कुछ तो गडबड है दया : CID का बंद पडत आहे?

CID

फोटो स्रोत, TWITTER

तपासापूर्वी एसीपी प्रद्युम्न आता कुछ तो गडबड है दया म्हणताना दिसणार नाहीत. आणि आता दया दरवाजाही तोडताना दिसणार नाही. कारण सोनी चॅनलवरील CID ही मालिका 21 वर्षांनंतर बंद होणार आहे.

1997मध्ये सोनी चॅनलवर CID मालिका झळकली. यापूर्वी गुन्हेगारी विश्वावरील कितीतरी मालिका आल्या होत्या. पण बघता-बघता बी. पी. सिंह यांनी दिग्दर्शित केलेला CID आपल्या काळातला सर्वांत प्रसिद्ध क्राईम शो बनला.

मग 21 वर्षांनंतर हा शो बंद का केला? याचा शोध कोण घेणार? कुछ तो गडबड है दया!

चला तर मग, एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेत जात काय गडबड झाली आहे याचा शोध घेऊ या.

का बंद झालं CID?

CIDमध्ये वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणाऱ्या दयानंद शेट्टींशी बीबीसीनं यावर चर्चा केली. शो बंद होण्यामागे 'कोणाचा हात आहे' हे त्यांनी सांगितलं.

निर्मात्यांनी CID बंद करण्याची घोषणा नुकतीच केली असतील तरी ही चर्चा 2 वर्षांपासून सुरू आहे, असं दयानंद यांनी सांगितलं.

ते सांगतात, "सोनी चॅनल CIDला बंद करण्यासाठी 2 वर्षांपासून प्रयत्न करत होतं. पण सोनीला याची जबाबदारी घ्यायची नव्हती. निर्मात्यांनी स्वतःच हा शो बंद करावा असं त्यांना वाटत होतं"

ते म्हणाले, "CIDचं प्रसारण सुरुवातीला शुक्रवार, शनिवार आणि रविवारी होत असे. हळूहळू शुक्रवारचं प्रसारण बंद झालं. त्यानंतर कधी रविवारी तर कधी शनिवारी प्रसारण बंद केलं जायचं."

फोटो स्रोत, TWITTER

CIDला टीआरपी मिळत नाही, असं कारण यासाठी देण्यात आलं आहे. पण दयानंद सांगतात की CIDची परिस्थिती सोनीवरील इतर कार्यक्रमांशी तुलना करता चांगली होती. टीआरपीच्या पातळीवर हा शो बराच चांगला होता, असं ते सांगतात.

मुलंही CIDचे फॅन

ते सांगतात, "चॅनलला वाटत होतं की या शोचं आता वय झालं आहे आणि CID आता बंद झालं पाहिजे. पण लहान-लहान मुलंही हा शो पाहात असतात."

जेव्हा हा शो बंद होणार असल्याची बातमी आली तेव्हा लोकांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं.

अनेकांनी #SaveCid या मोहिमेचं समर्थन केलं.

फोटो स्रोत, TWITTER

दयानंद शेट्टी यांनी CID यशस्वी होण्यात लहान मुलांची भूमिका मोठी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लहान मुलांचे आभारही मानले आहेत. मुलांनी हा शो उभा केला, असं ते सांगतात. ते सांगतात, त्यांच्या शेजारी राहाणारा 7 वर्षांचा मुलगा CIDचा मोठा फॅन असून तो यूट्यूबवर जुने भाग शोधून शोधून पाहातो.

लहान मुलांमध्ये जरी CID प्रसिद्ध असला तरी 21 वर्षांपासून सुरू असलेला हा शो चॅनला आता जुना वाटू लागला होता.

'सीआईडी रिटर्न्स'ची आशा?

दयानंद शेट्टी सांगतात, "CID परिवार मोठा आहे. हा शो संपल्यानंतर परिवार टिकून राहील. शूटिंगवेळी आम्ही एकत्र जेवत्र असू, मला याची नेहमी आठवण येत राहील."

'सीआईडी रिटर्न्स'ची आशा आहे का, हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर दयानंद म्हणाले, "कठीण आहे. पण हो शो परत आलाच तर तो सोनीवर येणार नाही. दुसऱ्या नावाने, नव्या ढंगात वेबसेरीजच्या स्वरूपात हा शो पुन्हा येऊ शकेल. पण सध्या निश्चित काही सांगता येणार नाही."

ते म्हणाले सध्या क्रिएटिव्ह टीम आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)