'...तेव्हा हरमनप्रीत कौरवर लोक चिडायचे'

हरमनप्रीत कौर, क्रिकेट, भारत, पंजाब Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हरमनप्रीत कौर

"हरमनप्रीत जेव्हा आमच्या अकादमीत आली, तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे अकादमीच्या आजूबाजूला राहणाऱ्यांच्या घरांच्या काचा तडकू लागल्या. सुरुवातीला घराची काच फुटल्याने लोकं चिडायचे, तक्रारी करायचे. असे फटके मारतं तरी कोण हे बघण्यासाठी माणसं मैदानात येत. हरमनप्रीतला पाहिल्यावर त्यांचा राग कुठच्या कुठे पळून जायचा," ट्वेन्टी-20 प्रकारातील पहिलं शतक झळकावणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या प्रशिक्षकांचे हे उद्गार!

गयाना येथे झालेल्या आयसीसी वूमन्स टी-20 अर्थात वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीतने न्यूझीलंडविरुद्ध 51 चेंडूत 103 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. हरमनप्रीतने 7 चौकार आणि 8 षटकारांसह ही खेळी सजवली. हरमनप्रीतच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर 34 धावांनी मात केली. लहानपणापासूनच हरमनप्रीतने तिच्या खेळाद्वारे आक्रमक खेळाची प्रचिती दिली होती.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स ब्लॅकवेलने हरमनप्रीतला जर्सी भेट दिली.

हरमनप्रीतच्या वडिलांनी तिच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ''ती माझ्याबरोबर ग्राऊंडवर खेळायला येत असे. त्यावेळी मुली खेळायला येत नसत. तिने मुलांबरोबर खेळायला सुरुवात केली,'' असं ते सांगतात.

सलामीला येऊन आक्रमक फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग हा हरमनप्रीतचा आदर्श. हरमनप्रीतचा सगळ्या फॉरमॅटमधला स्ट्राइकरेट पाहिला तर सेहवागच तिचा आदर्श हे चटकन लक्षात येतं.

चित्रपटांची गाणी आणि गाड्या चालवण्याचा हरमनप्रीतला आवड आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायंगे' हा चित्रपट तिने अनेकदा पाहिला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील सिडनी थंडर्स संघासाठी खेळताना हरमनप्रीत कौर

हरमनप्रीतची तडाखेबंद फटकेबाजी पाहून ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेतले तीन संघ तिला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. सिडनी थंडर्स संघाने तिला करारबद्ध करण्यात बाजी मारली. भारतात होणाऱ्या IPLच्या धर्तीवर आयोजित या स्पर्धेतही हरमनप्रीतने तिच्या नैपुण्याची झलक दाखवली.

अनुभवी खेळाडू मिताली राजने कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीतकडे ही जबाबदारी देण्यात आली. कर्णधारपदाच्या जबाबदारीने दडपून न जाता हरमनप्रीतने आपला नैसर्गिक खेळ कायम राखत जगभरातल्या क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा हरमनप्रीत कौर वीरेंद्र सेहवाग यांच्यासमवेत

शुक्रवारच्या वादळी खेळीदरम्यानही हरमनप्रीतला पाठीचं दुखणं तसंच पोटात क्रॅम्प्सच्या वेदनेनं सतावलं होतं. मात्र शारीरिक व्याधींना झुगारून देत हरमनप्रीतने कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी साकारली.

यंदाच्या वर्षी IPL स्पर्धेत महिलांचा मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. जगभरातील अव्वल महिला खेळाडू या सामन्यात सहभागी झाल्या होत्या. हरमनप्रीतने आयपीएल सुपरनोव्हा संघाचं नेतृत्व केलं होतं.

फेक डिग्रीचा वाद

सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी हरमनप्रीतला पंजाब पोलिसांनी आपल्या सेवेत सामील करुन घेण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतला डीएसपी अर्थात डेप्युटी सुपिरिडेंटट ऑफ पोलीस हे पद देण्यात आलं. भरती होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून हरमनप्रीतने आपली शैक्षणिक कागदपत्रं सादर केली. मात्र काही दिवसांतच हरमनप्रीतची ग्रॅज्युएशन डिग्री बोगस असल्याच्या बातम्या पसरल्या. फेक डिग्रीमुळे हरमनप्रीतला डीएसपीऐवजी काँन्स्टेबलपदी काम करावं लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी याप्रकरणी हरमनप्रीतवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणावर सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या हरमनप्रीतने नंतर सविस्तर खुलासा केला.

''माझी पदवी खोटी नाही. आठ वर्षांपूर्वी मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. चौधरी चरण सिंग विद्यापीठातून डिस्टन्स लर्निंगद्वारे 2009-2011 या कालावधीत मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पहिल्या वर्षी मी जालंधर येथे लेक्चरला जात असे. मात्र त्यानंतर क्रिकेट हे प्राधान्य झालं. कॉलेजच्या प्राचार्यांना मी खेळतेय ते चालत नसे. लेक्चरला उपस्थित राहता येत नसे. लेक्चर आणि स्पर्धा यांची एक वेळ येत असे. दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं अवघड होऊ लागलं आणि मी दुसऱ्या ठिकाणाहून डिग्री पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बारावीत असल्यापासून मी भारतासाठी खेळते आहे. मी सगळ्या परीक्षा दिल्या असून, माझी डिग्रीही अगदीच खरी आहे. दिल्लीत माझं परीक्षा केंद्र होतं. सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इंग्रजी आणि जनरल अवेअरनेस हे माझे विषय होते,'' असं हरमनप्रीतने स्पष्ट केलं होतं.

विशेष म्हणजे पंजाब पोलीसमध्ये काम करण्याची संधी मिळते आहे म्हणून हरमनप्रीतने पश्चिम रेल्वेची नोकरी सोडली होती. पश्चिम रेल्वेशी असणारा पाच वर्षांचा करार अर्धवट तोडल्याने हरमनप्रीतला दंडाची रक्कम भरणं अनिवार्य होतं. दंडाच्या रकमेतून सूट मिळावी यासाठी हरमनप्रीतने रेल्वेमंत्र्याकडे विनंती अर्ज केला होता. ती विनंती मान्यही झाली.

सेहवागकडून शाबासकी

'दिमाखदार शतकी खेळी. बॅटने दमदार लत्ताप्रहार. जोरदार इनिंग्ज', असं वीरेंद्र सेहवागने ट्वीट केलं आहे.

वर्ल्डकप अभियानाची दणक्यात सुरुवात. हरमनप्रीतची अविश्वसनीय खेळी. जेमिमाची सुरेख साथ अशा शब्दांत हिटमन रोहित शर्माने शुभेच्छा दिल्या आहेत.

तुफानी शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर हरनप्रीतवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी हरमनप्रीतला 'लेडी विराट कोहली' अशी उपमा दिली आहे तर काहीजणांना हरमनप्रीत म्हणजे महिला क्रिकेटमधला रोहित शर्मा वाटू लागली आहे. वर्ल्डकपमध्ये आगेकूच करण्यासाठी भारतीय संघाला हरमनप्रीतकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या कटू आठवणींना बाजूला सारत इतिहास घडवण्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)