सरदार पटेल यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य - नरेंद्र मोदी

मोदी

फोटो स्रोत, PMO INDIA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी झाला. यावेळी त्यांनी सरदार पटेल यांचा गौरवाने उल्लेख केला. ते नसते तर गीरमधील सिंह पाहण्यासाठी आणि सोमनाथच्या दर्शनासाठी व्हिसा घ्यावा लागला असता, असं ते म्हणाले.

या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, भाजप अध्यक्ष अमित शहा आदी नेते उपस्थित होते.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या साधू बेटावर सरदार सरोवर प्रकल्पाजवळ हा पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असं म्हटलं जाणार असून हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे.

ज्या संस्थेअंतर्गत या पुतळ्याचं व्यवस्थापन होणार आहे त्या ट्रस्टचं नाव सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल इंटिग्रेशन ट्रस्ट असं आहे.

भाषणातील प्रमुख मुद्दे

1. आज भारतानं एका ऐतिहासिक पुरुषाची प्रतिमा खऱ्या अर्थानं उजळावयाचं काम केलं आहे. या पुतळ्यासोबत भारतानं एक नवा इतिहास लिहिला आहे. हा पुतळा देशाला अखंडपणे प्रेरणा देण्याचं काम करेल.

2. गुजरातचा मुख्यमंत्री असताना सरदार पटेलांच्या पुतळ्याची संकल्पना मी मांडली होती. पण तेव्हा वाटलं नव्हतं की माझ्याच हातानं हा पुतळा देशाला अर्पण करण्याचं भाग्य लाभेल.

फोटो स्रोत, TWITTER/PMO INDIA

3. सरदार पटेलांनी या सर्व विभाजनवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं.

4. भारत 450हून अधिक संस्थानांमध्ये विभागला होता. पटेलांनी 5 जुलै 1947ला संस्थानांना सबोंधित करताना म्हटलं होतं, 'विदेशी आक्रमणासमोर आपण पराभूत झालो आणि याला आपलं आपापसातलं वैर कारणीभूत ठरलं. आता आपल्याला ही चूक पुन्हा करायची नाही.'

5. सरदार पटेल यांच्यामध्ये कौटिल्यची कूटनीती आणि शिवाजी महाराजांच्या शौर्य होतं.

6. सरदार पटेल नसते तर गीर अभयारण्यात सिंह, सोमनाथमध्ये शिवाचं दर्शन घेण्यासाठी व्हिसा काढावा लागला असता. ते नसते तर काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे आणि नागरी सेवेचा गाभा तयार झाला नसता.

फोटो स्रोत, TWITTER/@PMOINDIA

7. अत्यंत बिकट परिस्थितीत सरदार पटेल यांनी गृहमंत्री पद सांभाळलं. त्यांनी देशाच्या पोलीस व्यवस्थेला बळकटी दिली.

8. हा पुतळा म्हणजे नव्या भारताच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती आहे. देश शाश्वत होता, शाश्वत आहे आणि शाश्वत राहील, याचं प्रतीक म्हणजे हा पुतळा आहे.

9. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' भारतातल्या इंजिनिअरिंगच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. दररोज अडीच हजार कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत हा पुतळा उभारला. शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या कर्मचाऱ्यांनी हा पुतळा इतक्या कमी वेळात पूर्ण केला. या कामाशी जोडलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.

फोटो स्रोत, TWITTER/PMO INDIA

10. या पुतळ्यामुळे या क्षेत्रातील पर्यटन वाढीस लागेल आणि यामुळे या क्षेत्राचं रूप पालटणार आहे.

11. नेताजीचं दिल्लीतील संग्रहालय असो की शिवाजी महाराजांचं मुंबईतील स्मारक आम्ही इतिहासाचा गौरव करायचं काम करत आहोत.

12. काही लोक आमच्या या कामाकडे राजकारण म्हणून पाहत आहेत. पण मी तुम्हाला विचारतो, देशाच्या महापुरुषांचं स्मरण करणं गुन्हा आहे का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)