#5मोठ्याबातम्या: ज्येष्ठ गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचं निधन

यशवंत देव यांचं निधन

फोटो स्रोत, YouTube / DD screengrab

फोटो कॅप्शन,

यशवंत देव

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं 92व्या वर्षी निधन झालं. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे', 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' सारख्या प्रसिद्ध गाण्यांना त्यांनी संगीत दिलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेले देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांचं सोमवारी रात्री 1.30 वाजता निधन झालं, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

2. दूषित हवेमुळे भारतात 60,000 बालकांचा मृत्यू- WHO

भारतात दूषित हवेमुळे पाच वर्षांखालील मुलांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे. त्यामुळे 2016 या वर्षात देशात 60,987 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) दिली आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

धुरामुळे वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.

दूषित हवेतील विषारी घटक हे अंदाजे 1,10,000 मुलांच्या मृत्यूचे कारण बनल्याचं देखील WHOनं सांगितलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

2.5 PM (पर्टिकुलेट मॅटर- हवेतील घन आणि द्रव स्वरूपाच्या धोकादायक कणांचं मोजमाप करण्याचं एकक) स्तराच्या प्रदूषणाच्या सानिध्यात आल्यानं मुलांना धोका उत्पन्न होत असल्याचं WHOनं सांगितलं.

3. RBIच्या स्वायत्ततेचा सन्मान राखणं आवश्यक- डेप्युटी गव्हर्नर आचार्य

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा सन्मान राखणं आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते, असा इशारा RBIचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी एका कार्यक्रमावेळी दिला. मनी कंट्रोल या व्यापार न्यूज पोर्टलनं हे वृत्त दिलं आहे.

"अर्जेंटिनाच्या आर्थिक परिस्थितीला सरकारचा बॅंकेच्या कारभारताली हस्तक्षेप जबाबदार होता. मी दोन गोष्टींचा बचाव करत आहे - एक म्हणजे केंद्रीय बॅंकेकडे स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंगाजळीचा वापर आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी व्हायला हवा, असं मार्टिन रेड्राडो म्हणाले," असं आचार्य त्यांच्या भाषणात म्हणाले.

मार्टिन रेड्राडो हे अर्जेंटिनाच्या केंद्रीय बॅंकेचे प्रमुख.

फोटो स्रोत, Horacio Villalobos - Corbis

फोटो कॅप्शन,

RBIचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य

जे सरकार केंद्रीय बॅंकेच्या स्वायत्ततेचा आदर करत नाही, त्या देशाची आर्थिक स्थिती आज ना उद्या खालवू शकते, असंही आचार्य म्हणाल्याचं, न्यूज 18नं म्हटलं आहे.

4. भीमा कोरेगाव, मराठा आंदोलानातले खटले मागे घेणार

भीमा कोरेगाव दंगल आणि मराठा आरक्षण आंदोलनातील खटले मागे घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि दोन पोलीस महानिरीक्षकांचा समावेश असेल, अशी बातमी झी 24 तासनं दिली आहे.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला आणि जुलै-ऑगस्ट 2018 मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या वेळी झालेले विविध खटले मागे घेण्याबाबत अर्ज आले आहेत.

यावर चौकशी करून ते खटले मागे घेण्याबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

5. पवारांचे नातू उद्धव ठाकरेंवर कडाडले

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर झालेल्या टीकेनंतर शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी त्याला एका फेसबुक पोस्टद्वारे प्रत्त्युत्तर दिल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

रोहित पवार हे बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. "बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे, त्याला सांभाळून घ्या, असाच असावा," असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"इतका लेख लिहिण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता," असं ते पुढे म्हणाले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)