आणि कुमार यांच्याशिवाय CBIच्या FIR क्रमांक 13A/2018 मध्ये मनोज प्रसाद आणि सोमेश्वर प्रसाद यांचंही संशयित म्हणून नाव आहे. या FIRमध्ये डिसेंबर 2017 ते ऑक्टोबर 2018 या काळात लाच देण्यात आल्याचं नमूद आहे.

सना यांचं म्हणणं आहे की किमान पाच वेळा लाच देण्यात आली. 10 डिसेंबर 2017 ला एक कोटींची लाच संयुक्त अरब अमिरातीचं चलन दिरहममध्ये दुबईत दिली गेली. त्यानंतर तीन दिवसांनी दिल्लीत 1.95 कोटींची रक्कम पोहोचती केली गेली तर 10 ऑक्टोबरला 25 लाखांची लाच दिली.

CBIच्या चौकशीतून असं समोर येत आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 या काळात सनाच्या विरोधात चार वेळा समन्स पाठवला होता. असाही एक आरोप होतोय की देण्यात आलेल्या पाच कोटींच्या लाचेपैकी 2.95 कोटी मिळाल्यानंतर सना यांच्याविरोधातच समन्स पाठवणं बंद केलं.

सना जेव्हा फेब्रुवारीमध्ये मनोज प्रसाद यांना भेटायला दुबईला पोहोचले, तेव्हा समन्स पुन्हा एकदा थांबवण्यात आले. असं म्हणतात की समन्स एक दिवस आधी जारी केला होता. त्यानंतर सना यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आणि त्यांच्यावर परदेशी जाण्यावर बंदी घालण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)