केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनंतकुमार यांचे निधन

अनंत कुमार Image copyright Getty Images

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे आज पहाटे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अनंतकुमार यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. काही आठवड्यांपूर्वी लंडन येथील हॉस्पिटलमधून ते बंगळुरू येथे परतले होते. मे महिन्यात कर्नाटकमधील निवडणुकांसाठीच्या प्रचारादरम्यान कफाचा त्रास बळावल्याने त्यांना उपचारांसाठी लंडन तसंच न्यूयॉर्क येथे जावं लागलं होतं.

कॅन्सर तसेच संसर्गामुळे रात्री 2 वाजता अनंत कुमार यांची प्राणज्योत मालवली असं त्यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होते.

2014 पासून केंद्र सरकारमध्ये ते रसायन व खते मंत्री होते. तर जुलै 2016 पासून त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1996 पासून ते दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद, गृहमंत्री राजनाथ सिहं आणि इतर नेत्यांनी अनंत कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

"अगदी कमी वयात अनंत कुमार यांनी सार्वजनिक जीवनात पदार्पण केलं. कर्नाटकात पक्षबांधणीत अनंत कुमार यांचा मोलाचा वाटा आहे. चांगल्या कामासाठी ते कायम स्मरणात राहतील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

कुमार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी बेंगळुरू येथे झाला. हुबळी येथील K S Arts Collegeमधून त्यांनी BA केलं. नंतर त्यांनी J.S.S. Law Collegeमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.

"वरिष्ठ नेते आणि माझे सहकारी अनंत कुमार यांचं निधन माझ्यासाठी धक्कादायक आणि दु:खद आहे. ते एक उत्तम संसदपटू होते," असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)