‘ते म्हणाले होते महिलांच्या गुप्तांगांना धरून ओढा, म्हणून मी तसं केलं’

  • अनघा पाठक
  • बीबीसी प्रतिनिधी
महिला

फोटो स्रोत, Getty Images

मागच्या सीटवरच्या पुरुषाचा हात आपल्या स्तनांना लागल्याचं तिला जाणवलं.

विमानात दाटीवाटी होती. त्यामुळे आधी तिला वाटलं की चुकून स्पर्श झाला असेल, पण एका तासानंतर पुन्हा तसा स्पर्श झाल्यानंतर तिला लक्षात आलं की तो पुरुष आपला विनयभंग करत आहे.

न्यू मेक्सिकोमध्ये या पुरुषाला महिलेचं लैंगिक शोषण केल्यामुळे अटक झाली. आपण असं का केलं याचं समर्थन देताना तो म्हणाला की, "राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणतात की महिलांच्या गुप्तांगांना धरून त्यांना ओढा, म्हणून मीही असं केलं."

एखाद्या महिलेचा विनयभंग करून कुणी हे स्पष्टीकरण दिलं तर तुम्ही काय म्हणाल? एक तर हा माणूस खोटारडा आहे कारण तो दुसऱ्यावर आळ ढकलतोय. किंवा तो मूर्ख आहे कारण तो स्वतःचं डोकं न लावता लोकांचं म्हणणं ऐकतोय.

पण 'बिनधास्त महिलांना छेडा' असं म्हणणारी व्यक्ती जर मोठ्या पदावरची असेल, सेलिब्रिटी असेल, राजकीय नेता असेल किंवा अगदी राष्ट्राध्यक्ष मग तुम्ही काय कराल?

बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक बाईने हा अनुभव कधी ना कधी घेतलाच असेल. पुढच्या सीटवर बसलेलं असताना मागच्या सीटवरून कोणीतरी हात पुढे घालून स्तनांना चाचपतं.

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याला वाटतं की पश्चिमेतल्या देशांत परिस्थिती बरी असेल. पण अमेरिकेसारख्या देशातही महिलांना हा अनुभव चुकला नाहीये.

भारतातली उदाहरणं

उच्चपदस्थ व्यक्तीने, विशेषतः राजकारण्यांनी महिलांविषयी अनुद्गार काढण्याची उदाहरणं भारतातही कमी नाहीत.

मुलायम सिंह यांचं 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी केलेलं विधान आठवतं का? 'बलात्काराऱ्यांना फाशीची शिक्षा नको' या आपल्या मताचं समर्थन करताना ते म्हणाले होते की 'मुलांकडून होतात कधी कधी अशा चुका, म्हणून काय त्यांना फासावर चढवणार का?'

ज्येष्ठ नेते शरद यादव यांनीही अशी विधानं केली आहेत. 2015मध्ये एका इन्शुरन्स बिलासंदर्भात चर्चा चालू असताना शरद यादव राज्यसभेत म्हणाले की, 'दक्षिणेकडच्या महिला सुंदर असतात, त्यांची शरीरंही सुंदर असतात आणि त्यांना नाचताही येतं.'

तत्कालीन मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणींनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर त्यांचीही संभावना शरद यादवांनी "तुम्ही कोण आहात ते मला चांगलंच माहीत आहे," अशा शब्दांत केली.

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्दशः न बोलता रेणुका चौधरींना उद्देशून वापरलेलं 'शुर्पणखा' हे विशेषण तर सगळ्यांनाच माहीत असेल.

तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या तेवढ्या वाक्यांनी किंवा विशेषणांनी काय फरक पडतो? आपल्याला नाही पटलं तर सोडून द्यायचं. प्रत्यक्षात इतकं सोपं नसतं ना ते.

राजकीय विश्लेषक सुजात आनंदन म्हणतात की, हे राजकीय नेते त्यांच्या पाठीराख्यांसाठी देवासारखे असतात. ते त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

"गंमत म्हणजे त्यांच्या पक्षातले लोक कधीकधी खासगीत नाराजी व्यक्त करतात. म्हणतात की यांचं असं बोलणं आम्हाला पटत नाही. बाळ ठाकरेंनी अनेकदा महिलांविषयी अर्वाच्च्य भाषा वापरली होती, आणि लोक त्याला टाळ्या वाजवायचे. भले मग त्यांच्या पक्षातल्या काही लोकांना ही भाषा पटलेली असो वा नसो."

नेत्यांचा अशा बोलण्याचा समाजावरही परिणाम होतो. जे लोक त्या नेत्याला मानत असले काय किंवा नसले काय.

"मुळात महिलांना समान दर्जा द्यायची मानसिकता आपल्या समाजात नाही, आणि त्यात राजकारण्यांनी महिलांवर टीका करणारी, प्रसंगी अश्लील विधानं केली की लोकांना अजूनच चेव चढतो. त्यांच्या मनातल्या दुराग्रहांना जणू भक्कम पाठिंबा मिळतो. त्यामुळे ते प्रत्यक्ष आयुष्यातही असं वागायची शक्यता असते," सुजाता नमूद करतात.

म्हणूनच मोदींच्या 'शुर्पणखा' म्हणण्यावर मला आक्षेप आहे. कारण त्यावेळेस ते एका राजकीय विरोधकाचा अपमान करत नसतात तर एका स्त्रीचा अपमान करत असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अमेरिकेत विमान प्रवासात महिलेचा विनयभंग करणाऱ्याने म्हटलं की, ट्रंप म्हणतात महिलांना तुम्ही कधीही हात लावू शकता त्यामुळे मी असं केलं.

त्याचवेळेस हेही अधोरेखित करतात की मोठ्याने हसणाऱ्या, पुरूषांना विरोध करणाऱ्या स्त्रिया चांगल्या घरच्या नसतात तर शुर्पणखा असतात. पुढे जाऊन त्याचा असाही अर्थ निघतो की अशा स्त्रियांचं 'नाक' कापणं क्षम्य आहे, क्षम्यच कशाला मान्य आहे.

इतका बाँबगोळा सर्व पक्षांचे राजकारणी शांतपणे समाजात फेकत असतील तर स्त्रियांच्या हक्कांच्या गोष्टी कशा करायच्या?

लोक पुढाऱ्यांचं का ऐकतात?

एक प्रश्न असाही आहे की मग उद्या कोणी काहीही म्हटलं तरी आपण ते प्रमाण मानणार का? आपली म्हणून चांगल्या वाईटाची काही समज असतेच ना.

दिल्लीतले मानसशास्त्रज्ञ प्रवीण त्रिपाठी सांगतात की, अशा मोठ्या व्यक्तींनी केलेली विधानं एखाद्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात.

"यात दोन गोष्टी असतात. एक म्हणजे समर्थकांना आपल्या नेत्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट योग्यच वाटते. म्हणजे त्यांचं मत जरी वेगळं असलं तरी ते नेत्याने सांगितलेलच ऐकतात. कारण त्यांना त्या नेत्यासारखं बनायचं असतं.

हा नेता फक्त राजकीय नेताच असेल असं नाही, तर आध्यात्मिक असू शकतो, खेळातला कोणी आदर्श असू शकतो किंवा अगदी फिल्मस्टारही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

'मुलांकडून होतात कधी कधी अशा चुका, म्हणून काय त्यांना फासावर चढवणार का?' अशा आशयाचं विधान मुलायम सिंह यांनी 2014 च्या निवडणुकांच्या वेळेस केलं होतं.

"मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, इंट्रोजेक्शन नावाची. म्हणजे नकळत आपल्या नेत्यांच्या गोष्टी आपल्यात भिनायला लागतात. हाडाच्या समर्थकाला आपल्या नेत्यासारखं बनायचं असतं मग तो आपल्या नेत्यासारखं वागायला, बोलायला लागतो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी मानून तसं जगायला लागतो.

दुसरा मुद्दा अशा लोकांबद्दल आहे जे कुणाचेही समर्थक नसतात. अशा माणसांच्या विचारांना जर एखाद्या मोठ्या पदावरच्या माणसाने दुजोरा दिला तर त्यांना बळ मिळतं."

सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या मुलाला जर मुलीला छेडायचं असेल, तर तो म्हणू शकतो की माझ्या 'नेताजीं'नी म्हटलंय की मुलांकडून चुका होतच असतात.

आती क्या खंडाला?

शाहिद कपूर जेव्हा 'अच्छी बातें कर ली बहोत, अब करूंगा तेरे साथ गंदी बात' म्हणतो तेव्हा सिनेमा हॉलच्या बाहेर असणाऱ्या शेकडो तोतया शाहिदांना तसं बनायचं असतं... मुलींबरोबर 'गंदी बात' करायची असते.

मुलींना छेडणं नॉर्मल आहे, असं जणू पडद्यावरचे नट त्यांना सांगत असतात.

फोटो स्रोत, YouTube

गल्ली-गल्लीत 'भाई' बनून फिरणारे फिल्मी फॅन्स आपल्याला दिसतात हाही या 'इंट्रोजेक्शन'चाच परिपाक असतो. त्यांनाही वाटतं आपला उद्धटपणा, स्त्रियांकडे बघायची दृष्टी, आपल्या गर्लफ्रेंडला केलेली मारहाण, इतरांना दिलेल्या धमक्या आणि इतर अनेक गोष्टी क्षम्य आहेत कारण पडद्यावर 'भाई' तसंच करतो.

आपल्या चित्रपटांमधून, लोककथांमधून आणि पुराणांमधूनही स्त्रीची सहमती किंवा परवानगी महत्त्वाची नाही हेच ठसवलं गेलं आहे.

देवाचा अवतार असलेल्या व्यक्तीने कोणत्याही मुलीचा हात धरला, कपडे चोरले तरी त्याकडे कौतुकानं पाहिलं जातं. 'तेरा पिछा ना छोडूंगा सोणिये' हे आपल्या संस्कृतीतच इतकं घट्ट रुजलंय की त्याला मुळापासून उपटून काढायला किती वेळ लागेल कोणास ठाऊक.

याला उत्तर काय? पितृसत्ताक मानसिकतेच्या लोकांना टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांच्याकडे उत्तर आहेच. मुलींना घरात डांबा, शिकू देऊ नका, हातभर घुंघट घ्यायला लावा म्हणजे त्यांना कोणी छेडणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

पण आताच्या काळात हे काही शक्य नाही. त्यामुळे एकच मार्ग शिल्लक आहे. मुलांना वाढवताना असं वाढवा की महिलांचा आदर करणं त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनेल. आणि मुख्य म्हणजे त्यांना स्वतःच्या डोक्याने विचार करायला शिकवा. म्हणजे ते मेंढरासारखं कुणाच्या मागे जाणार नाहीत.

एकदा का आपल्या भाषणाला टाळ्या पडत नाहीत, आपल्या सिनेमाला लोक येत नाहीत, आपण जे बोलतो ते सर्वसामान्यांना पटत नाही हे या 'थोरामोठ्यांना' कळलं की त्यांच्याकडूनही अशी वाक्यं येणं बंद होईल.

तोवर आपण साऱ्या शुर्पणखाच आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)