बातमी खरी की खोटी तपासणाऱ्या वेबसाइट माहिती आहेत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याआधी काय काळजी घ्याल?

तीन महिने, अनेक राज्य, जमावानं केलेले हल्ले आणि किमान 25 जणांचा मृत्यू. यंदा व्हॉट्सअॅपवरून पसरलेल्या एका अफवेनं भारतात इतकं काही घडलं.

अफवा आणि फेक न्यूजचा असा सुळसुळाट ही चिंतेची बाब बनली आहे तसंच त्याला आळा घालण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. काही पत्रकारांनी तर केवळ फेक न्यूजशी लढणं हेच आपलं मिशन बनवलं आहे.

खरी माहिती गोळा करणं, चुकीची माहिती बाजूला करणं आणि योग्य विश्लेषण लोकांसमोर मांडणं हे प्रत्येक पत्रकाराचं कामच आहे. पण सोशल मीडियाच्या युगात सगळेजण सगळ्यांसोबत कुठल्याही मॉडरेटर्सशिवाय माहिती शेअर करू शकतात. त्यामुळेच खऱ्या-खोट्याची शाहनिशा करण्याचं काम आणखी महत्त्वाचं ठरतं.

म्हणूनच व्हायरल व्हीडिओमागचं सत्य जाणण्याचा प्रयत्न करणारे टिव्ही शोज किंवा एखादी माहिती खरी आहे की खोटी हे तपासणारी वेबपेजेस सुरू केली आहेत. अर्थातच हे प्रयत्न पुरेसे नाहीत, त्यामुळेच केवळ fact-checking करणाऱ्या boomlive.in, factchecker.in, altnews.in यासारख्या वेबसाईट्स अस्तित्वात आल्या. एक प्रकारे हे आताच्या जमान्यातले Info-Warriors आहेत.

Image copyright Sharad Badhe/BBC

एखादी बातमी, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीनं केलेलं विधान किंवा एखादा व्हायरल मेसेज खरा आहे की खोटा याची पडताळणी ही वेबपोर्टल्स करतात. ही प्रक्रिया कशी आहे, हे आम्ही boomliveचे व्यवस्थापकीय संपादक जेन्सी जेकब यांच्याकडून जाणून घेतलं.

फेक न्यूजशी लढाई

फेक न्यूजचा सामना करायचा, म्हणजे आधी फेक न्यूज हुडकून काढायला हवी. त्यासाठी हे इन्फो वॉरियर्स त्याच सोशल मीडियाचा वापर करतात जिथं अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात.

ते विविध वृत्तवाहिन्या, वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर बारीक नजर ठेवून असतात, ट्रेण्ड्सचा आणि व्हायरल पोस्ट्सचा मागोवा घेतात. Fact-checking करणाऱ्या बहुतांश संस्थांची सोशल मीडिया अकाऊंट्स आहेत. एखादा व्हायरल मेसेज पडताळून पाहायचा असेल, तर लोक या संस्थांना टॅग करू शकतात किंवा तो संदेश व्हॉट्सअॅपवर त्यांना पाठवू शकतात.

Image copyright Sharad Badhe/BBC

भडकावू स्वरुपाचे किंवा मोठ्या प्रमाणात लोकांवर परिणाम करतील अशा मेसेजेसच्या पडताळणीला प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा आधार घेतला जातो.

बातमी कुठून आली?

कुठलीही माहिती मिळाल्यावर पत्रकार त्या माहितीचा स्रोत काय आहे, याचा तपास करतात. फेक न्यूजशी लढणाऱ्या info-warriorsचाही त्याला अपवाद नाही.

जेन्सी जेकब सांगतात, "सर्वांत आधी ती माहिती कुठून आली? एखाद्या विश्वासार्ह वृत्त संस्थेनं त्याविषयी काही बातमी केली आहे का? हे आम्ही पाहतो. एखादा फोटो किंवा व्हीडियो असेल, तर गुगल रिव्हर्स इमेज सर्चसारखी ऑनलाईन टूल्स वापरून तो फोटो किंवा व्हीडियो याआधी कुणी वापरला होता का, हे तपासतो."

Image copyright Sharad Badhe/BBC

एखाद्या फोटो किंवा व्हीडियोचा मेटाडेटा म्हणजे त्या फाईलविषयीची अधिकची माहितीही ती फाईल कुठून आली याचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरते. कधीकधी एखाद्या व्हीडियोमधले छोटे-छोटे पुरावे दडलेले असतात. उदा. गाड्यांच्या नंबरप्लेट्स, होर्डिंग्ज किंवा दुकानांवरच्या पाट्या यावरून तो व्हीडियो कुठे चित्रित करण्यात आला आहे याची माहिती मिळू शकते.

विश्वासार्ह स्रोतांकडून पडताळणी

एखाद्या मेसेज किंवा व्हीडियोमध्ये एखाद्या व्यक्ती, संघटना किंवा संस्थेविषयी काही दावा केला असेल, पत्रकार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतात.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीनं केलेलं विधान असेल, तर ते नेमकं कुठल्या संदर्भात केलं आहे हे जाणणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी भाषण किंवा मुलाखतीचा मूळ व्हीडियो पाहिला जातो किंवा त्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो.

आकडेवारीशी संबंधित काही दावा केला असेल किंवा गुन्ह्यासंदर्भातली माहिती असेल तर पत्रकार संबंधित अधिकारी किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञांशी बोलून नेमकं काय घडलं असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.

योग्य माहितीचं वितरण

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली, की तो दावा खरा आहे की खोटा, किंवा त्यातले संदर्भ काय आहेत याविषयीचा सखोल लेख किंवा व्हीडियो वेबसाईट्सवर प्रकाशित केला जातो.

जेन्सी यांचा अनुभव असा आहे की, अनेकदा एखादी माहिती काही काळानं नव्या संदर्भांसकट पुन्हा मांडली जाते. "साधारणपणे आम्हाला दिसून आलं आहे, की बहुतांश व्हीडियोजचा दोन-तीन महिन्यांनंतर एका वेगळ्याच वर्णनासह पुनर्वापर करण्यात आला आहे."

धुळ्याजवळ राईनपाडा गावात काहीसं असंच घडलं होतं. पाकिस्तानच्या कराचीमध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेला व्हीडियो एका नव्या वर्णनासह फॉरवर्ड करण्यात आला. लोकांना वाटलं, की मुलं पळवणारी गँग आली आहे. त्यामुळे गावात आलेल्या व्यक्तींना जमावानं मारझोड केली आणि पाच जणांचा जीव गेला.

फेक न्यूजला आणि अफवांना आळा घालणं, त्याविषयी जागरूकता निर्माण करणं हे त्यासाठीच गरजेचं आहे आणि असं काम करणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारीही मोठी आहे.

काय आहेत पुढची आव्हानं?

सोशल मीडियावर भारतीय भाषांमध्ये संवाद साधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण भारतात स्वतंत्रपणे fact-checking करणाऱ्या बहुतांश संस्था इंग्रजीतच काम करतात.

altnews सारख्या वेबसाईट्सनी हिंदीतही हे काम सुरू केलं आहे. तर youturn.in सारखं पेज तमिळमध्ये फेक न्यूजशी दोन हात करतं. पण भारतीय भाषांमध्ये, विशेषतः मराठीत असे स्वतंत्र प्रयोग सुरू झालेले नाहीत.

त्यामुळेच फेक न्यूजशी लढणं ही फक्त पत्रकारच नाही तर आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

म्हणूनच जेन्सी सल्ला देतात, की "तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर मिळणाऱ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर लोकांना हे पटलं की एखाद्या पोस्टमध्ये काहीतरी गडबड आहे तर ते स्वतःच सत्याचा शोध घेणं सुरू करतील."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)