#5मोठ्याबातम्या: डोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

फोटो स्रोत, AFP
गटार साफ करणारे कामगार
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू
डोंबिवलीत मॅनहोलमध्ये काम करत असताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तिघेही मॅनहोल साफ करणारे कंत्राटी कामगार असल्याचं सांगण्यात आलं. डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात संध्याकाळी 4 च्या सुमारास घटना घडल्याचं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.
देविदास चंद्रभान पाजगे (30), महादेव धोंडीराम झोपे (38) आणि चंद्रभान अशी तीन कामगारांची नावं आहेत. अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
MIDCचं चेंबर साफ करण्यासाठी एक जण उतरला. मात्र गॅसमुळे तो गुदमरला, त्याला वाचवायला दुसरा उतरला, तोही गुदमरला. त्यामुळे या दोघांना वाचवायला तिसरा उतरला, मात्र या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला.
या घटनेचा तपास तिलकनगर पोलीस करत आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.
2. फरेरा, गोन्साल्विस, भारद्वाज यांचा जामीन फेटाळला
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून नजरकैदेत असलेल्या सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याचं वृत्त न्यूज 18 नं दिलं आहे.
त्यामुळे पोलिसांनी व्हर्नोन गोन्साल्वीस आणि फरेरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर भारद्वाज यांना शनिवारी ताब्यात घेतलं जाऊ शकतात.
फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
सुधा भारद्वाज
पुण्याच्या सत्र न्यायालयात भीमा-कोरेगाव एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कथित माओवाद्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या तिघांनाही २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आलं.
मात्र, सुप्रीम कोर्टात या कारवाईला दिलेल्या आव्हानानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत या तिघांसहीत आणखी दोन आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते.
3. लोकसभेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटाघाटी
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असून 40 जागांबाबत सहमती तयार झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पण या आघाडीचं नेतृत्व कोण करणार, असं विचारल्यावर ते म्हणाले की यावर निर्णय निवडणुकांनंतर घेतला जाईल.
फोटो स्रोत, Facebook / Sharad Pawar
शरद पवार
दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड 2019 साठी एकत्र निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीसाठी आम्ही समान जागा वाटून घेणार आहोत, असे संकेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले आहेत.
NDAतील इतर सहकारी पक्षांनाही सन्मानपूर्वक जागा देण्यात येतील असे देखील शाह म्हणाले, ही बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.
4. नागपूरमध्ये स्क्रब टायफसचे 29 बळी
तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत तब्बल 186 रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात 88 रुग्ण आढळून आले आहेत, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे.
उंदरावरावरील 'चिगर माईट्स' या जीवाणूमूळे होणाऱ्या स्क्रब टायफसचे रुग्ण ऑगस्ट महिन्यात अचानक आढळून आले. शहरात या आजाराचे आतापर्यंत 38 रुग्ण आणि सहा बळी तर ग्रमीण भागात 50 रुग्ण आणि सात बळीची नोंद असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
5. T20 टीममधून धोनीला वगळलं, कोहलीला विश्रांती
बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीला वगळलं आहे तर विराट कोहलीली विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिकेत संघाचं नेतृत्व करणार असल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
महेंद्रसिंह धोणीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिकेसाठीही संघात जागा मिळाली नाही. धोनीऐवजी निवड समितीने ऋषभ पंतला संघात स्थान दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचं फळ त्याला मिळालेलं दिसतंय.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)