एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप, पत्नीने केला अकबर यांचा बचाव

एमजे अकबर, यौन उत्पीड़न Image copyright Getty Images

माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी सोशल मीडियावर केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

एशियन एज या वृत्तपत्रात अकबर यांच्या टीममध्ये एके काळी काम करणाऱ्या पत्रकार पल्लवी गोगोई यांनी आरोप केला आहे की 23 वर्षांपूर्वी त्यांच्यावर अकबर यांनी वारंवार बलात्कार केला.

वॉशिंग्टन पोस्ट या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या आत्मकथनात त्यांनी म्हटलं आहे की इतर महिलांना बळ मिळावं म्हणून त्या या कठीण प्रसंगाबद्दल लिहीत आहेत.

एम. जे. अकबर यांनी हा गंभीर आरोप फेटाळला असून पल्लवी यांच्यासोबतचे संबंध परस्पर सहमतीने होते, असं म्हटलं आहे. एम. जे. अकबर यांच्या पत्नी मल्लिका जोसेफ यांनीही दावा केला आहे की पल्लवी यांचे अकबर यांच्यासोबत प्रेमाचे संबंध होते.

पल्लवी गोगोई सध्या अमेरिकेतल्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये चीफ बिझनेस एडिटर आहेत. त्या आता अमेरिकेच्या नागरिक आहेत आणि तिथेच राहतात.

पल्लवी यांनी लिहिलंय की त्यांना दोन आठवड्यांपूर्वी भारतात सुरू असलेल्या #MeToo चळवळीविषयी आणि अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी समजलं. तेव्हाच त्यांनी स्वतःच्या अनुभवाविषयी लिहिण्याचं ठरवलं.

हॉटेलच्या रूमवर बोलवलं

पल्लवी यांनी दावा केलाय की त्या जयपूरमध्ये एक बातमी कव्हर करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा तिथं अकबरही आले होते. त्यांनी पल्लवींना बातमीविषयी बोलण्यासाठी हॉटेलच्या रूमवर बोलवलं आणि त्यांच्यावर तिथे बलात्कार केला.

पल्लवींनी पुढे म्हटलंय की अकबर यांनी त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला, पण लाज वाटल्यामुळे त्या याविषयी कुणाशी बोलल्या नाहीत. आपल्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही किंवा आपल्याच चारित्र्यावर शंका घेतील, अशी त्यांना भीती वाटली, असं त्यांनी लिहिलंय.

Image copyright Getty Images

अकबर आणि त्यांच्या पत्नीचा इन्कार

आधी एम. जे. अकबर यांच्यावर आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. नंतर त्यांनी आरोप फेटाळून मंत्रिपद सोडायला नकार दिला होता. पण आरोप जसजसे वाढत गेले, तसा त्यांच्यावरचा दबाव वाढला आणि त्यांनी राजीनामा दिला.

पण पल्लवी यांनी आरोप केल्यानंतर अकबर यांनी ते लगेच फेटाळले. एवढंच नाही तर अकबर यांच्या पत्नी मल्लिका जोसेफ पहिल्यांदाच नवऱ्याच्या बाजूने उभ्या राहिल्या. पल्लवी आणि अकबर यांच्यातले संबंध जाहीर होते आणि ते मला पसंत नव्हते, असं मल्लिका यांनी म्हटलं आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मल्लिका यांनी म्हटलं, "माझ्या नवऱ्यावर अनेक आरोप लावण्यात आले. तरीही पूर्ण MeToo चळवळीदरम्यान मी शांत राहिले. पण वॉशिंग्टन पोस्टमध्ये पल्लवी गोगोई यांनी लिहिलेल्या लेखाने मला बोलायला भाग पाडलं."

Image copyright iStock

"जवळजवळ 20 वर्षांपूर्वी पल्लवी माझ्या घरी दुःख आणि भांडणाचं कारण होती. माझे पती रात्री उशिरापर्यंत पल्लवीशी फोनवर बोलायचे आणि सगळ्यांसमोर एकमेकांच्या जवळ यायचे. एशियन एजच्या एका पार्टीत त्या दोघांनी अतिशय जवळ येऊन डान्स केला होता. यावरून माझं माझ्या नवऱ्याशी भांडणही झालं. त्यानंतर अकबर यांनी घर आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. पल्लवी आता खोटं का बोलत आहे, हे मला कळत नाहीये."

अकबर यांच्यावर अनेक आरोप

67 वर्षांच्या एम. जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आतापर्यंत लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर पहिला आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात अकबर यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

त्यानंतर अनेक महिला प्रिया रमाणी यांच्या बाजूने उभ्या राहिल्या. कोर्टाची सुनावणी सुरू होण्याआधी 17 ऑक्टोबर रोजी अकबर यांनी राजीनामा दिला.

मी ही लढाई वैयक्तिक पातळीवर लढू इच्छितो. मला पदाचा वापर करायचा नाहीये, म्हणून मी राजीनामा देतोय, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)