#5मोठ्याबातम्या - मोदी शंकराच्या पिंडीवरील विंचू : शशी थरूर यांनी उकरलं 6 वर्षं जुनं वक्तव्य

मोदी

फोटो स्रोत, Dan Kitwood/GETTY

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मोदी हे शंकराच्या पिंडीवरील विंचू, थरूर यांच्या वक्तवावरून वाद

सध्या 'The Paradoxical Prime Minister' या आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत असलेले काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. "मोदी हे शंकराच्या पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारूही शकत नाही, असं संघाच्या एका व्यक्तीनं सांगितलं होतं," असं थरूर म्हणाल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.

2012 सालच्या कॅरव्हान मासिकाचा दाखला थरूर यांनी दिला. या मासिकामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर 'Emperor Uncrowned' या मथळ्याखाली सात पानांचा लेख छापण्यात आली होती. या बातमीचा शेवट संघ नेत्याच्या त्या वक्तव्यावरून झाला होता.

भाजप नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी थरूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. "काँग्रेस नेत्यांनी सार्वजनिक चर्चेचा स्तर तळाशी नेला आहे," अशी टीका त्यांनी केली. थरूर यांच्या वक्तव्यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी, असं प्रसाद म्हणाले.

या वक्तव्यासाठी आपण माफी मागणार नसल्याचे थरूर यांनी स्पष्ट केलं आहे. हे वक्तव्य गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आहे. त्यामुळे माफीचा प्रश्नच येत नाही असं थरूर यांनी ट्वीट केलं आहे.

2. सुप्रीम कोर्टाने भक्तांच्या भावनांचा आदर करावा: अमित शाह

शबरीमला मंदिरात महिलांवर प्रवेशबंदी उठवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठिकठिकाणी निदर्शनं सुरू झाली. या भक्तांच्या भावनांचा आदर ठेवला जाईल. भाजप एखाद्या पर्वताप्रमाणे या भक्तांच्या पाठीशी उभा राहील, असं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले.

फोटो स्रोत, AMIT SHAH/TWITTER

फोटो कॅप्शन,

अमित शहा

अयप्पा स्वामींच्या या मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं समर्थन करणारे स्वामी संदिपानंद यांच्यावर केरळमध्ये कुंडमोनकडावूमध्ये शनिवारी हल्ला झाला.

सुप्रीम कोर्टानं महिलांच्या मंदिर प्रवेशाला परवानगी दिल्यानंतर स्वामी संदिपानंद यांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचं द वायरनं म्हटलं आहे.

दरम्यान, भारताची अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) माजी संचालक माधवन नायर यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

3. झिका व्हायरस गुजरातमध्ये दाखल

राजस्थानमध्ये दहशत पसरवणाऱ्या झिका व्हायरसचा रुग्ण गुजरातमध्ये आढळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. राजस्थानमध्ये आतापर्यंत झिका व्हायरसच्या 144 केसेस सापडल्याचं द हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

"गुजरातमध्ये फक्त एक रुग्ण आढळला आहे, पण आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत आहोत," असं गुजरातच्या आरोग्य आयुक्त जयंती रवी यांनी म्हटलं आहे.

हा रुग्ण गुजरातमध्ये आढळल्यानंतर आता गरोदर महिलांची या व्हायरसच्या लक्षणांसाठी तपासणी करण्यात येत आहे.

4. भारताचं प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण ट्रंप यांनी नाकारलं?

भारताने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना निमंत्रित केलं होतं. पण त्यांनी भारतात येण्यास असमर्थता दाखवली आहे, असं वृत्त द हिंदूने दिलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या निमंत्रणाला उत्तर देणाऱ्या एका पत्रात त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. ट्रंप यांनी अमेरिकेतील कार्यक्रमांसाठी वेळ दिलेली असल्यामुळे त्यांना प्रजासत्ताक दिनाला येणं जमणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे.

फोटो कॅप्शन,

संयुक्त राष्ट्रांच्य परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भाषण करताना.

5. तुम्ही विद्यापीठ बंद का करत नाहीत? हायकोर्टानं मुंबई विद्यापीठाला सुनावलं

पेपर तपासण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे 60:40चा फॉर्म्युला राबवण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने एका शपथपत्राद्वारे मुंबई हायकोर्टात सादर केला.

पुरेशे शिक्षक नसल्यामुळे पेपर तपासणीसाठी वेळ लागतो. त्यामुळे निकालांना उशीर होतो. तर 60 गुणांची परीक्षा आणि 40 गुणांचं प्रॅक्टिकल तसंच असायनमेंट अशी अंतर्गत चाचणी, अशा नव्या पद्धतीद्वारे कायद्याच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जाईल, असा प्रस्ताव विद्यापीठानं ठेवला होता.

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी हायकोर्टानं विद्यापीठाला सुनावलं आहे. तुम्ही आपली जबाबदारी अशी कशी झटकून देऊ शकता. त्यापेक्षा तुम्ही विद्यापीठाला ताळं का लावत नाहीत, अशा शब्दांत कोर्टानं विद्यापीठाला फटकारलं, असं वृत्त एशिएन एजनं दिलं आहे.

"नागपूर, पुणे, शिवाजी विद्यापीठात अशीच पद्धत आहे," असं विद्यापीठाने यावेळी कोर्टाला सांगितलं. त्यावर हायकोर्टाने आणखी नाराजी व्यक्त केली. "मग आम्ही पण कोर्ट बंद करतो आणि वकिलांना सांगतो की त्यांनी आपापसातच खटले चालवून काय तो निर्णय घ्या."

आज यावर पुढची चर्चा होणार आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)