'अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड योग्यच पण...'
- श्रीकांत बंगाळे
- बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, ट्विटर मराठी मंडळ
अरुणा ढेरे
यवतमाळमध्ये येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. यंदा पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बिनविरोध झाली आहे.
दरवर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते. यात जवळपास 1000 मतदार मतदान करतात.
यंदा मात्र अध्यपदाची निवडणूक न घेता सर्वसंमतीनं अध्यक्ष ठरवला जावा, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महामंडळाच्या घटक संस्थांनी घेतली. त्यानुसार यंदाच्या संमेलनासाठी लेखिका अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेबद्दल दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सांगितलं की, "अरुणा ढेरे यांचं साहित्य क्षेत्रातील काम बघितल्यास त्यांची निवड योग्यच आहे. निवडणूक पद्धत बंद करून सर्वसंमतीनं अध्यक्ष निवडण्याची हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे आम्ही याचं स्वागतच करतो. पण या निवडप्रक्रियेत काही त्रुटी आहेत.
"ज्येष्ठ साहित्यिक निवडणुकीच्या फंदात पडू शकत नाहीत, म्हणून त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळावा, असं सूत्र बिनविरोध निवडीमागे होतं. पण या निवडणुकीत ज्येष्ठत्वापेक्षा साहित्य संस्थांच्या लॉबिंगमधूनच अध्यक्ष निवडला जाण्याचा धोका संभवतो.
"पूर्वी 1000च्या जवळपास मतदार अध्यक्षाची निवड करायचे. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाहीवादी होती. ती नष्ट होऊ शकते, कारण आता 4 ते 5 घटक संस्थांनी सुचवलेल्या नावांतूनच अध्यक्षाची निवड होणार आहे.
फोटो स्रोत, Sahitya Samelan
"शिवाय ज्येष्ठत्वाचा निकष हे यामागचं सूत्र असेल तर ना. धो. महानोर, यशवंत मनोहर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाचाही विचार व्हायला हवा होता. पण ज्येष्ठत्वाचा निकष पाळला जात नसेल, तर कंपूबाजी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळेच मराठवाडा विभागानं यंदा निवडणुकीतून आपली नावं मागे घेतली. मुंबई-पुणे-विदर्भ एकत्र येऊन गटबाजी करतील, अशी त्यांना भीती होती.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवड नेहमी वादग्रस्त ठरते, त्यापेक्षा बिनविरोध निवड योग्य वाटत नाही का, यावर चोरमारे सांगतात की, "साहित्य क्षेत्रात वाद व्हायलाच पाहिजेत. वैचारिक मतभेद व्हायलाच हवेत. त्यामुळे समाजाला नवनवीन बाबी समजून घ्यायला मदत होते."
बिनविरोध निवड प्रक्रियेला विरोध का?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मात्र बिनविरोध निवड प्रक्रियेला विरोध केला होता.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड सार्थ निवड आहे आणि मला याचा आनंद आहे. ही निवड सर्वांच्या संमतीनं झाली आहे."
लक्ष्मीकांत देशमुख
पण तुम्ही बिनविरोध निवड प्रक्रियेला विरोध दर्शवला होता, असं विचारल्यावर देशमुख सांगतात, "आज अरुणा यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे आज याबाबत मी कोणतीही निर्भीड प्रतिक्रिया देणार नाही. आज याबद्दल चर्चा करायला नको."
"मला 20 नावं मागवून कुणा एकाची निवड करायची नव्हती. सर्वांच्या मतदानातून अध्यक्ष निवडायची माझी इच्छा होती. बाकी भूमिका काय याबाबत नंतर सविस्तर बोलू," देशमुख पुढे सांगतात.
अशी झाली निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 4 घटक संस्था आहेत. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मुंबई साहित्य संघ यांचा समावेश होतो.
फोटो स्रोत, Terminator3D
तसंच महामंडळाशी अनेक संस्था संलग्न आहेत. यंदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक घटक संस्था, संलग्न संस्था, महामंडळाचे अध्यक्ष आणि संयोजन संस्था यांना अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक नाव सुचवायला सांगितलं होतं.
अशी एकूण 20 नावं सुचवण्यात आली होती आणि या 20 नावांतून अरुणा ढेरे यांची 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अरुणा ढेरे कोण आहेत?
अरुणा ढेरे या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957ला झाला. लोकसंस्कृतीचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.
6 कवितासंग्रह, 3 कादंबरी, 6 कथा संग्रह, 11 ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तकं असं विविधांगी लेखन ढेरे यांनी केलं आहे.
ढेरे यांचे 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ, 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' ही वैचारिक पुस्तकं, 'निरंजन', 'प्रारंभ', 'यक्षरात्र' हे कविता संग्रह, 'कृष्णकिनारा', 'नागमंडल', 'मैत्रेय' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये 11, 12 आणि 13 जानेवारीला होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)