CBI विरुद्ध CBI : कत्तलखान्यांचा मालक मोईन कुरेशीचं CBI कनेक्शन

सीबीआय, दिल्ली Image copyright Getty Images

2014मध्ये रणजीत सिन्हा यांच्या घरची डायरी जनतेसमोर आली. CBI संचालक आणि मोईन कुरेशी हे सव्वा वर्षात एकमेकांना 70 वेळा भेटल्याचं स्पष्ट झालं.

2017मध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोईन कुरेशी यांच्याविरुद्ध FIR दाखल केली, ज्यात CBIचे माजी संचालक A.P. सिंह यांच्या नावाचाही उल्लेख होता.

तूर्तास CBI अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे मात्र याप्रकरणाचं कनेक्शन मोईन कुरेशी यांच्याशी जोडलेलं आहे.

मोईन कुरेशी आहेत तरी कोण?

डेहराडूनस्थित प्रसिद्ध डून स्कूल तसंच दिल्लीतील प्रसिद्ध स्टीफन्स कॉलेजमधून मोईन यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे असलेले मोईन अनेक वर्षांपासून दिल्लीत सक्रिय आहेत.

मात्र 2014मध्ये एका वेगळ्याच कारणासाठी ते चर्चेत आले. आयकर विभागाने मोईन यांच्या छत्तरपूर आणि रामपूर येथील घरी तसंच अन्य मालमत्तांवर छापे टाकले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोईन कुरेशी

या ठिकाणांहून आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली, अशी त्यावेळी चर्चा होती. त्याचवेळी कुरेशी आणि अन्य काही महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच्या संभाषणांच्या टेप्सही ताब्यात घेण्यात आल्या. मांस निर्यातदार आणि कथित हवाला ऑपरेटर यांनीच या टेप्सचं रेकॉर्डिंग केलं असावं.

निवडणुका ऐन भरात आल्या होत्या. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅलीवेळी कुरेशी यांचा उल्लेख 10 जनपथशी जवळीक असलेला नेता असा केला होता. मांस निर्यातदार कंपनी आणि हवाला यांचाही संदर्भ देण्यात आला होता.

अशा प्रकारे फास आवळण्यात आला?

धोरण लकवा अर्थात पॉलिसी पॅरालिसीस आणि घोटाळ्यांचे आरोप झेलणाऱ्या युपीए2 सरकारला एका विदेशी गुप्तचर संघटनेनं महत्त्वपूर्ण माहिती दिली. दुबईहून एका विदेशी बँकेत कोट्यवधी रुपये वळते करण्यात येत असल्याची वार्ता तत्कालीन केंद्र सरकारला देण्यात आली. पैसे पाठवणारी व्यक्ती भारतीय आहे, याचीही कल्पना देण्यात आली.

अकबरपूरच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये मोदी म्हणाले होते, 'टीव्ही चॅनेलने म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारचे चार मंत्री या हवाला रॅकेटध्ये मांस निर्यातदार कंपनीशी संलग्न आहेत.'

मोदींच्या भाषणात काही गोष्टींचा उल्लेख नव्हता. छाप्याआधी झालेल्या तपासणीत काही गोष्टी उघड झाल्या होत्या. सीबीआयचे अनेक मोठे अधिकारी तसंच कॉर्पोरेट विश्वातली अनेक माणसं मोईन कुरेशी यांच्या संपर्कात आहेत.

मोईन कुरेशी यांनी नव्वदीच्या दशकात उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये एका कत्तलखान्यापासून सुरुवात केली. कुरेशी यांनी अगदी अल्पावधीतच दिल्लीच्या सत्ताकेंद्रं आणि नोकरशहा वर्गात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर सुरू झालं देवघेवीची आणि फिक्सिंगचा गोरखधंदा.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि सीबीआयचे संचालक आलोक वर्मा

काही वर्षात कुरेशी यांचं नाव देशातल्या सगळ्यात बड्या मांस निर्यातदारांमध्ये घेतलं जाऊ लागलं. कुरेशी यांनी 25 विविध कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये एक बांधकाम तसंच फॅशनविश्वाशी संबंधित होती.

तूर्तास कुरेशी यांच्या विरोधात हवाला आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार कुरेशी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांचंही नाव आहे.

सक्तवसुली संचालनालयाने आयकर विभागाकडून कुरेशी यांचे ब्लॅकबेरी मेसेज मिळवले. कुरेशी यांनी वेगवेगळ्या व्यक्तींकडून काम करवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते, असं यातून दिसतं.

विदेशात जवळपास 200 कोटी रुपये कथित पद्धतीने लपवून ठेवल्याप्रकरणीही कुरेशी यांची चौकशी सुरू आहे. देशातल्या बड्या कर चुकवणाऱ्या व्यक्तींमध्ये कुरेशींचं नाव आहे.

सीबीआयवर संक्रांत

देशातली सगळ्यात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये आरोपांची चिखलफेक सुरू आहे. संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातला बेबनाव आता न्यायालयात पोहोचला आहे. हे सगळं प्रकरण मोईन कुरेशी यांच्याशीच निगडित आहे.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा सीबीआय

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सीबीआयने आपल्याच विशेष संचालकाविरोधात एफआयआर दाखल केलं आहे. हैदराबादस्थित सतीश बाबू सना यांच्या तक्रारीनंतर कट रचणं आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून अस्थाना यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याविरोधात अस्थाना यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र न्यायालयाने तपास रोखण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात सीबीआयने स्वतःचेच उपाधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक केली आहे. विशेष न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोईन कुरेशी यांच्याशी असलेल्या संबंधावरूनच सतीश बाबू यांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीबीआयचे स्पेशल संचालक राकेश अस्थाना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीबीआय संचालक आलोक वर्मा

स्वत:विरुद्धचा तपास रोखण्यासाठी सतीश बाबू यांनी तीन कोटींची लाच दिल्याचा दावा त्यांनी केला.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वर्मा यांनी सतीश बाबू सना यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी कॅबिनेट सेक्रेटरींना पाठवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

सीबीआयचा कारभार कार्मिक विभागाच्या अंतर्गत चालतो. पंतप्रधानांकडे या मंत्रालयाचा कारभार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सीबीआय संचालक आपल्या घरी बोलावून घेतलं.

दरम्यान मोदी चौकशीत बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. "पंतप्रधान मोदी यांनी सीबीआय तसंच रॉ संघटनेच्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतलं. सीबीआय आणि रॉ अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेला तपास हस्तक्षेप करण्याचा मोदी यांचा प्रयत्न नाही का? पंतप्रधानांनी त्यांना काय म्हणाले, त्यांनी काय आदेश दिला?" असा सवाल सुरजेवाला यांनी केला.

विरोधाभास असा आहे की मोईन कुरेशी हे सोनिया गांधींचे निकटवर्तीय आहेत असा आरोप 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. निकटवर्तीय असल्यामुळेच आयकर विभाग त्यांच्याविरुद्ध कारवाई करत नसल्याची टीका मोदी यांनी त्यावेळी केली होती.

त्या भाषणानंतर अवघ्या चार वर्षानंतर मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अस्थाना मोईन यांच्यावर कुरेशी यांच्याशी निगडित एकाप्रकरणी लाच घेतल्यासंदर्भात आरोपांसाठी खटला दाखल करण्यात आला आहे.

मांस व्यापाराला नवा आयाम

कुरेशी यांच्याशी संबंधित लोक त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या वादावर बोलू इच्छित नाहीत. पण हे लोक सांगतात की कुरेशी यांनी मांस-निर्यात व्यापाराला नवा आयाम दिला.

मेरठमधील मांस व्यापारी आणि निर्यातदार युसूफ कुरेशी सांगतात, "पूर्वी कत्तलखान्यात जनावर कापल्यानंतर आतडं, खूर, वशिंड असे भाग टाकून दिले जात होते. मोईन यांनी यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. देशात हे काम करणारे ते एकमेव व्यक्ती होते. प्रक्रिया केल्यानंतर याची चीन, जर्मनी आणि इतर देशांत निर्यात करत. यातून त्यांनी करोडो रुपये मिळवले."

त्यांच्यामुळे मांस व्यापारातील लोकांना नवी दिशा मिळाली.

मोईन कुरेशी यांचा वादांशी संबंध यायला सुरुवात 2014पासून झाली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोईन कुरेशी

काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीच्या लग्नात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार कुरेशी यांची मुलगी परनिया हिचं लग्न अमेरिकेतील बँक अधिकारी अर्जुन प्रसाद यांच्याशी झालं. या लग्नात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता.

बातमीत असंही म्हटलं आहे की एका नाईट क्लबची सुरुवात करताना अर्जुन प्रसाद आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यात वादावादी झाली होती. नंतर हे लग्न मोडलं.

परिनिया कुरेशी यांनी बॉलिवुड अभिनेत्री सोनम कपूरचा चित्रपट आयेशासाठी वेशभूषा निर्मिती केली होती. तसेच जानिसार या सिनेमात परनियाची महत्त्वाची भूमिका होती.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा सीबीआयची टीम

रामपूरचे पत्रकार शारिक कमाल खान सांगतात, "कोठी मुंशी मशीद हा परिसर मोईन कुरेशी यांचे वडील मुंशी मजीद कुरेशी यांच्या नावाने ओळखला जातो."

मुंशी मजीद यांना ओळखणारे जुने लोक सांगतात त्यांनी आफूच्या व्यापारात पैसा मिळवला आणि नंतर तो इतर व्यवसायांत वळवला.

बरेली, मुराबाद, रामपूर अशा भागांत त्या काळी आफूचा व्यापार मोठ्या प्रमाणावर पसरला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)