ब्राम्हण देशाचं नेतृत्व करतील, या वक्तव्यावर चर्चा: 'जातीवाद सोडा, देश प्रगती करेल'

मेधा कुलकर्णी
फोटो कॅप्शन,

मेधा कुलकर्णी

भविष्यातही ब्राह्मण समाज देशाचं नेतृत्व करत राहील, असं वक्तव्य भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली. पुण्यातील 'ब्रह्मोद्योग' नावाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीनं होऊ द्या चर्चामध्ये वाचकांची मतं विचारली होती.

एक देश असून पण इथे एकच भाषेचा वापर करणं देखील शक्य होत नाही. तर मग एकच समाज देशाचं नेतृत्व कसं काय करू शकतो, असा प्रश्न वाचकांनी उपस्थित केला आहे.

पाहूया वाचकांनी व्यक्त केलेली काही निवडक आणि संपादित मतं -

वर्षा कदम म्हणतात, "दलितांनी, अनुसूचित जमातींनी जातीवर भाष्य केलेलं चालतं. मग बाकीच्यांनी केलं तर जातीवाद का म्हणावा? एक तर जात या विषयावर चर्चा करणं पूर्णपणे सोडा नाहीतर सगळेच बोलू देत. कोणाच्याही पोटात दुखायचं काम नाही."

मनाली गुप्ते म्हणतात, "सावरकर आणि ज्ञानेश्वरांना त्याकाळी कर्मठ ब्राह्मणांनी त्रास दिला. आज ते ब्राह्मण आहेत म्हणून टीका होते. सावरकर, ज्ञानेश्वर, कर्वे, आगरकर, रानडे आणि त्यांच्यासारख्या कैक ज्ञातअज्ञात ब्राह्मणांनी कधीच ब्राह्मण म्हणून नेतृत्व केले नाही. त्यांना जातीत बंदिस्त करणारे त्यांचे समर्थक, आणि ते फक्त ब्राह्मण होते म्हणून त्यांचा पराकोटीचा दुस्वास करणारे विरोधक, हे दोघेही सारखेच."

"महापुरुषांना जातीची विशेषणं लावण्याची नवीन जात जन्माला आली आहे. महापुरुषांचे कार्य आणि त्यांचे नाव घेणाऱ्यांच्या मानसिकतेतला हा मोठा विरोधाभास आहे. खरे महापुरुष कुठल्याही जातीचे असो, कुणाला कळलेच नाहीत दुर्दैवाने," असं गुप्ते पुढे लिहितात.

प्रज्ञा ओहळ यांना वाटतं की आमदार मेधा कुलकर्णी "एकदम बरोबर बोलल्यात. इंग्रजाचे राज्य असेल किंवा फ्रेंच, डच, अरब असतील किंवा निजामाची राजवट असेल त्यात्या राजवटीमधील महत्त्वाची पदे यांच्याचकडे होती. आज घडिला देशात सत्ता कोणत्याही पक्षाची असो महत्त्वाची पदे यांच्याकडेच राहतील."

रोहिणी सहारे म्हणतात, "एक देश असून पण इथे एकच भाषेचा वापर करणे देखील शक्य होत नाही. एकच समाज मिळून देश तयार होत नाही. तर मग एकच समाज देशाचं नेतृत्व कसं काय करू शकतो?"

कौस्तुभ जोशी यांच्यामते, "आपण किंवा आपल्यातील नेतृत्वगुण असलेल्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावं, असं प्रत्येक समाजाला वाटण्यात काहीही गैर नाही. या कुलकर्णी बाईंनी ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलंय आणि त्यात गैर काय? समजा अन्य कोणत्याही जातीच्या मेळाव्यात त्या समाजाने नेतृत्व करावं, असं त्या समाजातील नेता/अथवा कुणी म्हणाला तर अशीच चर्चा घडून येईल का? ब्राह्मण समाजाच्या एका गटामुळे एक मोठा समाजवर्ग उपेक्षित राहिला, हे निर्विवाद सत्य. पण त्यामुळे आजच्या जमान्यात कुणाला असं वाटू नये का? आणि साधा मुद्दा आहे. त्या बाई असं म्हणाल्या का, की ब्राह्मण सगळ्या लोकांना पायदळी तुडवून राज्य करतील?"

डॉ. विशाल पाटील म्हणतात, "देशाचं नेतृत्व करायला कुठल्या जातीच्या लोकांची गरज नाही. आम्हाला एक भारतीय म्हणून स्वतःला भारतीय मानणारा हवा आहे, जातीयवादी नको."

हेमंत पटारे पाटील म्हणतात, "नव्या युगात मानसिक गुलामगिरीत नवीन पिढी गुंतणार नाही. परिणामी एका विशिष्ट वर्गाचं हजारो वर्षापासूनचं वर्चस्व संपुष्टात येतंय म्हणून फुले, शाहू, आंबेडकर यांचा अभिमान वाटतो."

शुभम पोटफोडे यांच्यामते, "नेतृत्व कुणी करायचं, कुणी नाही, हे या देशातील लोक ठरवतील. मग तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो. त्यासाठी आपल्याकडे लोकशाही प्रक्रिया आहे. निवडणुका होतात."

सुधा राऊत म्हणतात, "'तू माळी, तू मुस्लीम, तू मराठा.' माफ करा, थोडं विषयांतर करत आहे, पण हा जातीवाद सोडा. देश प्रगती करेल."

गुरुदत्त देशपांडे यांच्यामते या चर्चेवर "प्रतिक्रिया देऊन काही उपयोग नाही. ज्ञानाची पूजा आता या जगात होत नाही, कारण शिक्षणाचा बाजार आहे. हिंदू धर्म पूर्णपणे ज्यांना समजत नाही, ते उठसूट फक्त एक जातीला दूषणं देतात. ब्राह्मण हे विचाराने नेहमीच पुढारलेले राहतील, कुणाची कितीही असूया दिसत असली तरीदेखील."

बाबा आकाडे म्हणतात, "ब्राम्हण ही जात नसून ती एक मानसिकता आहे. फक्त एका समाजकडेच नेतृत्व असावे, हीच ब्राम्हणी मानसिकता आहे. त्या मानसिकतेतून त्यांनी हे विधान केले असावे. अशी जातीय मानसिकता इतर समाजात देखील बळावत आहे."

मनजित देशपांडे विचारतात, "ब्राह्मण लोकांवर नक्की राग कशासाठी? महाराष्ट्राच्या इतिहासात किती वेळा ब्राह्मण मुख्यमंत्री होता? आणि किती वेळा ब्राह्मणेतर मुख्यमंत्री होता? एक गोष्ट लक्षात घ्या. ब्राह्मण समाजाने भरपूर योगदान दिले आहे. इतिहास नीट वाचा. बाजीप्रभू देशपांडे, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण गोखले, विनोबा भावे अशी हजारो लाखो उदाहरणं सापडतील."

प्रेम दिवसे म्हणतात, "ब्राम्हण समाज हा पहिल्यापासूनच समाजाला योग्य दिशा देण्याच काम करत आला आहे. आणि भविष्यातही तो हे काम अविरत करत राहील. ज्यांना ब्राम्हण समाजाचे नाव घेतल्यावर पोटात दुखायला चालू होत, त्यांनी इलाज करून घ्यावा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)