#5मोठ्याबातम्या : राम मंदिरासाठी भाजप खासदार मांडणार खासगी विधेयक

राकेश सिन्हा

फोटो स्रोत, Rakesh Sinha/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

राकेश सिन्हा

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राम मंदिरासाठी भाजप खासदार मांडणार खासगी विधेयक

सुप्रीम कोर्टाने राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली असताना राम मंदिरासाठी राज्यसभेत खासगी विधेयक मांडणार असल्याची घोषणा भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापवलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करा, असं म्हणत भाजप आणि संघावर टीका करणारे लोक या विधेयकाचं समर्थन करतील का, असा सवाल करत सिन्हा यांनी राहुल गांधी, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू, मायावती आदी नेत्यांना आव्हान दिलं आहे, असं ही या बातमीत म्हटलं आहे.

राकेश सिन्हा यांच्या ट्वीटनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर टीका केली आहे. मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाही. जनताच सरकार निवडून देणार आहे, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी भाजपवर टीका केली आहे.

2. जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्याची भावासह हत्या

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्याचे बंधू या दोघांची गोळी घालून हत्या करण्यात आली. NEWS18लोकमतनं ही बातमी दिली आहे.

परिहार हे भारतीय जनता पक्षाचे जम्मू-कश्मीरचे राज्य सचिव होते आणि त्यांच भाऊ सरकारी कर्मचारी होते. गुरुवारी सायंकाळी दोघेही तपन गली या भागात असलेल्या घरी जात होते. तेवढ्यात अचानक त्यांच्यावर हल्ला झाला.

हा दहशतवादी हल्ला होता की आणखी काही याचा तपास पोलीस करत आहे. राज्य शासनाने अनिल परिहार यांना सुरक्षा प्रदान केली होती. परिहार यांच्यावर हल्ला होताना त्यांचे सुरक्षारक्षक कोठे होते, याचीही चौकशी सुरू आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. ऐन दुष्काळात 1 लाख 70 हजार टँकर पाणी वाया

गंगापूर धरणातून दिवसभर पाण्याच्या विसर्गानंतर अचानक पाणी थांबवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, yellowcrestmedia

जलसंपदा विभागाच्या या नियोजनशून्यतेमुळे 1 लाख 70 हजार टँकर पाणी वाया गेलं आहे. 84 लाख 95 हजार कुटुंबांना हे पाणी वापरता येऊ शकलं असतं, असं बातमीत म्हटलं आहे.

नाशिकची भविष्यातील जलसिंचनाची तूट लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा विभागानं म्हटलं आहे.

4. राज्य सरकारकडून 200 सर्कलमध्ये दुष्काळ जाहीर

राज्य सरकारनं टंचाईसदृश 29 तालुक्यांतील 200 सर्कलमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

यापूर्वी राज्य सरकारनं 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता.

फोटो स्रोत, Niranjan Chhanwal/BBC

केंद्राच्या निकषात बसणाऱ्या या तालुक्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. तर राज्यानं जाहीर केलेल्या मंडळांना राज्य सरकारला मदत करावी लागणार आहे. यासाठी सरकारवर किमान दीड ते दोन हजार कोटींचा भार पडेल, असं बातमीत म्हटलं आहे.

5. रडली नाही म्हणून पतीच्या खुनात दोषी ठरलेली महिला निर्दोष

पतीच्या निधनानंतर रडली नाही या आधारे पतीच्या खुनात दोषी ठरवण्यात आलेल्या पत्नीला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. या महिलेची जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. ही घटना आसाममधील आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर ही महिला रडली नाही, तसेच पतीसोबत दिसलेली ती शेवटची व्यक्ती होती, या दोन पुराव्यांच्या आधारावर या महिलेला पतीच्या खुनात दोषी ठरवण्यात आलं होतं. खालच्या कोर्टाने दिलेली ही शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम केली होती. या महिलीने यावर सुप्रीम कोर्टात अपील दाखलं केले होते.

केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर तिला दोषी ठरवणं योग्य नाही, असा निकाल न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि नवीन सिन्हा यांनी दिला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)