अपहरण झालेली मुलगी, पिशवीत सापडलेली हाडं आणि आठवणींचं घर

  • सौतिक बिश्वास
  • बीबीसी प्रतिनिधी
नवरुना चक्रवर्ती

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

नवरुना चक्रवर्ती हिचं सप्टेंबर-2012मध्ये अपहरण झालं.

बिहारमध्ये सहा वर्षांपूर्वी बारा वर्षांच्या एका मुलीचं तिच्या खोलीतून मध्यरात्री अपहरण करण्यात आलं. ही काही सामान्य घटना नव्हती. त्यामुळे देशाची सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. पण त्यांचेही हात रिकामेच आहेत. तरीदेखील आपली मुलगी जिवंत आहे, असं तिच्या पालकांना अजूनही का बरं वाटत असेल?

पावसाळ्याचे दिवस होते. अतुल्य चक्रवर्ती मध्यरात्री बाथरुमला जायला उठले. त्यांच्या अंगणात दोन बल्ब होते. रात्री चोरांपासून सावध राहण्यासाठी म्हणून दोन्ही दिवे रात्रभर सुरू असायचे. मात्र त्या रात्री दोन्ही बंद होते.

अतुल्य यांना थोडं विचित्र वाटलं.

ते खोलीत गेले. पत्नी मोईत्री हिला उठवलं आणि विचारलं की, ती आज रात्री झोपण्यापूर्वी दिवे लावायला विसरली होती का?

ती विसरली नव्हती. मग दोघेही वऱ्ह्यांड्यात आले.

अतुल चक्रवर्ती कुटुंबासोबत बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये राहतात. त्यांच्या दोन मजल्याच्या घरात खालच्या दोन्ही खोल्यांची दारं वऱ्हांड्यात उघडायची. वऱ्हांड्यासमोर अंगण होतं.

दोघांनीही अंगणातले दिवे लावले आणि भीतीने त्यांचा थरकाप उडाला.

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

नवरुना चक्रवर्तीची खोली

वऱ्हांड्याचं दार उघडं होतं. घाबरलेल्या मोईत्री यांनी मुलीच्या खोलीकडे धाव घेतली. या दोघांची बारा वर्षांची मुलगी नवरुना याच खोलीत झोपायला गेली होती.

सडपातळ बांधा आणि बुजऱ्या स्वभावाची नवरुना दिवसभर घरीच होती. तिने आज हाताला मेहंदी लावली. टिव्हीवर कार्टुन पाहिलं आणि दूध-पाव खाऊन झोपायला गेली.

आईने तिच्या खोलीतले दिवे लावले. आत पलंग, पलंगावर डासांसाठी लावलेली जाळी, पलंगावरची उशी आणि व्यवस्थित घडी करून ठेवलेली शाल सगळं जागच्या जागी होतं. मात्र नवरुना नव्हती.

"ती इथे नाही! ती इथे नाही! " घाबरलेल्या आईने आरडाओरड सुरू केली.

नवरुना चक्रवर्ती गायब झाली होती.

मंगळवार 18 सप्टेंबर 2012ची ती रात्र होती.

ती 'गायब' झाली

खोलीच्या खिडकीचा गज वाकवून कुणीतरी नवरुनाच्या खोलीत शिरलं असेल, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या घरात येण्यासाठी एक छोटीसा बोळ आहे. या घरात येण्यासाठीचा तोच एकमेव मार्ग आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या अंदाजाप्रमाणे त्या अज्ञात अपहरणकर्त्याने झोपलेल्या नवरुनाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करून तिला वऱ्ह्यांडात आणलं असण्याची शक्यता आहे. वऱ्ह्यांड्याचं दार आतून उघडून साथीदारांना आत घेतलं असावं आणि साथीदारांच्या मदतीने मुलीला मागच्या दारातून पळवून नेलं असावं. कारण समोरचं दार आतून बंद होतं.

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

घराच्या विक्रीचा वाद हे अपहरणाचं कारण पोलीस मानतात.

नवरुनाच्या आई-वडिलांना ती अजूनही जिवंत आहे, असं वाटतंय. मात्र तिचा मृत्यू झाला असावा, असं तपास अधिकाऱ्यांना वाटतं. तिचं अपहरण करणारे मात्र अजूनही मोकाट आहेत.

घटनेच्या महिनाभरानंतर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती. त्यात एक चक्रवर्ती यांचाच दूरचा नातेवाईकही होता.

ते काहीतरी माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र या गुन्ह्यात त्यांचा सहभाग सिद्ध करता आला नाही आणि त्यामुळे जवळपास नऊ महिन्यांनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

पाठोपाठ 26 नोव्हेंबरला चक्रवर्ती यांच्या घराजवळच्याच एका उघड्या नाल्यात प्लॅस्टिकच्या बंद पिशवीत सांगाडा सापडला. चक्रवर्ती सांगतात, "त्या दिवशी तिथे काहीतरी गोंधळ सुरू होता. मग कॉर्पोरेशनची माणसं आली त्यांनी नाल्यातून पिशवी काढली आणि पोलिसांना दिली."

हाडांची तपासणी

त्याच दिवशी पोलिसांनी या पीडित कुटुंबाला त्यांच्या मुलीचा सांगाडा (हाडं) सापडल्याचं कळवलं. नवरुनाच्या आईवडिलांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी ती हाडं नवरुनाची आहेत, हे मान्य करायला नकार दिला आणि पोलिसांकडे पुरावा मागितला.

पुढच्याच महिन्यात सरकारी दवाखान्यात त्या हाडांची न्यायवैद्यक चाचणी करण्यात आली. शरीर पूर्णपणे गळून गेलं होतं. त्या पिशवीत गळ्याचं हाड, हाताचं मोठं हाड, पायाची हाडं सापडली.

डॉक्टरांनी त्या सांगाड्यामधून एक दाढ, बरगडी, पाठीच्या मणक्याची काही हाडं आणि मांडीच्या काही कुजलेल्या स्नायूंची डीएनए चाचणी केली.

डॉक्टरांनी अहवालात नोंद केली की, "ती हाडं मानवी शरिरातली आहेत. 13 ते 15 वर्षं वयाच्या मुलीची ही हाडं आहेत आणि सांगडा आणला त्याच्या 10 ते 20 दिवसांआधी त्या मुलीचा मृत्यू झाला असावा. मृत्यूचं नेमकं कारण सांगता येत नाही."

या सांगाड्यावर जे कपडे सापडले ते कुमारावस्थेतील एखाद्या मुलीचे असावे, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.

न्यायवैद्यक डॉक्टरांनी संपूर्ण सांगाडा नाही तर त्यांच्याकडे एका डब्यात पाठवण्यात आलेली काही हाडं तपासली होती. त्या डब्यात सांगाड्यावर सापडलेला एक काळा टॉप, नारंगी-पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र आणि एक काळा स्कर्ट होता.

ही हाडं आपल्या मुलीचीच आहेत, यावर नवरुनाच्या आई-वडिलांनी कधीच विश्वास ठेवला नाही. सांगाड्याची ती पिशवी मुद्दाम गटारात टाकण्यात आली होती, असंही त्यांचं म्हणणं आहे.

2014मध्ये झालेली डीएनए चाचणी ते मान्य करतात. मात्र त्याचा अहवाल त्यांना देण्यातच आलेला नाही.

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

नवरुना चक्रवर्तीच्या रबरी चपला आताही तशाच आहेत.

अतुल्य चक्रवर्ती म्हणतात, "ती हाडं खरंच माझ्या मुलीची होती तर डीएनए चाचणीचा अहवाला आम्हाला का देण्यात आला नाही."

2014मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. त्यांच्या मते जे घडलं ती एक 'अविचारी अपहरण आणि खुनाची घटना' आहे आणि घर बळकावण्याच्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे.

कायद्याचं राज्य नसलेलं शहर

भारताच्या अतिशय गरिब राज्यांपैकी एक असलेल्या राज्यातलं मुझफ्फरपूर एक गजबजलेलं शहर आहे. स्वस्त कपडे, लाखाच्या बांगड्या आणि गुंडगिरी यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

खंडणीसाठी अपहरण आणि खून तर इथे सामान्य गोष्ट आहे. बळजबरीने आणि धमकावून जमिनी हडपणं हेदेखील सर्रास होतं. मुझफ्फरपूरमध्ये लँड माफिया फोफावले आहेत. स्त्रियांसाठी तर रस्त्यावर चालणंही कठीण आहे. रस्त्यावर कुणीही येऊन छेड काढू शकतो, त्यांना कसलाच धरबंद नाही, असं इथल्या महिला सांगतात.

चक्रवर्ती यांचं राहतं घर जवळपास शंभर वर्षं जुनं आहे. घर गजबजलेल्या भागात असलं तरी मोक्याच्या ठिकाणी आहे. हे घर विकून शहर सोडण्याचा चक्रवर्ती यांचा विचार होता. 66 वर्षांचे अतुल्य चक्रवर्ती एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) होते.

घटनेच्या जवळपास पंधरा दिवस आधीच चक्रवर्ती यांनी घराच्या विक्रीखतावर सह्या केल्या होत्या. सहा खोल्या, पाम, नारळ आणि पेरुची झाडं असलेलं अंगण, एक विहिर आणि एक छोटं आउटहाउस असलेलं हे घर त्यांनी तीन कोटी रुपयांना विकलं होतं.

त्यांनी तीन कोटी रुपयांना घराचा सौदा केल्याची बातमी पसरताच त्यांच्यावर हा सौदा रद्द करून लँड माफियाला घर विकण्यासाठी दबाव येऊ लागला होता. इतकंच काय तर हा सौदा रद्द करा म्हणून पोलीसही घरी येऊन गेल्याचं ते सांगतात.

चक्रवर्ती सांगतात, "मला माहिती आहे या घराचा सौदा रद्द करून दुसऱ्या बिल्डरला घर विकावं, असं ज्या गुंडांना वाटायचं त्यांच्याशीच पोलिसांनी हातमिळवणी केली आहे. मी तसं करत नव्हतो आणि त्यानंतर माझी मुलगी बेपत्ता झाली."

अपहरणानंतर आता हे घर विकत घ्यायला कुणीच तयार नाही.

पुढची काही वर्ष पोलिसांनी नवरुनाचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिक्षक सगळ्यांची चौकशी केली. चक्रवर्ती यांच्या घराची झडती घेण्यात आली. नवरुनाच्या दोन डायरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यातल्या एका डायरीत काही फोटो आणि स्टिकर्स होते. तर दुसऱ्या डायरीत नवरुनाचे तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं वर्णन केलं होतं. अर्थात त्याचं नाव नव्हतं, असा पोलिसांचा दावा आहे. (यात काही प्रेमाचा अँगल आहे का, याचा त्यावेळी पोलीस तपास करत होते.) हे ऑनर किलिंगचं तर प्रकरण नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तिच्या घरची सेप्टिक टँकही तपासली.

देशभरात पोलीस पथकं पाठवण्यात आली. बसस्टॉप्स, रेल्वे स्टेशन्स अशा गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्यात आली. चक्रवर्ती कुटुंबीयांची मोठी मुलगी परगावात एका हॉस्टेलमध्ये राहते. तिथेही चौकशी झाली.

'पोलिसांचा हात'

आई-वडील आणि संशयित यांच्यासह जवळपास शंभर जणांचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले.जवळपास अर्धा डझन मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून त्या रात्री घराच्या आसपास असलेल्या मोबाईल टॉवरवरून ज्या हजारो फोनवर बातचीत झाली त्या सर्वांचा डेटा मागवण्यात आला. मानवी तस्करीच्या शक्यतेमुळे जवळच्या रेड लाईट एरियासह अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

"नवरुनाला शोधण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. कसून चौकशी करण्यात आली. शास्त्रीय तपास केला," असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर पोलीस तपास आता जवळपास थांबल्याचं वाटत होतं. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं.

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

अतुल्य चक्रवर्ती - नवरुनाचे वडिल.

गेल्या महिन्यात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं त्यांनी एप्रिलमध्ये आणखी सहा संशयितांना अटक केली आहे. आठ दिवस त्यांची चौकशी झाली आणि त्यांना 90 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांची घरं आणि कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. मात्र काहीच हाती लागलं नाही.

मात्र यानंतर या तपासाला वेगळं वळण लागलं. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि गेल्या महिन्यात कोर्टात अहवाल सादर करून तपास अधिकारी आणि मुझफ्फरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख यांची 'नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग चाचणी' करण्याची विनंती केली.

नार्को चाचणीचे पुरावे भारतीय न्यायव्यवस्था मान्य करत नाही. मात्र त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या चाचणीत संशयिताला सोडियम पेंथॅनॉल नावाचं एक औषध दिलं जातं. यामुळे व्यक्तीची आकलनशक्ती बधीर होते आणि चौकशीदरम्यान खोटं बोलणं कठीण होतं.

पूर्वीचे पोलीस अधिकारी भ्रमित करणारी माहिती देत आहेत. मात्र या प्रकरणातली प्रशासन आणि माफिया यांच्या अभद्र युतीचा शोध घेल्याशिवाय शांत बसणार नाही, असं गुन्हे शाखेचं म्हणणं आहे.

आई-वडिलांचा आक्रोश

चक्रवर्ती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीची वाट बघत रात्र-रात्र जागणारे अतुल्य चक्रवर्ती हार्ट पेशंट आहेत. रात्रीची झोपच उडाल्याने त्यांना आता झोपेच्या गोळ्यांचा आसरा घ्यावा लागतोय.

घटनेला दोन वर्ष उलटल्यापासून मोईत्री चक्रवर्ती रोज पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मुलीबद्दल विचारतात. "मला माझी मुलगी परत करा", एवढीच त्यांची मागणी आहे.

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

इतकी वर्षं उलटल्यावर आता अतुल्य चक्रवर्ती स्वतःच आपल्या मुलीच्या शोध घेत आहेत. अतुल्य चक्रवर्ती यांनी आतापर्यंत जवळपास चार गिगाबाईट एवढे प्रचंड कॉल रेकॉर्ड्स गोळा केले आहे. त्यात त्यांचं पोलिसांसोबत झालेलं संभाषण आणि मुलगी बेपत्ता झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या अज्ञात कॉलचे रेकॉर्ड आहेत.

ते म्हणतात, "यातल्या काही कॉल्समध्ये मी माझ्या मुलीचा आवाजही ऐकला आहे."

त्यांनी त्यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात बारिक-सारिक माहिती असलेल्या जवळपास पाच डायरी लिहिल्या आहेत. त्यात तपास अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचे तपशील आहेत. त्यांनी या तपासावर एक पुस्तकही लिहायला घेतलं आहे. त्या पुस्तकाची 170 पानं लिहूनही झाली आहेत. त्यांनी राजकारणी, न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिली आहेत. स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन कृमगतीने होणाऱ्या तपासाबद्दल तक्रार केली. मात्र पदरी अजून निराशाच आहे.

प्रत्येक दृश्यानुसार आवाजाचा चढउतार करत एखाद्या गुप्तहेराच्या आवेशात ते आपली डायरी वाचतात, जणू त्यांना जगाला सांगायचं आहे, "मी काय म्हणतोय ऐका, या अपहरणामागे कोण आहेत, मला माहिती आहे. कुणी मला गांभिर्याने का घेत नाही?"

अपराधबोध, अतिव दुःख आणि सूडभावनेतून हे घडत असल्याचं ते सांगतात. स्वतःच्या मुलीचं रक्षण करू न शकल्याने आलेली अपराधीपणाची भावना, इतकी वर्षं ती बेपत्ता आहे याचं दुःख तर सामान्य माणसाला न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबासाठी जबाबदार यंत्रणेविरोधातली सूड भावना...

हताश अतुल्य चक्रवर्ती विचारतात, "मी असा कसा जगू? या घरात किती काळ राहू शकतो? ती घरी आली की आम्ही हे घर सोडून देऊ."

काळोख आणि शोकांतिकेच्या ओझ्याखाली पिचलेलं मोडकळीला आलेलं हे घर आता अस्वस्थ करणाऱ्या आठवणीचं संग्रहालय बनलं आहे. धूळ झटकल्याने तिच्या आठवणीही पुसून जातील या भीतीमुळे त्यांनी आता नवरुनाची खोली स्वच्छ करणंही सोडून दिलं आहे.

नवरुनाची आई म्हणते, "नवरुना सगळीकडे आहे. आमच्या आसपास... भोवताली बघा आणि तुम्हाला तिचं अस्तित्व जाणवेल."

बाहेरच्या भिंतीवर अडकवलेल्या एका बॅगेत तिचा तपकिरी रंगाचा स्कर्ट, टाय आणि पांढरी टोपी असलेला शाळेचा गणवेश टांगला आहे. दाराबाहेर तिचा तपकिरी टॉवेल अजूनही तसाच आहे. जरा मळला आहे. ती बेपत्ता झाली तेव्हापासून तिथेच आहे. शाळेत जाण्यासाठी घेऊन दिलेली गुलाबी रंगाची सायकल कोपऱ्यात अजूनही उभी आहे.

काचेचं दार असलेल्या कपाटात तिच्या वस्तूही तशाच आहेत. तिची प्लॅस्टिकची बाहुली, दोनशे रुपये ठेवलेली तिची लाल पर्स, दारामागे लावलेलं तिच्या शाळेचं वेळापत्रक, कोपऱ्यातलं अभ्यासाचं टेबल, तिच्या खोलीत टांगलेला तिचा गुलाबी ड्रेस सगळं जिथच्या तिथे...

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

फोटो कॅप्शन,

नवरुनाची सायकल

ड्रेसिंग टेबलवरची तिची मॉइश्चराईजिंग क्रिमही तिथेच आहे. तिच्या वडिलांच्या टेबलावर बसून ती चित्र काढायची. ती तिची चित्राची वही, तिची गुलाबी शिटीदेखील हलवलेली नाही आणि सोबतच आहेत तिच्या वडिलांची बीपीची औषधं...

दुःख आणि वेदनेचं वास्तव्य असणाऱ्या या घरात आता उभं राहणंही कठीण वाटतं.

तिची आई सांगत होती, "नवरुना कधीही येईल. म्हणून तिच्या वस्तू सांभाळून ठेवल्या आहे. आता ती अठरा वर्षांची झाली असेल, कशी बरं दिसत असेल?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)