'अवनी' वाघीण यवतमाळमध्ये ठार, गावकरी आनंदात पण सोशल मीडियावर शोक

यवतमाळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या 'नरभक्षक' वाघिणीला शुक्रवारी रात्री उशिरा राळेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं. T1 किंवा अवनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सहा वर्षांच्या वाघिणीने 14 जणांचा जीव घेतल्याचा आरोप होता.

वाघिणीला मारणाऱ्या टीममध्ये तीन वनकर्मचारी, असगर नावाचा एक शार्पशूटर आणि एका वाहनचालकाचा समावेश होता, असं वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी A. K. मिश्रा यांनी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितलं.

पण प्रशासनाने तिला पडकण्याचा प्रयत्नच केला नाही आणि तिला थेट ठारच करण्यात आलं, असा आरोप प्राणीहक्क कार्यकर्त्यांनी केला आहे.

T1 या वाघिणीने 2016पासून 20 महिन्यांत 10 लोकांना ठार केलं होतं तर ऑगस्टमध्ये 3 लोकांचा जीव घेतला होता. या वाघिणीने 28 ऑक्टोबरलाही एका व्यक्तीला ठार केले होते, असं वनविभागाने म्हटले आहे.

या 13 मृतांपैकी 7 जणांच्या शरीरांवरील जखमांतील वाघिणीच्या लाळेची DNA चाचणी घेण्यात आली होती. त्यातील 5 व्यक्तींचा मृत्यू वाघिणीच्या हल्ल्यात झाल्याचं निष्पन्न झालं होतं. वाघीण हल्ला केल्यानंतर तिचं भक्ष्य फरपटत नेत असल्याने कधी शीर धड वेगळी झालेली आढळली तर कधी मृताच्या पायाचा लचका तोडल्याचं आढळलं.

Image copyright Forest Department
प्रतिमा मथळा 'अवनी'ला गोळी मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा वनविभागाचा दावा आहे.

म्हणून गावकऱ्यांमध्ये दहशत होती आणि कुणीही रात्री बाहेर पडू नये, अशा सूचना वन विभागाने जारी केल्या होत्या.

अशी झाली 'अवनी' ठार

शुक्रवारी रात्री या परिसरात ग्रामस्थांना तसेच बोराटी वारूड मार्गावरील वाहनचालकांना ही वाघीण दिसली होती. ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांनी तशी कल्पना दिली आणि लगेच पॅट्रोलिंग टीमने आधी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि मग मोहीम सुरू केली, असं या पत्रकात म्हटलं आहे.

वाघिणीची ओळख पटल्यानंतर टीममधील एक सदस्य शेख यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला, पण वाघिणीने मागे जात पुन्हा हल्ला केला. यावेळी हे कर्मचारी जिप्सीमध्ये होते.

Image copyright Forest Department
प्रतिमा मथळा वनविभागाच्या कॅमेऱ्यात टिपलेली T1

स्वरक्षणासाठी असगर यांनी 8 ते 10 मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली.

या परिसरात वाघिणीने मारलेल्या तीन व्यक्तींचे आणि काही जनावरांच्या शरीरांचे अवशेष सापडले आहेत, असं वनविभागाने म्हटलं आहे.

दोन महिन्यांपासून शोधमोहीम

25 ऑक्टोबरला एका शेतातील मचानाखाली शलीक आसोले या गावकऱ्याला ही वाघीण दिसली होती. वाघिणीच्या आक्रमकतेमुळे त्यांनी ती रात्र मचानीवरच घालवली होती. त्यानंतर या परिसरात गस्त वाढवली होती. शेतात कापणीला आलेलं पीक उभं असल्याने बहुतांश शेतकरी रात्री शेतातच गस्त घालतात. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जास्त सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या.

बीबीसी मराठीशी बोलताना मुख्या वनाधिकारी A. K. मिश्रा म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांपासून आमची ही मोहीम सुरू होती. कोर्टाच्या ऑर्डरनंतर आमच्या मोहिमेला वेग आला. यात दोन मुख्य टप्पे होते - एक तर त्या वाघिणीला जेरबंद करणे आणि दुसरं म्हणजे गावकऱ्यांचे मृत्यू रोखणे. या दोन ध्येयांसाठी वेगवेगळे गट कामाला लागले होते."

"जंगलात लागलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे मग आम्ही नजर ठेवायचो की कुठे काही हालचाल होतेय का. जर काही निदर्शनास आलं तर मग आमच्या ट्रेकिंग टीम जंगलाच्या त्या भागात जायच्या. साधारण 6-7 जणांच्या 10 टीम अशा रोज निघायच्या. जर कुठे काही संभाव्य धोका लक्षात आला तर आमच्या बेस कँपवर असलेल्या बाकीच्या टीमला सक्रिय केलं जायचं," असं त्यांनी पुढे सांगितलं.

दोन महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर वनविभागाला आलेल्या या यशामुळे परिसरातील गावकऱ्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांनी मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

'राज्य सरकारच्या पाठिंब्याने झालेली शिकार'

सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय दिला की या शोधमोहिमेदरम्यान नाईलाज झाला तरच वाघिणीला ठार केलं जावं. त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. पण तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न व्हावा, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

पण प्रशासनाने तिला पडकण्याचा प्रयत्नच केला नाही, तिला ठारच करण्यात आलं, असा प्राणीहक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

अर्थ ब्रिगेडचे डॉ. P. V. सुब्रमण्यम म्हणाले, "न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते की आधी या वाघिणीला पकडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पण तसे झालेलं नाही. हे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. सरकारमधील जबाबदार लोकांचंच याला पाठबळ असेल तर जंगलांना काही भवितव्य नाही."

Image copyright Forest Officials
प्रतिमा मथळा वाघिणीचा मृतदेह नागपुरात आणण्यात आला .

"खासगी शिकाऱ्याने वाघिणीला ठार मारले आहे. वनविभागानेच या शिकाऱ्याला आमंत्रित केलं होतं," असा आरोप त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणात न्यायालयात जायचं की आंदोलन करायचं यावर आमचे विचार सुरू आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

"ही राज्य सरकारच्या पाठिंब्याने झालेली शिकार आहे. या वाघिणीला पकडण्याचे फार कमी प्रयत्न झाले, हा प्रकार अत्यंत दुःखद आहे," असं अर्थ ब्रिगेडच्या सरिता सुब्रमण्यम म्हणाल्या.

Image copyright ANI on Twitter
प्रतिमा मथळा वाघिणीला अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोशल मीडियावर शोककळा

अवनीची बातमी सकाळीसकाळी आल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यांच्या 'अवनी' वाघिणीच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.

अभिनेत्री रविना टंडन हिने एका ट्वीटमध्ये म्हटलं की, "एकीकडे चीनने औषधांसाठी वाघाच्या हाडं आणि गेंड्याचं शिंग वापरण्यावरची बंदी उठवली आहे. दुसरीकडे आपण इकडे सगळे प्रयत्न करूनही अवनी वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं, शिवाय विरारमध्ये एका बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मानवी राजकारण विरुद्ध प्राण्यांच्या संघर्षात आपण आपले वन्यजीव गमावत आहेत. मूर्खपणाचा विजय होतोय."

दाक्षिणात्य अभिनेते सिद्धार्थ यांनीही या वाघिणीच्या बछड्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. तिचे दोन्ही बछडे लहान असून ते स्वतः शिकार करू शकत नाही, म्हणून ते फार काळ जिवंत राहू शकणार नाही. तसंच त्यांचं स्वतंत्रपणे जंगलात वावरणंही त्यांच्यासाठीच धोका निर्माण करू शकतं, असं प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

सिद्धार्थने ट्वीट करून वन्यजीव संवर्धकांना आवाहन केलं आहे की त्यांनी या बछड्यांना वाचवावं. "वन्य जीवांसाठी ही सुपारी देणं बंद करा. पैशांसाठी वाघांची शिकार बंद करा. तुम्ही त्यांच्या क्षेत्रात आहात, या तथ्याचा आदर करा."

शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवत वन मंत्रालयाचं नाव आता शिकार मंत्रालय ठेवा, असं म्हटलं आहे.

जगातल्या एकूण वाघांपैकी 60 टक्के म्हणजे 2,200 वाघ भारतात आहेत. त्यापैकी 200हून अधिक महाराष्ट्रात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)