रात्री 8 ते 10 मध्येच फटाके फोडा, 'पण जे इतर वेळी फोडतात त्यांचं काय?' - सोशल

फटाके Image copyright Getty Images

फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदीची याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फटाक्यांसदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या काळात रात्री 8 ते 10 याच वेळात फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर ख्रिस्मस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 11.55 ते 12.30 या काळात फटाके फोडता येतील, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

पण इतर वेळी फटाके फोडणाऱ्यांविषयी काय, असा प्रश्न आता अनेक वाचकांना पडला आहे. बीबीसी मराठीने आज होऊ द्या चर्चामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविषयी वाचकांची मतं विचारली होती. त्यातील काही निवडक आणि संपादित मतं इथं देत आहोत.

बाबा आकाडे म्हणतात, "फटाक्यावर कायमची बंदी यायला हवी. गाडीतील पेट्रोल संपले आणि बाटलीत अर्धा लिटर पेट्रोल मागितले तर ते देत नाहीत, कारण तो ज्वलनशील आहे. मग फटाके तरी का द्यावेत? त्यावर सरसकट बंदीच असायला हवी."

अमोल सपकाळे यांच्या मते, "सुप्रीम कोर्टाने मागील काळात बरेच जनहिताचे निर्णय दिलेले आहेत. पण भारतीय लोक त्या निर्णयाचं कितपत पालन करतील, याबद्दल मनात शंका आहे. जे सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय मानत नसतील त्यांच्यावर कारवाई होईल का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे."

फटाक्यांपासून फायदे तर काही नाहीत, पण नुकसान जास्त आहे, असं सरला गायकवाड म्हणतात.

राहुल पाटकर म्हणतात, "चार दिवसाच्या फटाक्याच्या धुरावरून एवढं स्तोम माजवलं जातं. पण बारा महिने देवनार, कांजुरमार्ग, मुलुंड डंपिंग ग्राउंड जळताना हे लोक मूग गिळून गप्प का? हवेच्या प्रदूषणावर एकच उपाय, मुंबईचं वनक्षेत्र वाढवा आणि खारफुटीची कत्तल थांबवा."

सचिन सातपुते यांच्या मते, "फक्त हिंदू सणांनाच नाही तर सर्वांना सारखे नियम असले पाहिजेत. राहीला प्रश्न फटाके फोडण्याचा, जेवढे फटाके फोडाल तेवढी झाडं पण लावायची सक्ती करा."

अस्मिता पाटील म्हणतात, दिव्यांची दिवाळी असते, फटाक्यांची नाही. फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणावी.

विद्या मोहिते यांच्यामते, फटाक्यांना कायमची बंदी हवी. "फक्त दिवाळी नाही तर एरव्हीसुध्दा मिरवणूक किंवा लग्न समारंभातही रात्रीपर्यंत फटाके फोडले जातात. मुकी जनावरं, वयस्क, आजारी यांचा विचार करा."

सचिन आग्रे यांच्या मते हा एकदम बरोबर निर्णय आहे. ते म्हणतात, "पण खरंच जर प्रदूषण कमी करायचं असेल तर सर्व खासगी वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. कारखान्यातील सांडपाणी नदीमध्ये प्रक्रिया केल्यानंतरच सोडावे. त्यामुळे रोज होणारं प्रदूषण कमी होईल. अशा कामांसाठी कुणी गेलं नाही का न्यायालयात अजून? की फक्त सणांना टार्गेट करायचं?"

दिलीप खिवसरा म्हणतात, "आठ ते दहा याव्यतिरिक्त फटाके फोडले तर कारवाई कशी आणि कुणी करायची? मंत्र्यांचे स्वागत कार्यकर्ते फटाके फोडून करत असतील तर कारवाई मंत्र्यावर करायची का की कार्यकर्त्यांवर करायची? हे सगळे प्रश्न आहेत."

"पर्यावरणाचे महत्त्व न समजलेल्या काही व्यक्तींना आवडणार नाही," असं भागवत निंबाळकर यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)