#5मोठ्याबातम्या : यवतमाळमधील नरभक्षक वाघीण ठार - वनविभागाची कारवाई

मध्य भारतात एका वाघिणीने धुमाकूळ घातला आहे.

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. यवतमाळमधील नरभक्षक वाघीण ठार

यवतमाळ येथील पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला वनविभागाने ठार केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. टी -1 या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागच्या दीड महिन्यांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

शुक्रवारी रात्री वन विभागानं या वाघिणीला ठार केलं आहे. या वाघिणीने आतापर्यंत 14 जणांचा जीव घेतला आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

या वाघिणीला पकडण्यासाठी 5 शार्प शूटर, 3 मोठे पिंजरे, 500 कर्मचारी आणि इटालियन कुत्रे तैनात करण्यात आले होते.

2. रफाल व्यवहार : दसोमुळे अंबानींच्या कंपनीला 284 कोटींचा फायदा

रफाल करारानंतर फ्रान्सच्या दसो या कंपनीनं अनिल अंबानी यांच्या मालकीच्या एका कंपनीतून 35 टक्के शेयर विकत घेतले. या व्यवहारात अंबानींच्या कंपनीला 284 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, अशी बातमी द वायरनं दिली आहे.

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE

अंबानी यांची कंपनी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड (आरएडीएल) तोट्यात असून तिच्यापासून मिळणारा कर शून्य रुपये आहे. पण दसोनं 35 टक्के भाग खरेदी केल्यानंतर या कंपनीला 284 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तोट्यात असणाऱ्या कंपनीचे दसोनं शेअर कसे खरेदी केले, ही बाब अजून स्पष्ट झाली नाही, असं बातमीत म्हटलं आहे.

रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड (आरएडीएल)मध्ये दसोनं केलेल्या गुंतवणुकीचा रफाल कराराशी काहीही संबंध नाही, असा खुलासा रिलायन्सने केला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

3. 59 मिनिटांत 1 कोटींचं कर्ज - मोदी सरकारची नवी सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज मिळण्याची तरतूद केली आहे. अवघ्या 59 मिनिटात म्हणजेच एका तासाच्या आत एक कोटीचं कर्ज उपलब्ध होणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Dan Kitwood/GETTY

सध्या 59 मिनिटांत एक कोटीचं कर्ज मिळण्याची सोय आताच्या व्यावसायिकांसाठीच आहे. नव्या व्यावसायिकांनाही लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल. कर्ज मंजूर होताच एका आठवड्यात रक्कम बँक खात्यात जमा होईल.

अर्ज मंजूर झाल्यावर प्रक्रिया शुल्क एक हजार रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. या कर्जाच्या व्याजावर दोन टक्के इतकी अनुदानातून सूट देण्यात येईल, असं बातमीत म्हटलं आहे.

4. ओला, उबर चालकांचा संप मागे

मुंबईत सुरू असलेला ओला, उबर चालकांचा संप 12 दिवसांनंतर संपला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ओला, उबर चालकांनी संप मागे घेतला आहे.

15 नोव्हेंबरपर्यंत बेस प्राइस आणि अन्य मागण्या मान्य करण्यासाठी कंपन्यांना वेळ देण्यात आला आहे. एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १६ रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १८ रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान १०० ते १५० रुपये भाडेदर निश्चित (fixed fare ) ठेवावे, अशी कॅब चालकांची मागणी होती.

5. लग्नाच्या 5 महिन्यांतच लालूंच्या मुलाने ऐश्वर्या रायला मागितला घटस्फोट

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तेजप्रताप यांचा विवाह 5 महिन्यांपूर्वीच ऐश्वर्या राय हिच्याशी झाला होता. NEWS18लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, SHAMIM AKHTAR

फोटो कॅप्शन,

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय

घटस्फोटासाठी तेजप्रतापने पाटनाच्या न्यायलयात अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)