'आई, मला वाटतं मी जिवंत राहणार नाही...' म्हणणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?

मोर मुकूट Image copyright MOR MUKUT

कट्टरवाद्यांचा हल्ला झाला आहे...( गोळ्यांचा आवाज)

आम्ही दांतेवाडाला आलो होतो. निवडणुकांच्या कव्हरेजसाठी. एका रस्त्याने जात होतो. (...गोळ्यांचा आवाज)

आमच्यासोबत लष्कर होतं. अचानक आम्ही खाली पडलो. नक्षलवाद्यांचा हल्ला झाला आहे. मम्मी मी वाचलो तरी खूप आहे. मम्मी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित मी मारला जाई. परिस्थिती ठीक नाही. कळत नाहीये, समोर मृत्यू असून भीती का वाटत नाहीये? वाचणं कठीण आहे माझं. सोबत सहा-सात जवान आहेत. चारी बाजूंनी आम्हाला घेरलं आहे. पण तरी देखील मी हेच म्हणे....

मोबाईल कॅमेरा फिरतो. अॅंबुलन्स बोलवा असा आवाज ऐकू येतो. दादा थोडं पाणी मिळेल का? सुरक्षित आहात का ?

गेल्या 36 तासांत व्हायरल झालेल्या व्हीडिओचा हा काही भाग आहे. दूरदर्शनचे असिस्टंट लाइटमन मोर मुकूट शर्मा यांनी त्यांच्या आईसाठी हा व्हीडिओ तयार केला होता.

पण अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत. हा व्हीडिओ ज्या आईसाठी बनवण्यात आला त्यांच्यापर्यंत तो पोहोचला का? जेव्हा त्यांनी व्हीडिओ पाहिला असेल तेव्हा त्यांच्यावर काय प्रसंग ओढावला असेल?

आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मृत्यू समोर दिसत असताना असा एक व्हीडिओ बनवावा असं त्यांना कसं वाटलं?

मोर मुकूट हे सहा भावंडांपैकी सर्वांत धाकटे आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कुटुंबात तीन मोठ्या बहिणी, दोन भाऊ, वहिनी आणि आई आहेत.

Image copyright MOrmukut/bbc

मोर मुकूट यांची वहिनी नीतू शर्मा या पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांनी असं म्हटलं होतं की मोर मुकूट सुखरूप आहेत. त्या सांगतात, "मला 30 तारखेला एका अनोळखी नंबरवरून सारखा फोन येत होता. मी तो उचलणार तर कट झाला. मग मी पुन्हा फोन लावला. तिकडून आवाज आला. तुमचा कोणी नातेवाईक दूरदर्शनमध्ये आहे का? घ्या त्यांच्याशी बोला. पुढचा आवाज मोर मुकूट यांचा होता."

"वहिनी इथं नक्षली हल्ला झाला. आमचा कॅमेरामन ठार झाला. पण मी सुखरूप आहे. आईला काही नका सांगू," भेदरलेल्या आवाजात मोर मुकूट यांनी आपल्या वहिनींना सांगितलं.

समोर मृत्यू दिसताना आईसाठी व्हीडिओ बनवण्याऱ्या मोर मुकूट यांनी आपल्या हल्ल्याची बातमी आईला सांगू नका असं का सांगितलं असावं?

मुकूट यांनी सांगितलं, "माझ्या मनात दोन युद्धं सुरू होती. एक युद्ध समोर सुरू होतं. तिथं गोळ्यांचा आवाज येत होता. समोर माझ्या सहकाऱ्याचा चेहरा दिसत होता. त्याचं शरीर रक्तानं माखलं होतं आणि दुसरं युद्ध माझ्या मनात सुरू होतं. आईचा चेहरा समोर दिसत होता. त्याच स्थितीत मी तो व्हीडिओ बनवला."

दिल्लीला परतल्यावर मोर मुकूट यांनी बीबीसीला हा वृत्तांत फोनवर सांगितला.

Image copyright MOrmukut/bbc

सहा महिन्यांपूर्वी मोर मुकूट यांचे वडील गेले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. घरात सर्वांत धाकटे असल्यामुळे ते आईचे लाडकेही आहेत. दिल्लीला परत येण्याच्या काही तासांपूर्वी त्यांच्या आईने तो व्हीडिओ पाहिला. त्याआधी घटनेचा पूर्ण वृत्तांत त्यांच्या आईला कुणीच सांगितला नव्हता.

हा व्हीडिओ पाहून त्यांची आई त्यांच्या कुटुंबीयांवर चिडली. पण मोर मुकूट संध्याकाळी परतलेले पाहून त्यांच्या आईला आनंद झाला. त्यांनी मोर मुकूट यांना छातीशी घट्ट धरलं.

"जेव्हा माझ्या आईनी मला मिठी मारली तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. तिनं मला काही विचारलं नाही की मी तिला काही सांगितलं नाही. पण तिनं मला छातीशी धरलं आणि माझ्या सर्व चिंता मिटल्या. आता काही जरी झालं तरी मला त्याची रूखरूख वाटणार नाही," भारावलेले मोर मुकूट बीबीसीला सांगतात.

Image copyright MOrmukut/bbc

निवडणुकांच्या कव्हरेजसाठी जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता की तुमच्या कार्यालयाचा तो निर्णय होता? असं विचारलं असता ते सांगतात.

"हा निर्णय माझाच होता. छत्तीसगडला जाण्यासाठी मी माझ्या सेक्शन हेडला विनंती केली होती. मी 14 वर्षांपासून दूरदर्शनसाठी काम करतोय. तेव्हा अशा ठिकाणी जाणं हे नवं नाही माझ्यासाठी. कदाचित तेच कारण असेल की मी घाबरलो नाही.

मोर मुकूट सांगतात, "दिल्लीहून परतल्यावर त्यांची आई आता शांतपणे झोपते."

मुलावर आलेलं संकट दूर झाल्यानंतर त्यांच्या मनावरचं ओझं आता तरी हलकं झालं असावं.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)