#5मोठ्याबातम्या - मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर : गोवा आरोग्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

फोटो स्रोत, Mint/GETTY Images

फोटो कॅप्शन,

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील महत्त्वाच्या बातम्यांपैकी या आहेत 5 मोठ्या बातम्या :

1. पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर - गोवा आरोग्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी प्रथम दिली आहे.

गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "पर्रिकर यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला आहे. हे आता लपवता येणार नाही."

पर्रिकर यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यातील प्रशासनात कोणतीही अडचण येतेय का, असं विचारल्यावर ते "कामं तर सुरूच आहेत. कुठलीही अडचण नाही," असं राणे यांनी सांगितलं.

१५ ऑक्टोबरला पर्रिकर यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एअर अँब्युलन्सनं गोव्यात आणण्यात आलं. पर्रिकर यांच्यावर गोव्यातच उपचार सुरू आहेत.

"त्यांनी राज्याची, देशाची खूप सेवा केली आहे. आता काही काळ त्यांना घरच्यांबरोबर घालवायचा आहे, तेवढा तो घालवू द्या. कुणीही त्यांना त्रास देऊ नका," अशी विनंतीही राणे यांनी यावेळी केली.

2. छत्तीसगड नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवान मृत्युमुखी

छत्तीसगडमधील बिजापूर इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात CRPFचे चार जवान मृत्युमुखी पडल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे. बिजापूरमधील बासागुडा तररेम मार्गावर हा हल्ला झाला.

CRPFच्या 168 बटालियनचे हे जवान गस्तीसाठी असताना मुरदोंडा गावाजवळ हा हल्ला झाला. भूसुरुंगाचा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला.

3. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचं निधन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचं शनिवारी निधन झालं. मृत्यूसमयी ८२ वर्षांचे खुराणा ब्रेन स्ट्रोकमुळे कोमात होते, अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

मदनलाल खुराणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सदस्य होते. 1993 ते 1996 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. 2004 मध्ये त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं.

4. शबरीमाला प्रश्नी आम्ही भाविकांसोबत : अमित शाह

भगवान अयप्पाच्या भक्तांचे आंदोलन दडपून केरळ सरकार शबरीमाला मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.

कन्नूरमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी, आपण भाविकांसोबत उभे राहणार असल्याचं ते म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अमित शाह यांच्या टीकेला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी उत्तर दिलं आहे. केरळमध्ये आमचे सरकार भाजपच्या दयेने सत्तेत आलेलं नाही, असं ते म्हणाले.

5. मराठा संघटनाचा 21पासून गनिमी कावा

मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळावं अन्यथा 20 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण आणि 21 नोव्हेंबरपासून राज्यभर गनिमी कावा आंदोलन करण्याचा, इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत देण्यात आला आहे. ही बातमी दैनिक पुढारीने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मराठा क्रांती मोर्चा

ही बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. बैठकीला महेश डोंगरे, नानासाहेब जावळे-पाटील, आ. तानाजी सावंत, संजय सावंत आदी उपस्थित होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)