काँग्रेस, TDP युती : राहुल गांधींचा मास्टरस्ट्रोक की हतबलता?

  • फैजल मोहम्मद अली
  • बीबीसी प्रतिनिधी
राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू

फोटो स्रोत, TWITTER/@INCINDIA

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात काँग्रेस आणि TDP यांच्यातलं नवीन समीकरण काय सांगतं?

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात एक बैठक झाली.

त्यात, भाजपविरोधी महाआघाडीसाठी एक सामायिक कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्यात राजकीय पक्षांशी प्राथमिक बोलणी करण्याची जबाबदारी नायडू यांच्यावर देण्यात आली.

याच बैठकीसाठी नायडू गुरुवारी सकाळीच खास दिल्लीत आले आणि दुपारनंतर ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले.

प्रत्यक्षात, आंध्र प्रदेशच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्र लढतील, अशी चर्चा होतीच.

तेलंगणामध्ये तर या दोन्ही पक्षांमध्ये आधीच युती झालेली आहे.

गुरुवारच्या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, "आमचा एक वेगळा इतिहास आहे. पण आम्ही असं ठरवलं आहे की, त्या दिशेला आता पाहायचं नाही. भविष्यासाठी एकत्र काम करायचं आहे."

यावरून असा अंदाज बांधला जातोय की, आंध्र प्रदेशात या दोन्ही पक्षात यापूर्वीच बोलणी झालेली आहेत. काहींच्या मते, नायडू यांनी काँग्रेसला राजकीय जागा उपलब्ध करुन देऊन खूप मोठी चूक केली आहे.

फोटो स्रोत, TWITTER/@INCINDIA

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 125 जागा आहेत. त्यात एकही जागा काँग्रेसकडे नाही.

आघाडीचा चेहरा कोण?

या राष्ट्रव्यापी विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर कोणतंही थेट उत्तर देण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला. या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य वेळी मिळतील, असं ते म्हणाले.

नायडू म्हणाले की, "तुम्हाला उमेदवारांची नावं जाणून घेण्यात रस आहे आणि आम्हाला देश वाचवण्यात."

सकाळी पवार, अब्दुल्ला आणि नायडू यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, देशातल्या संस्थांमध्ये केंद्र सरकार ज्या पद्धतीनं हस्तक्षेप करत आहे ते पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

नायडू याच संदर्भात तामिळनाडूमध्ये डीएमकेशीही चर्चा करणार आहेत.

एका आठवड्यात नायडू दुसऱ्यांदा दिल्लीला आले. गेल्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेतली होती.

ते लवकरच मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांचीही भेट घेणार आहेत.

फोटो स्रोत, INC@TWITTER

राजकीय विश्लेषक कल्याणी शंकर यांच्या मते, या सर्व नेत्यांना राष्ट्रीय महत्त्त्वाकांक्षा असली तरी हेही सगळ्यांना माहिती आहे की मोदींचा पराभव करण्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे.

आतापर्यंत एनडीएविरोधातली ही महाआघाडी तळ्यात-मळ्यात स्वरुपाचीच आहे, असंही त्या म्हणतात.

1996-97मध्ये युनायटेड फ्रंटच्या काळात नायडू महत्त्वाची भूमिका निभावू शकले होते. त्यांना त्याचीच पुनरावृत्ती करायची आहे शिवाय टीआरएसचे चंद्रशेखर राव यांच्यापुढे एक पाऊल पुढे ठेवायचं आहे.

आंध्र प्रदेशात टीडीपी आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केलेली असतानाच तिथे भाजप आणि जगनमोहन रेड्डी यांचा व्हायएसआर काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवतील, असं शंकर सांगतात. त्यामुळे राहुल गांधींसोबत जाण्यानं नायडूंना राजकीय फायदा होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)