महेंद्रसिंग धोनीला T20 संघातून डच्चू : काही काळाची विश्रांती की एका युगाचा अस्त?

धोनी

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला भारतीय T20 संघातून डच्चू देण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री BCCIच्या निवड समितीने वेस्ट इंडीज आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या एकूण सहा T20 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली.

टीम इंडियाला 2007 मध्ये T20चा जगज्जेता बनवणारा महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म गेले काही दिवस बिघडला आहे. त्याच्या जागी तरुण विकेटकिपर ऋषभ पंत विकेटच्या मागे जबाबदारी सांभाळणार आहे.

शुक्रवारी निवड समितीने T20 सह वेस्ट इंडीज विरोधातील उरलेल्या तीन वनडे सामन्यांसाठी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा केली.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या T20 सामन्यासांठी कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. विराट कोहलीला या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप जिंकला आहे.

2006पासून संघात

37 वर्षीय धोनी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यातून T20मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर भारताने आतापर्यंत 104 T20 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 93 सामन्यांत धोनी भारतीय संघात होता.

या 93 सामन्यांत 127 स्ट्राईक रेटने 1487 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीमागे 54 झेल आणि 22 स्टंपिंग केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी प्रथमच फिटनेसच्या कारणाने धोनीला संघात घेण्यात आलेलं नाही.

निवड समितीचे प्रमुख M. S. K. प्रसाद म्हणाले, "या निवडीवरून धोनीचं टी-20मधील करीअर संपलं असा अंदाज लावू नये. विकेटकिपर म्हणून काही चांगले पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून याकडं पाहिलं पाहिजे."

T20मधील धोनीची कामगिरी

T20चा विचार करता धोनीची सर्वोत्तम धावसंख्या 56 आहे. T20मध्ये धोनीने दोन अर्धशतक नोंदवले आहेत. त्यातील एक अर्धशतक या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात झालेल्या सामन्यातील आहे.

ही खेळी सोडली तर गेली काही महिने धोनीचा फॉर्म बिघडला आहे. ज्या फिनिशिंग टचसाठी धोनी जगभर प्रसिद्ध आहे, तोही दिसलेला नाही.

गेल्या पाच T20 सामन्यांत धोनीने 32, 11, 12, 52 आणि 16 धावा केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

धोनी IPLमधील चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आहे. IPLमध्ये नऊ वेळा प्लेऑफ आणि सातवेळा अंतिम सामन्यांत पोहोचलेला हा एकमेव संघ आहे. या संघाने 3 वेळ IPL जिंकला आहे.

प्रतिक्रिया

ही बातमी आल्यानंतर सोशल मिडियावर धोनीचा ट्रेंड सुरू झाला. काहींनी यावर टीका केली आहे तर काहींनी या निर्णय म्हणजे योग्यवेळी उचलेले पाऊल म्हटलं आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार का नाही, यावरही चर्चा होत आहेत.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले म्हणतात, "जर हा धोनीच्या T20मधील करीअरचा अंत असेल तर आपल्याला काही वेळ थांबून देशाला 2007मध्ये T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या खेळाडूचा सन्मान केला पाहिजे."

भारताचे माजी सलामीवीर आणि आता समालोचक असलेले आकाश चोप्रा लिहितात, "बहुतेक धोनी आता टी-20 क्रिकेट सामन्यात कधीच दिसणार नाही."

श्रीधर माही लिहितात, "DRS घेताना धोनीची आठवण येईल."

DRS म्हणजे Decision Review System अंतर्गत मैदानावरच्या अंपायरने दिलेल्या निर्णयाला आव्हान देता येतं. धोनीच्या चाणाक्ष बुद्धीमुळे अनेकदा भारताला याचा फायदा झाला आहे.

त्यामुळे बऱ्याच ट्विटर युजर्सनी म्हटलं आहे की, "जेव्हा LBWवर DRS घेण्याची वेळ येईल तेव्हा धोनीची आठवण काढली जाईल."

ऋषिकेश कश्यप लिहितात, धोनी महान खेळाडू होता, पण त्याची वेळ आता निघून गेली आहे.

तर बिनय शॉ ट्वीट करतात, "आता धोनी नाही तर आम्ही T20 पाहणंच सोडून देऊ."

तुम्हाला काय वाटतं? हा धोनी युगाचा अस्त म्हणावा की काही काळाची विश्रांती?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)