CBI वाद : राहुल गांधी म्हणतात, काँग्रेस पक्ष देशाच्या चौकीदाराला चोरी करू देणार नाही

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

काँग्रेसने राहुला गांधी यांच्या नेतृत्वाखाली CBI कार्यालयावर मोर्चा काढला.

सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले CBIचे संचालक आलोक वर्मा यांच्या प्रकरणात केंद्रीय दक्षता आयोगाला चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे. ही चौकशी 2 आठवड्यांत पूर्ण होणार असून त्यानंतर यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीतील CBIच्या कार्यालयावर मोर्चा काढला. दयाल सिंग कॉलेज ते CBI कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

दिल्ली मुख्यालयाच्या बाहेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलन केलं आणि नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही CBI वर नव्हे तर पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आंदोलन करत आहोत. काँग्रेस पक्ष देशाच्या चौकीदाराला चोरी करू देणार नाही."

दरम्यान, सुप्रीम कोर्टात केंद्रीय दक्षता आयोगाच्या वकिलांनी हंगामी संचालक म्हणून नेमण्यात आलेले नागेश्वर राव कोणताही निर्णय घेणार नाहीत, अशी माहिती न्यायालयात दिली आहे.

नागेश्वर राव यांनी फक्त दैनंदिन कामकाज पाहायचं आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. चौकशीचा अहवाल बंद पाकिटात सुप्रीम कोर्टात सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर केंद्र सरकारने दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या विरोधात वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. एम. जोसेफ यांचं पीठासमोर सुनावणी झाली. हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असून त्यात कोणतीही दिरंगाई नको, असं सरन्यायाधीश म्हणाले.

केंद्र सरकारच्या बाजूने अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल, CBI संचालक आलोक वर्मा यांच्या वतीने फाली एस. नरीमन आणि CBIचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.

दुसरी याचिका प्रशांत भूषण यांचा NGO कॉमन कॉजने दाखल केली आहे. राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावं असं याचिकेत म्हटलं आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापना करावी, अशी मागणी केली. नागेश्वर राव यांनी घेतलेले सर्व निर्णय बंद पाकिटात न्यायालयात सादर करावेत अशी मागणी भूषण यांनी केली.

दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते मल्किार्जुन खारगे यांनी वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं बेकायदेशीर आहे, असं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

फोटो कॅप्शन,

CBIच्या कार्यालयावर काँग्रेस पक्षाने मोर्चा काढला

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते असे मुद्दे उचलत आहे, अशी टीका केली आहे.

तर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हणाले की, "सध्याचा वाद हा व्यवस्थेसाठी सकारात्मक आहे. सरकारला कोणाही व्यक्तीमध्ये रस नाही."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)