#5मोठ्याबातम्या : राहुल गांधी म्हणतात, 'मी हिंदुत्ववादी नाही, तर राष्ट्रीय नेता'

राहुल गांधी भाषण करताना

फोटो स्रोत, FACEBOOK/RAHUL GANDHI

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #5मोठ्याबातम्या :

1. मी हिंदुत्ववादी नाही तर राष्ट्रीय नेता - राहुल गांधी

"मी हिंदुत्ववादी नेता नाही पण राष्ट्रीय नेता आहे. माझ्यासाठी सगळे धर्म सारखेच आहेत. प्रत्येक जातीच्या, धर्माच्या आणि समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाच्या लोकांबाबत माझ्या मनात आदर आहे. मला हिंदू धर्म काय असतो, ते भाजपनं शिकवण्याची गरज नाही," असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"देशातील मंदिरं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मालकीची आहेत का? या मंदिरांमध्ये पूजा करण्याचा अधिकार फक्त मोदी आणि शहा यांनाच आहे का? तर असं मुळीच नाही. प्रत्येकाला मंदिरात जाण्याचा अधिकार आहे," असं राहुल यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या मंदिर दौऱ्यांवर टीका करताना राहुल गांधी यांना त्यांचे गोत्र विचारले तर सांगता येईल का, असा सवाल भाजपच्या प्रवक्त्यांनी केला होता.

2. सिंचन घोटाळ्यातील आरोपी वाचणार नाहीत- देवेंद्र फडणवीस

"सिंचन घोटाळ्यात जे कोणी दोषी असतील, ते वाचणार नाहीत," असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "सिंचन घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांचे हात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निकालाला उशीर लागत आहे. तसेच यात अनेक राजकीय नेत्यांचेही संबंध आहेत."

"मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत राज्यात 1 लाख 38 हजार शेततळी तयार झाली आणि 30 हजार शेततळी तयार होत आहेत. तसेच दीड लाख सिंचन विहिरी तयार करण्यात आल्या. सिंचन क्षेत्रात सरकारने केलेल्या कामांमुळे येत्या काळात 50 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल," असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

3. परदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी सोबत

परदेश दौऱ्यामध्ये पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खेळाडूसोबत नेण्याची परवानगी द्यावी, 2019 वर्ल्ड कपवेळी प्रवास करताना ट्रेनचा संपूर्ण डबा आरक्षित करून द्यावा आणि खेळाडूंना केळी देण्यात यावीत, अशा मागण्या भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडमधील 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी केल्या आहेत. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

या मागण्यांवर बीसीसीआयनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंड दौऱ्यामध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून भारतीय क्रिकेटपटूंना आवडीची फळे देण्यात आली नव्हती, अशी तक्रारही खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली आहे.

4. एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढवण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी.ची सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ 1 ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी लागू असेल.

5. दुष्काळाच्या घोषणेसाठी उच्च न्यायालयात याचिका

राज्यभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित करावा, अशी मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. करण्यात आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मागील वर्षी 33 टक्के पिकांच्या नुकसानीच्या निकषावर दुष्काळ घोषित करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. याच निकषाच्या आधारे राज्य सरकारने यंदाही तातडीने दुष्काळ घोषित करावा आणि त्यानुसार उपाययोजना व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)