या वेबसाईट्सवर आहे 'फेक न्यूज' पसरवण्याचा आरोप

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : सावधान ! तुम्हाला फेसबुकवर दिसत असलेली माहिती खरी आहे का?

देशात फेक न्यूज म्हणजेच खोट्या बातम्या पसरवल्यामुळे जमावाकडून हिंसाचार आणि लिंचिंग म्हणजेच ठेचून मारल्याने अनेकांचा जीव गेल्याचा आरोप होतोय.

कोण आहेत ही माणसं जी अशी ट्विटर हँडल्स आणि फेसबुक पेजेस किंवा वेबसाईट्स चालवतात, ज्यांच्यावर फेक न्यूज पसरवण्याचा आरोप आहे?

फेक न्यूज पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपला जबाबदार धरलं जातंय. भारतात 20 कोटींहून जास्त लोकं व्हॉट्सअॅप वापरतात.

वेगवेगळ्या अहवालांनुसार फेक न्यूजमुळे 2018मध्ये आतापर्यंत 24 जणांचा बळी गेला आहे.

याच विषयाच्या खोलात जाण्यासाठी आम्ही पोहोचलो ग्वाल्हेरमध्ये. शहरातल्या प्रसिद्ध राम मंदिरासमोरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आकाश सोनी यांचं कार्यालय आहे.

आकाश स्वतःची ओळख 'बाल स्वयंसेवक' अशी करून देतात. ते वयाच्या चौथ्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत.

गेल्या 'सहा वर्षांपासून' आकाश सोनी 'बीजेपी ऑल इंडिया' नावाचं फेसबुक पेज चालवतात. या पेजला जवळपास 12 लाख लोकांनी लाईक केलं आहे.

प्रतिमा मथळा आकाश स्वतःची ओळख 'बाल स्वयंसेवक' अशी करून देतात.

फॅक्ट-चेकर वेबसाईट 'अल्ट न्यूज'ने 'बीजेपी ऑल इंडिया' फेसबुक पेजवरून सातत्याने खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.

'अल्ट न्यूज'नुसार या फेसबुक पेजवर एक फोटो आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अमेरिकेतल्या एका विमानतळावर तपासादरम्यान कपडे काढायला सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. ही बातमी खोटी होती.

ही बातमी का छापली यावर आकाश सोनी स्वतःचा युक्तीवाद मांडतात. कधी ते पोस्टमध्ये चूक झाल्याचं कबूल करतात. तर कधी प्रसार माध्यमांमध्ये सगळीकडेच चुकीच्या बातम्या दाखवल्या जातात. तर मग आपल्यालाच का विचारलं जातंय, असा युक्तीवाद करतात. ते अल्ट न्यूजची विश्वासार्हता आणि त्यांच्या फंडिंगवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.

Image copyright ALT NEWS
प्रतिमा मथळा फॅक्ट-चेकर वेबसाईट 'अल्ट न्यूज'ने 'बीजेपी ऑल इंडिया' फेसबुक पेजवरून सातत्याने खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.

आकाश सोनी सांगतात ते 'वुई सपोर्ट अमित शहा', 'वंदे मातरम' आणि स्वतःच्या नावानेही फेसबुक पेज चालवतात.

आकाश अनेक फेसबुक ग्रुप्सचे सदस्यही आहेत. आपण 350 व्हॉट्सअॅप ग्रुप्सचे सदस्य आहोत आणि या ग्रुप्सवरून सतत जी माहिती मिळते ती फेसबुकवर पोस्ट करतो, असं आकाश सांगतात.

आकाश सांगतात त्यांना या फेसबुक पेजने नवी ओळख दिली आहे. या पानावर समस्येचा उल्लेख करताच त्याचं समाधान मिळतं.

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आकाश यांच्या कार्यालयात दाराजवळच्या भिंतीवर स्वामी विवेकानंद यांचं मोठं पोस्टर आहे.

हातात मोबाईल, कपाळावर टिळा आणि कुर्ता घातलेल्या आकाश सोनी यांच्या टेबल-खुर्चीसमोर सोफा ठेवला आहे.

याच कार्यालयात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या फेसबुक पेजेससाठी माहिती गोळा करत असल्याचं ते सांगतात.

त्यांची विचार करण्याची पद्धत एखाद्या डिजिटल न्यूजरूममध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनलसारखी आहे. सकाळी काय छापायचं, ऑफिसच्या आधी किंवा नंतर लोकांना काय वाचायला आवडेल, दुपारी लोकांना काय बघायला आवडेल, या सर्व गोष्टी ध्यानात धरून ते फेसबुक पोस्ट टाकतात.

एका सूत्रानुसार गुगल अॅड्सच्या माध्यमातून अनेक जण महिन्याला लाखो रुपये कमावतात. त्यामुळे लोकांना फेसबुक पेजवर आणून तिथे क्लिक करायला बाध्य करणं गरजेचं असतं.

प्रतिमा मथळा आकाश सोनी यांचा फोन

'बीजेपी ऑल इंडिया' पेजवर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या समर्थनातल्या बातम्यांव्यतिरिक्त प्रत्येक सबस्क्राईबरला काहीना काही तरी मिळावं, असा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ राशीभविष्य, आरोग्य, क्रीडा क्षेत्र, मनोरंजन आणि याव्यतिरिक्त हिंदू धर्माशी निगडीत बाबी.

आकाश सोनी सांगतात, "मी आणि माझा मित्र राजेंद्र दर 40 मिनिटात एक पोस्ट टाकतो. आपला संदेश देण्यासाठी बॅनर असतो जो राजेंद्र आणि मी बनवतो... तरुण पिढीला राष्ट्रवादाकडे वळवणं, भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणं हे (पेजचं) उद्दिष्ट आहे."

"देश आणि तरुणांची दिशा बदलावी" यासाठी 2011 सालापासून नरेंद्र मोदी यांचा प्रसार सुरू केल्याचं आकाश सोनी सांगतात.

ते सांगतात, "(फेसबुक पेजच्या माध्यमातून) याद्वारे आम्ही आमचं म्हणणं कुठल्याची काट-छाटीशिवाय, प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, हे आम्हाला माहिती होतं. इलेक्ट्रॉनिक चॅनलवर तुम्हाला वाट बघावी लागते. बातमी छापायची, दाखवायची की नाही, हे सर्व त्यांच्यावर (पत्रकारांवर) अवलंबून असतं."

वेबसाईटवरच्या एका पोस्टचा मथळा आहे 'काँग्रेसची सभा, पाकिस्तानचा झेंडा'. या पोस्टमध्ये एक व्हिडियो आहे. त्यात एका सभेत इंडियन मुस्लीम लीगचा (आयएमएल) झेंडा फडकताना दिसतोय. मात्र आयएमएलच्या झेंड्याला पाकिस्तानचा झेंडा म्हटलं गेलं आहे.

अल्ट न्यूजच्या म्हणण्यानुसार हा व्हिडियो 3,600 वेळा शेअर केला गेला. हा व्हिडियो दुसऱ्या वेबसाईटवरही पोस्ट करण्यात आला होता.

Image copyright BJP ALL INDIA FB PAGE
प्रतिमा मथळा वेबसाईटवरच्या एका पोस्टचा मथळा आहे 'काँग्रेसची सभा, पाकिस्तानचा झेंडा'. या पोस्टमध्ये एक व्हिडियो आहे. त्यात एका सभेत इंडियन मुस्लीम लीगचा (आयएमएल) झेंडा फडकताना दिसतोय. मात्र आयएमएलच्या झेंड्याला पाकिस्तानचा झेंडा म्हटलं गेलं आहे.

ही बातमी पेजवर कशी आली? आकाश सांगतात, "ती एका वेबसाईटची बातमी होती. आमची स्वतःची बातमी नव्हती. वेबसाईटने ती बातमी टाकली होती."

आकाश म्हणतात आम्ही ती 'बातमी काढून टाकली होती' मात्र पुन्हा बघितलं तेव्हा ती पोस्ट तिथेच होती.

पोस्ट टाकणं चुकीचं होतं का, यावर आकाश सांगतात, "कधी कधी चूक होते. चूक तर सगळ्यांचीच होते. चूक कबूल करणं, एवढंच होऊ शकतं."

यांच्यावर आहे 'फेक न्यूज' पसरवण्याचा आरोप

अल्ट न्यूजमध्ये एका वेगळ्या पोस्टच्या छायाचित्राचा उल्लेख आहे. या फोटोत जवाहरलाल नेहरूंच्या भोवती बायकांचा गराडा आहे. या फोटोच्या वर आणि खाली नेहरुंबाबत अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर केला गेला आहे.

ही पोस्ट तीन हजारांहून जास्त वेळा शेअर झालीय. तंत्रज्ञानाचा गैरवापर करत हा अनेक वर्षं जुना फोटो बनवण्यात आला आहे. मात्र ऑल इंडिया बीजेपीने हा फोटो फोटोशॉप केलेला नाही.

फॅक्ट चेक वेबसाईट बूमलाईव्हने हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे.

Image copyright BJP ALL INDIA FB PAGE
प्रतिमा मथळा अल्ट न्यूजमध्ये एका वेगळ्या पोस्टच्या छायाचित्राचा उल्लेख आहे. या फोटोत जवाहरलाल नेहरूंच्या भोवती बायकांचा गराडा आहे. या फोटोच्या वर आणि खाली नेहरुंबाबत अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर केला गेला आहे. हा फोटो खोटा आहे.

आकाश सांगतात, "आणखी एक व्यक्ती आहे तिने हा फोटो टाकलेला असू शकतो. आमच्या सोबत राजेंद्रजी आहेत ते (पेज) सोबत चालवतात. मात्र मी अशी काही पोस्ट टाकल्याचं मला आठवत नाही."

ते सांगतात, "चुकीची बातमी छापली जाऊ नये, याची काळजी आम्ही नक्कीच घेतो. तुम्ही एखाद दुसरी पोस्ट बघितली... चूक सगळ्यांकडूनच होते. आम्ही चूक कबूल करतो. हो आमच्याकडून चुकीने पोस्ट झाली."

आकाश सोनी धार्मिक द्वेष पसरवण्याच्या आरोपांचा इन्कार करतात. ते सांगतात, "(फेसबुकवर) काय टाकावं, याचं कसलंच मार्गदर्शन तुम्हाला मिळत नाही."

ते म्हणतात, "आम्हाला आमच्या पेजचं स्वातंत्र्य आहे. आम्ही (भाजपचे) पगारी कर्मचारी नाही आणि आमच्याकडे कुठली अधिकृत जबाबदारीही नाही. काय टाकावं, याचं कुठलंच मार्गदर्शन भाजपकडून मिळत नाही. हे कुणी सिद्धही करू शकत नाही."

आकाश यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांत दोन बातम्यांनी पेजला बरीच लोकप्रियता मिळाली. पहिली ताजमहालाचा इतिहास. यात ताजमहालाच्या ठिकाणी पूर्वी एक मंदिर होतं, असा दावा करण्यात आला होता आणि दुसरी बातमी होती की काँग्रेसचं निवडणूक चिन्हं पंजा अनधिकृत आहे.

बीबीसीने आकाश सोनी यांची भेट घेतल्यानंतर 'बीजेपी ऑल इंडिया' या फेसबुकपेजचं नाव बदलून 'आई सपोर्ट नरेंद्रभाई मोदी बीजेपी' करण्यात आलं.

सिद्धांतिक विचारसरणी आणि आर्थिक कारणं आकाश सोनी सारख्या लोकांना प्रेरणा देतात.

आकाश यांच्या म्हणण्यानुसार ज्या बातम्यांकडे प्रसार माध्यमं डोळेझाक करतात अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सोबतच या माध्यमातून लोकांचं भलं करणं हा त्यांचा उद्देश आहे.

प्रतिमा मथळा आकाश सोनी यांच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 'कव्हरेज टाइम्स'चं कार्यालय आहे.

आकाश सोनी यांच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 'कव्हरेज टाईम्स'चं कार्यालय आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अल्ट न्यूजने 'कव्हरेज टाईम्सला' 'उदयोन्मुख फेक न्यूज साईट' म्हटलं होतं. या वेबपेजने अल्पावधितच बरीच लोकप्रियता मिळवली होती.

आम्ही रविवारच्या दुपारी उशिरा या ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा तिथे दोघांव्यतिरिक्त कुणीच नव्हतं.

वेबसाईटचे 27 वर्षांचे 'एडिटर इन चीफ' राजू शिकरवर यांच्या मते, "(वेबसाईट सुरू केल्याच्या) तीन महिन्यातच आमच्या वेबसाईटने टॉप 10,000 मध्ये स्थान मिळवलं होतं," आणि गुगल अॅड्समधून त्यांना महिन्याला लाखभर वगैरे पगार निघतो.

त्यानंतर वेबसाईटवर छापलेल्या बातम्यांविरोधात तक्रारी यायल्या सुरुवात झाली. यामुळे वेबसाईटचा रीच आणि शेअरिंगवर त्याचा परिणाम होऊ लागला.

अशीच एक स्टोरी बीबीसीची होती. बीबीसीवर म्यानमारमधल्या रोहिंग्या समुदायावर एक बातमी आली होती. त्यात काही क्षणांसाठी एका रोहिंग्या मुलीला दाखवलं होतं.

Image copyright ALT NEWS
प्रतिमा मथळा ही खोटी बातीमी आहे.

त्या बातमीत त्या मुलीबद्दल कसलीच माहिती नव्हती. मात्र 'कव्हरेज टाईम्स'च्या वेबसाईटवर लिहिलं होतं - "14 वर्षांची रोहिंग्या मुलगी. या मुलीच्या नवऱ्याला 18 मुलं आहेत. तुम्ही अशा स्थलांतरितांना भारतात आसरा द्याल?"

ही एक फेक न्यूज होती आणि राजू हे कबूल करतात.

राजू यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जी बातमी आली त्यात जी माहिती दिली होती त्यानुसार "ही मुलगी विवाहित होती. या मुलीच्या नवऱ्याच्या आणखीही बायका होत्या." मात्र ही माहिती कुठून मिळाली आणि आता ती माहिती कुठे आहे, याचं स्पष्ट उत्तर मिळू शकलं नाही.

त्यांनी सांगितलं त्यांना एका सूत्राने ही माहिती दिली होती. आता मात्र ही माहिती सर्व्हरमधून डिलीट झाली आहे.

राजू सांगतात, हिंदूना काळजी वाटणारे कट्टरतावाद, बांग्लादेशातून होणारं स्थलांतर यासारखे मुद्दे मांडणं, हा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या मते प्रसार माध्यमांमध्ये या मुद्द्यांवर चर्चा होत नाही.

राजू शिकरवर यांनी सांगितलं की त्या बातमीविरोधात 'बऱ्याच तक्रारी' आल्यानंतर बातमी वेबसाईवरून काढण्यात आली. मात्र त्यामुळे वेबसाईट्सचा रीज, लाईक्स आणि शेअरचं मोठं नुकसान झालं.

प्रतिमा मथळा राजू शिकरवर

राजू सांगतात, कधी कधी असं होतं की दुर्दैवाने चुकीची माहिती जाते. तुम्ही ती नीट वाचलेली नसते किंवा मथळ्यात काहीतरी चूक होते, म्हणून असं होतं. नाहीतर जी माहिती टाकली जाते ती खरी असते.

ते सांगतात, "मला मुस्लिमांविषयी तक्रार नाही की आपल्या देशात राहणाऱ्यांबद्दल तक्रार नाही. तुम्ही राहताय, तर रहा. व्यवस्थित रहा. आमची तक्रार नाही. समजा तुम्ही एका देशात राहता तर आपल्या देशात जे आहे ते अंगिकारलं पाहिजे. जसं वंदे मातरम आहे, राष्ट्रगान आहे. तर आपल्याला त्याचा आदर करायला हवा. आपण ज्या देशातलं खातोय त्याचा तरी आदर केला पाहिजे. हे योग्यच आहे. तुम्ही त्याचाच विरोध करत असाल तर तुम्ही भारतीय कसे. तुम्ही नसाल ना."

कव्हरेज टाइम्सशी संबंधित रामनेंद्र सिंह यांच्या मते त्यांचा उद्देश पैसे कमावणं आहे "दंगल घडवणं" नाही.

ते म्हणतात, "कधी कधी आम्हाला (पोस्टच्या खरेपणाविषयी) कळत नाही. (जेव्हा) तक्रार येते तेव्हा (आम्ही बातमी) काढून टाकतो." कारण "आक्षेपार्ह पोस्ट असेल तर फेसबुक पेज रीच किंवा पोस्ट ब्लॉक करून टाकतो."

ते विचारतात, "आमच्या व्यवसायावर परिणाम व्हावा, असं आम्हाला का वाटेल. आम्ही अजेंड्यावर काम करत नाही. फेसबुकवरून पैसे कमावणं, हाच आमचा उद्देश आहे."

फेसबुकच्या कठोर धोरणांमुळे फेक न्यूजला आळा बसल्याचं रामनेंद्र मान्य करतात.

ग्वाल्हेरपासून दूर भोपाळमध्ये 23 वर्षांचे अभिषेक मिश्रा 'वायरल इन इंडिया नेट' नावाची वेबसाईट चालवतात.

प्रतिमा मथळा भोपाळमध्ये 23 वर्षांचे अभिषेक मिश्रा वायरल इन इंडिया नेट नावाची वेबसाईट चालवतात.

वेबसाईट आणि त्याच्याशी संबंधित फेसबुक पेजवर कमलनाथ यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या समर्थनार्थ आणि नरेंद्र मोदींवर विनोद करणाऱ्या पोस्ट दिसतील.

अॅलेक्सावर भारतात वायरल इन इंडिया डॉट नेटची रँकिंग 740च्या आसपास आहे. वेबसाईटचं जवळपास 90% ट्रॅफिक भारतातून आहे. मात्र सौद अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि कतारमधूनही लोक वेबसाईटवर येतात.

भोपाळमधल्या एका अत्यंत गजबजलेल्या भागात जवळपास चार वर्षं जुन्या या वेबसाईटचं एक बहुमजली कार्यालय आहे. मात्र अल्पावधितच इतक्या मोठ्या कार्यालयामागे कुणाचं फंडिंग आहे, यावर अभिषेक यांनी सांगितलं की यामागे राजकीय फंडिंग नाही तर वेबसाईटने होणारी कमाई आहे.

ते सांगतात, "आमचे अनेक कर्मचारी मनापासून काम करतात. पैसेही घेत नाहीत. आमच्याकडे 45हून जास्त लोक आहेत. आमच्याकडे राजकीय विचारधारेच्या बाबतीत सगळी न्युट्रल माणसं काम करतात. कुठल्याच राजकीय व्यक्तीला आम्ही नोकरी देत नाही."

सिव्हिल इंजिनीअर अभिषेक मिश्रानुसार 2011 साली त्यांच्या वेबसाईटची रीडरशीप 5 कोटी होती. 2017 साली ही साप्ताहिक संख्या 14 कोटी 10 लाखांवर पोहोचली आणि एकावेळी 25 ते 40 हजार लोक त्यांची वेबसाईट वाचत असतात.

वेबसाईटच्या एका बातमीत अमेरिकेतल्या एका कथित सर्वेक्षणात मनमोहन सिंह यांना जगातील सर्वात प्रामाणिक व्यक्ती सांगण्यात आलं होतं.

फॅक्ट-चेकर वेबसाईट अल्ट न्यूजने ही फेक न्यूज असल्याचं म्हटलं.

प्रतिमा मथळा वायरल इन इंडिया नेट वेबसाईटचं ऑफीस

या बातमीवर अल्ट न्यूजने लिहिलं, "हे वायरल मेसेज भाजप समर्थकांनी अनेकदा शेअर केलेल्या फेक न्यूज पोस्टरसारखेच आहेत. त्याच प्रकारची रंगरंगोटी... असं वाटतं जणू काँग्रेस समर्थकांना वाटतं तुम्ही हरवू शकत नसाल तर आमच्यात सामिल व्हा." तिकडे अभिषेक मिश्रांचा दावा आहे की त्यांची बातमी तंतोतंत खरी आहे.

ते म्हणतात, "तुम्ही सिद्ध करून दाखवा की ही बातमी खोटी आहे. कुणीही सिद्ध करून दाखवावं की ही फेक न्यूज आहे. अल्ट न्यूज सारख्या लहानसहान लोकांनी काहीही टाकलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? ही बातमी खोटी असल्याचं त्यांनी सिद्ध करावं, कुणीही काहीही आरोप करेल," मात्र ही माहिती कुठून मिळाली?

Image copyright ALT NEWS

अभिषेक मिश्रा यांच्या मते, "ज्यांनी ही बातमी तयार केली आहे त्यांच्या मते ही बातमी अगदी खरी आहे. आमच्या टीममधल्या कुणी ही बातमी तयार केली हे मला माहिती नाही. मात्र ही बातमी खरी आहे. मी एडिटर इन चीफ आहे. मात्र मी ग्राफिक्स बनवत नाही आणि ते माझ्या नियंत्रणातही नाही, हे त्यांना माहिती आहे. अल्ट न्यूजने जी बातमी दिली ती खोटी आहे, असा आरोप मीही लावू शकतो."

अभिषेक यांच्या मते गुगल किंवा फेसबुक कुणीही फेक न्यूज रोखू शकत नाही.

ते म्हणतात, "प्रसार माध्यमात बातमी येते की विजय मल्ल्याला अटक झाली. दुसऱ्याच दिवशी ती बातमी काढून घेतली जाते. कुणीही माफी मागत नाही. न्यूज चॅनल्सने दाखवलं की 2000 रुपयांच्या नोटेत चीप आहे. नोट आल्यावर कळलं की त्यात कोणतीच चीप नाही. तर मुद्दा हा की तुम्ही कधीच फेक न्यूज रोखू शकत नाहीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)