काँग्रेसच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर नरेंद्र मोदींचं इतकं प्रेम का?

  • घनश्याम शहा
  • समाजशास्त्राचे अभ्यासक
सरदार पटेल

फोटो स्रोत, Photo Division

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरदार पटेल यांच्यातील समान धागा म्हणजे गुजरात. सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले गृहमंत्री होते आणि तर मोदी देशाचे पंतप्रधान आहेत.

गेल्या काही वर्षांतील मोदींची भाषणं ऐकली तर एक बाब लक्षात येते. ती म्हणजे ते नेहमी गुजरात आणि सरदार पटेल यांच्याबाबत हिरिरीने बोलतात.

याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींना स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी एका प्रसिद्ध चेहऱ्याची गरज होती. सरदार पटेल यांच्या रूपात त्यांनी तो चेहरा शोधला.

सरदार पटेल यांची ओळख लोहपुरुष अशी आहे. ते कठोर निर्णय घ्यायचे आणि त्यांचं प्रशासन कौशल्य उत्तम होतं. मोदींनाही याच गुणांचा आधार घेत जनतेच्या समोर जायचं आहे.

मोदींच्या भाषणातले उल्लेख

मोदींनी 2006नंतर त्यांच्या भाषणात सरदार पटेलांचं नाव घेण्यास सुरुवात केली. त्याआधीच्या त्यांच्या भाषणांत पटेलांचा फारसा उल्लेख दिसत नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 2004मध्ये सत्ता गमावली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकारणाची दिशा बदलली.

2005-2006 या काळात नरेंद्र मोदी यांनी सातत्याने केंद्र सरकारवर गुजरातला सापत्न वागणूक दिल्याची टीका केली. 'गुजरातवरचा अन्याय' हा त्यांच्या टीकेचा मुख्य विषय असायचा.

नेहरू कुटुंबीयांनी सरदार पटेलांवर अन्याय केल्याची टीका करायला मोदींनी सुरुवात केली. नेहरू आणि पटेल यांच्यातील वादाचा त्यांनी नको तितका बाऊ केला आणि पटेलांना योग्य तो मान न दिल्याचा आरोपही केला.

गुजरातवर झालेला 'अन्याय' अधोरेखित करण्यासाठी आणि नेहरू परिवारावर टीका करण्यासाठी त्यांनी पटेलांचा आधार घेतला.

सरदार, मोदी आणि हिंदुत्व

महात्मा गांधी यांनी शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केले. सरदार पटेल आणि गांधी यांचे काही विषयांवर मतभेद होते.

सरदार पटेल हिंदू धर्माला मानत होते. तसेच ते मुस्लीम नागरिकांना समान वागणूक द्यायचे. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुही निर्माण करण्याच्या ते विरोधात होते.

फोटो स्रोत, Getty Images

महात्मा गांधी नेहमी हिंदू संस्कृतीबद्दल बोलायचे. तसेच वेद आणि उपनिषदांचा संदर्भ द्यायचे. सरदार पटेल या विषयांवर कधीही बोलायचे नाहीत.

मोदी आणि पटेल यांच्यातील फरक

नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांचा पुतळा उभारण्यासाठी जवळपास 3000 कोटींचा खर्च केला. मात्र त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि आदिवासी लोकांना याचा काही फायदा झालेला नाही.

या भागात सिंचनाच्या कोणत्याही सोयी नाहीत आणि आदिवासींचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. नरेंद्र मोदींनी या समस्या सोडवण्यासाठी काहीही केलेलं नाही.

पण सरदार पटेल नेहमी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशी त्यांची धारणा होती. त्याचप्रमाणे कामगारांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असं त्यांना वाटायचं.

फोटो स्रोत, Twitter

समाजातील आणि उच्च कनिष्ठ वर्गांत कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, याबाबत ते आग्रही होते.

सरदार यांचा विविध वर्गातील संघर्षापेक्षा सहकार्यावर विश्वास होता. ते गरिबांच्या, दलितांच्या किंवा आदिवासींच्या विरोधात नव्हते. मात्र त्यांच्या संघर्षात त्यांनी साथ दिली नाही हेही तितकंच खरं आहे. याचाच अर्थ असा की या वर्गाच्या समस्यांकडे त्याचं लक्ष नव्हतं आणि मोदीही तेच करत आहेत.

मोठ्या पुतळ्यामागे मोठा 'इगो'

पाण्याची टंचाई ही गुजरातमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे. जिथे पुतळा उभारण्यात आला आहे तिथे शेतकऱ्यांना जमीन गमावली आहे.

नरेंद्र मोदींना मात्र त्यांची काळजी नाही. त्यांच्यासाठी त्यांचा अहंकार महत्त्वाचा आहे. अंहकारापोटीच त्यांनी जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मोदींना त्यांचं नाव सरदार पटेलांच्या बरोबरीने घ्यायला हवंय.

सरदार, मोदी आणि निवडणुका

सरदार पटेलांचा पुतळा उभारला तर पाटीदार समाजातील असंतोष कमी होऊन ते येत्या निवडणुकीत साथ देतील, असं त्यांना वाटतं. मात्र ते इतकं सोपं नाही.

सौराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले आहेत.

उच्च मध्यमवर्गीय पाटीदार मोदींना पाठिंबा देतील, मात्र शेतकरी समुदायातील पाटीदार तितके श्रीमंत नाहीत. या समाजातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे पाटीदारांचा मोदींना फार फायदा होणार नाही.

गुजरात सोडलं तर इतर कोणत्याही राज्यात पुतळा निर्मितीचा प्रभाव दिसणार नाही. त्यामुळे या पुतळ्याचा मोदींना राजकीय फायदा होईल, असं म्हणणं चुकीचं ठरेल.

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत. शब्दांकन रवी परमार, बीबीसी गुजराती प्रतिनिधी)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)