फैजाबादचं आयोध्या नामांतर : 'मध्ययुगीन शासकांपेक्षा आजचे सत्ताधारी जास्त असहिष्णू'

योगी आदित्यनाथ Image copyright Getty Images

दिवाळीच्या एक दिवस आधी सहा नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचं नाव बदलून अयोध्या केलं. याचं कोणाला आश्चर्य वाटलं नाही. तीन आठवड्यांपूर्वी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं तेव्हापासून याही नामबदलाची अपेक्षा होतीच.

भगवी वस्त्रं धारण करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा प्राधान्यक्रम शहरं आणि प्रातांची नावं बदलणं यालाच आहे कारण त्याचं पूर्ण राजकारण हे प्रतीकं आणि धार्मिक ध्रुवीकरण यावर आधारित आहे.

मुख्यमंत्री होण्यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या गोरखपूरमध्ये काही स्थळांची नावं बदलली होती.

11व्या शतकातले संत बाबा गोरखनाथ यांच्या नावानं स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच नावानं चालणाऱ्या मठाचं नेतृत्व करणारे योगी याच भागाचे खासदार होते. तेव्हा त्यांनी मियाबाजारचं नाव मायाबाजार आणि हुमायूंपूरचं नाव हनुमानपूर केलं होतं.

नामबदलाचे फायदे

नामबदलामुळे त्या भागाचा काही फायदा होतो का? हा मोठा प्रश्नच आहे.

इतिहास पाहिला तर लक्षात येतं मध्ययुगीन शासकांच्या काळात धार्मिक असहिष्णुतेवरून त्यांच्यावर टीका केली जाते. पण आज 21व्या शतकातल्या सत्ताधाऱ्यांपेक्षा कमी असहिष्णू होते असं म्हणायला वाव आहे.

संशोधकांच्या मते प्रयाग आणि अयोध्या ही दोन्ही प्राचीन शहरं आहेत, पण कोणत्याही शासकानं त्याचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला नव्हता.

Image copyright Getty Images

16व्या शतकात मुघल बादशहा अकबरने गंगा नदीच्या किनारी इलाबास (अल्लाचं निवासस्थान) या नावाने शहर वसवलं. त्याचं नाव ब्रिटिशांच्या शासनकाळात अलाहबाद झालं.

पण अकबरनं कधीही गंगा, यमुना आणि पौराणिक नदी सरस्वती यांच्या संगमावर असले्ल्या प्रयागचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला नाही.

त्याचप्रमाणे अवधचे पहिले नवाब सादत अली खान यांनी घागरा नदीच्या किनारी 1730 साली फैजाबाद शहर वसवलं.

पण कधीही राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येचं नाव बदललं नव्हतं. हा प्राचीन भाग ब्रिटिशांच्या शासन काळात फैजाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला होता.

हनुमान गढी

अयोध्येला हिंदूंचं तीर्थस्थळ म्हणून प्रसिध्दी मिळाली आणि तिथल्या आर्थिक घडामोडी सगळ्या या धार्मिक पर्यटनाशी निगडित राहिल्या आहेत.

Image copyright SAMEERATMAJ MISHRA/BBC

ऐतिहासिक दस्तावेजांनुसार, अयोध्येतील सगळ्यांत जुन्या हनुमान गढी या मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च हा नवाब सादत अली यांच्या खजिन्यातून होत असे.

एवढंच नव्हे तर, सादत अली खानचा नातू आसफ उद्दौला याने 1775मध्ये सत्तेत येताच अवधची राजधानी फैजाबादहून लखनऊला हलवली. तरीही खर्चाची परंपरा कायमच राहिली.

अलाहाबादचा अर्थ म्हणजे अल्लाचं घर, तसंच फैजाबादचा अर्थ सगळ्याचं कल्याण करणारी जागा.

असं असतानाही योगी यांनी अलाहाबाद आणि फैजाबाद यांचं नाव बदललं. पण या भावनांचा त्यांनी विचार केलेला नाही.

काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय समाजातल्या एका वर्गाची भावना सुखावण्यासाठी घेण्यात आला आहे.

सबका साथ, सबका विकास?

ही गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या 'सबका साथ, सबका विकास'च्या घोषणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते.

असं समजा की या दोन्ही शहरांची नावं बदल्यानं त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरात काही फरक पडणार असेल तर मग आसपासच्या जिल्ह्यातली जमीन घेऊन प्रयाग आणि अयोध्या हे नवीन जिल्हे तयार करता आले असते.

प्रत्यक्षात नवीन जिल्हे असेच तयार होतात.

हे असं केलं असतं तर अयोध्या आणि प्रयाग या प्राचीन नावांची शानही राहिली असती आणि अलाहाबाद आणि फैजाबाद यांची ओळखही पुसली गेली नसती. सरकारचे पैसेही वाचले असते.

Image copyright TWITTER

विशेष म्हणजे, अखिलेश आणि मायावती यांच्या सरकारांनी जेव्हा दलित संतांच्या नावांनी जिल्ह्यांची नावं बदलली तेव्हा भाजपनं त्याला विरोध केला होता.

फैजाबादचं अयोध्या असं नाव झाल्यानं राम मंदिराची मागणी करणाऱ्याचं समाधान झालेलं नाही. कारण प्रत्यक्षात योगी यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याचं जाहीर केलं होतं.

अयोध्येत रामाची विशाल मूर्ती बनवण्याची घोषणाही त्यामुळेच फार काही उत्साह निर्माण करू शकली नाही.

म्हणून मतांचं ध्रुवीकरण हेच या नामबदलामागचं वास्तव आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)