#5मोठ्याबातम्या : जलयुक्त शिवाराचे पाणी नेमकं कुठं मुरलं? - विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Radhakrishna Vikhe Patil/FACEBOOK

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. जलयुक्त शिवाराचे पाणी नेमकं कुठं मुरलं? - विखे पाटील

जलयुक्त शिवार योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे वस्तुनिष्ठ नसून सरकारी कामांत घोळ आहे. त्यामुळे या कामांचे जिल्हानिहाय ऑडिट केले जावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

जलयुक्त शिवारचे पाणी नेमके कुठे आणि किती मुरले, त्याचा पर्दाफाश आपण येत्या हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

सरकार दुष्काळाचा आढावा उपग्रहावरून घेत आहे, उद्या मुख्यमंत्री मंगळावरून राज्यकारभार करतील आणि तिथं पाणी सापडलं म्हणून स्वतःची पाठ थोपटतील, अशी टीकाही त्यांनी केली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान जायकवाडीमध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या धरणांतून 8.99 टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यानं दाखलं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी बातमी लोकसत्तानं दिली आहे.

जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिलेल्या आदेशानुसार 8.99 टीएमसी पाणी धरणांमधून सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्यास नगर आणि नाशिकमधून कमालीचा विरोध आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

2. महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुन्हा होणार

गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. त्या आता पुन्हा सुरू होणार आहेत. NEWS18लोकमतनं ही बातमी दिली आहे. ही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

एका महाविद्यालयात परिषदेदरम्यान हत्या झाली होती. त्यानंतर निवडणुका बंद झाल्या होत्या. त्यावर निवडणुका परत सुरू कराव्या असा अहवाल लिंगडोह समितीकडून देण्यात आला होता.

"निवडणुकीवेळी महाविद्यालयातील प्राचार्यांचा त्यात हस्तक्षेप नसेल. विद्यापीठ केंद्रात मतमोजणी केली जाईल. त्यामुळे संघर्ष टाळता येईल. निवडणुकीत सहभागी विद्यार्थ्यांचं वय 25च्या आत असावं आणि संबंधित विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा असता कामा नये. पुढील शैक्षणिक वर्षांपासून या निवडणूक घेण्यात येणार आहे," असं तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.

3. इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत भारताची 23 स्थानांनी झेप

'इज ऑफ डुइंग बिझनेस' म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने सलग दुसऱ्या वर्षी मोठी झेप घेतली आहे, लोकमतनं ही बातमी दिली आहे.

व्यवसाय करण्यासाठी सुलभ असलेल्या देशांची यादी जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येते. यंदा 'इज ऑफ डुइंग बिझनेस'च्या क्रमवारीत भारतानं 23 स्थानांची प्रगती करत 77वे स्थान पटकावले आहे.

गतवर्षी या क्रमवारीत भारत 100व्या क्रमांकावर होता. गेल्या दोन वर्षांत व्यवसाय सुलभ देशांच्या क्रमवातील भारताचे स्थान सुधारले आहे.

4. बंदी घातलेल्या पॉर्नसाईटची पळवाट

भारत सरकारनं 827 पॉर्न साईटवर बंदी घातली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. या पॉर्न साईटचं सबस्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांत नाराजी असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Puneet Barnala

Pornhub या साईटवर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅफिक भारतातून येते (US आणि UK यांच्यानंतर). सरकारच्या बंदीवर पळवाट म्हणून त्यांनी Pornhub.net ही साईट सुरू केली आहे. तर इतर काही साईटसनी त्यांच्या वापरकर्त्यांना मोबाईल अॅप डाऊनलोड करायचा सल्ला दिला आहे, असं ही बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, #pornban हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. सरकारचं हे पाऊल नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

5. राम मंदिरासाठी जागा खरेदी करा - RSS

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी जागा खरेदी करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारकडे केली आहे. द वीकनं ही बातमी दिली आहे.

ज्याप्रमाणे जागा मिळवून सरदार पटेल यांचा पुतळा बांधला त्याप्रमाणेच अयोध्येत जागा खरेदी करा आणि कायदा करून राम मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी RSSनं केंद्र सरकारकडे केली आहे.

RSSचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "राम मंदिराचा मुद्दा फक्त हिंदू आणि मुस्लिमांपुरता मर्यादित नाही. तर ते स्वाभिमान आणि गर्वाचं प्रतीक आहे. सरकारनं कायदा करावा आणि पटेलांचा पुतळा बांधला तसं जागा खरेदी करून राम मंदिर उभारावं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)