महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना हवामान बदल, तापमान वाढीच्या झळा

दुष्काळ Image copyright Getty Images

यंदा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांतील आणि 151 तालुक्यांत दुष्काळ आहे. हा दुष्काळ पर्यावरणाच्या मोठ्या समस्यांचं निदर्शक आहे का? हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांचा महाराष्ट्रातील दुष्काळाशी, शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती याचा काही संबंध असू शकेल का? याचं उत्तर सेंट्रल ड्रायलँड फार्मिंग या संस्थेने केलेल्या अभ्यासात मिळतं. भारतीय शेतीवर हवामान बदलाचा आणि जागतिक तापमान वाढीचा काय परिणाम होईल, हे दर्शवणारा अभ्यास 2013ला झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हे हवामान बदलासाठी असुरक्षित आणि अतिअसुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात यंदा ज्या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे, त्यामध्ये हे 17 जिल्हे आहेत.

काऊन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च या संस्थेत 2011पासून National Initiative On Resilient Agriculture हा प्रकल्प राबण्यात येत आहे. या अंतर्गत सेंट्रल रिसर्च फॉर ड्रायलँड फार्मिंगने Vulnerability of Indian Agriculture to Climate Change हा अभ्यास 2013ला केला आहे. या संशोधनात देशाच्या कोरडवाहू शेतीवर हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा कसा परिणाम होईल, यावर सविस्तर विवेचन करण्यात आलं आहे.

या अहवालात हवामान बदलाचे शेतीवर कशा प्रकारे परिणाम होईल, यानुसार शेतीची विभागणी करण्यात आली आहे. देशातील 572 ग्रामीण जिल्ह्यांचा यात अभ्यास करण्यात आला आहे.

2021-50 आणि 2071-98 या काळात हवामान बदलाचा देशाच्या शेतीवर कसा परिणाम होईल, याचा वेध या संशोधन प्रकल्पात घेण्यात आला आहे.

या अहवालात हवामान बदलांना अतिअसुरक्षित असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 12 आणि असुरक्षित जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजेच राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतीला हवामान बदल आणि तापमान वाढ यांच्या तीव्र झळा बसणार आहेत. अति सुरक्षित जिल्ह्यांत सोलापूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, सांगली, बुलडाणा, धुळे, नाशिक, जालना, अमरावती हे जिल्हे येतात. तर असुरक्षित जिल्हांत अकोला, औरंगाबाद, जळगाव, परभणी आणि वाशिम यांचा समावेश आहे.

यादीत असलेल्या सोलापूर, अहमदनगर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना जास्त दुष्काळी दिवसांना तोंड द्यावं लागेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

तर बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, सांगली, धुळे, नाशिक, जालना, औरंगबाद, जळगाव, परभणी, वाशिम यांच्या निम्नतम तापमानात वाढ होईल, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

काही महत्त्वाच्या नोंदी

  • 2050पर्यंत देशातील तापमान वाढ 1 ते 4 डिग्री असेल. पण वेगवेगळ्या प्रदेशांत पर्जन्यमानात होणारे बदल वेगवेगळे असतील.
  • दुष्काळ, वादळं आणि पूर यांची वारंवारता वाढेल.
  • हवामानाला संवेदनशील असलेल्या शेती, जंगल, किनारपट्टीचा भाग, पाण्याची उपलब्धता आणि मानवी आरोग्य यावर विपरित परिणाम होतील.
  • हवामानातील बदलांना अनुकलन स्वीकारावं लागेल.

पावसाचा लहरीपणा वाढला?

महाराष्ट्रातील शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा प्रभाव पडेल, असा दावा पर्यावरण तज्ज्ञांचा आहे.

हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्यात थेट संबंध आहे, असं मत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं. बीबीसी मराठीशी बोलताना पावसाचा लहरीपणा वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "गेल्या काही वर्षांत जून-जुलैमध्ये कमी पाऊस पडताना दिसतो. नंतर ऑगस्टमध्ये काही प्रमाणात आणि सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान म्हणजे खरीप पिकं काढणीच्या वेळी जास्त पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे," असं ते म्हणाले.

"वेळवर पाऊस पडला नाही तर पीक जळून जातात आणि अवकाळी पाऊस पडल्याने पीकांचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हवामान बदलाचा शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे सरळ संबंध आहे," असं ते म्हणाले.

जूनमधला पाऊस लांबला

याआधी महाराष्ट्रासहित देशात जूनमध्ये मान्सूनला सुरुवात व्हायची. पण आता जून महिन्यात पडणारा पाऊस लांबणीवर पडत आहे, तसंच जूनमध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाणही कमी झालं आहे, असं त्यांचं निरीक्षण आहे.

खरीप पिकांची पेरणी याच दरम्यान होत असल्याने शेतकऱ्यांनी मान्सूनचा बदलता पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. जूनमध्ये पडणारा पाऊस पेरणीसाठी महत्त्वाचा ठरतो.

Image copyright Getty Images

"जून-जुलैमधला पाऊस कमी होऊन सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे खरीप पिकं काढणीच्यावेळी पिकांचं नुकसान होताना दिसतं," असं देऊळगावकर सांगतात.

उन्हाच्या झळा आणि कडाक्याची थंडी

"भविष्यात पिकांना हवामान बदलाचा सर्वांत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, हिवाळ्यात थंडी कमी पडली तर गहू उत्पादन आपोआप कमी होणार आहे. जूनमध्ये वेळेवर पाऊस नाही पडला तर पेरण्या वाया जातील," असं पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे सांगतात.

सक्षम शेतीसाठी

हवामान बदल ही अनेक वर्षांपासून होत असणारी प्रक्रिया असल्याने ती रोखणं अवघड आहे, त्यामुळे शेतीमध्ये बदल करावे लागतील, असं तज्ज्ञांना वाटतं.

"हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शेती व्यवसायाला अनुकूलन स्वीकारावं लागेल. त्यात शेतकरी, संशोधन संस्था आणि सरकार पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक आहे," असं मत देऊळगावकर यांचं आहे.

"देशी वाणांतून मिळणारं उत्पादन तुलनेनं कमी असलं तरी अशा वाणांमध्ये दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता चांगली असते. विशेषत: कोरडवाहू शेतीतील शेतकऱ्यांनी देशी वाणांचा अंगिकार केला पाहिजे. कडधान्य, बाजरी, गहू, भात, पालेभाज्या अशा पिकांच्या देशी वाणांचा प्रसार शक्य आहे. पावसाचा लहरीपण लक्षात घेता ज्या वेळी पाऊस पडेल त्या वेळी पावसाचं पाणी साठवायला पाहिजे. पण या गोष्टी राबवणं शेतकऱ्यांना आव्हानात्मक असतील," अशी प्रतिक्रिया घोरपडे यांनी दिली.

Image copyright Getty Images

बदलत्या हवामानात तग धरू शकतील, अशा बियाणांच्या संशोधनांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणतात.

"बांगलादेशात खाऱ्या पाण्यात भाताचं पीक घेतल जात आहे. तर दक्षिण आफ्रिकेत कोरड्या जमिनीत मक्याचं पीक घेतलं जातं, अशा प्रकारचं संशोधन भारतातही व्हायला पाहिजे," असं देऊळगावकर यांना वाटतं.

"50 ते 60 दिवस पावसाचा ताण पडला तरी तग धरू शकतील, अशी पिकं विकसित करायला पाहिजेत," असंही ते म्हणाले.

तापमान वाढीचा ऋतुचक्रावर नक्कीच परिणाम झाला आहे. पूर्वी शेतकरी सणांनुसार शेतीचं नियोजन करायचे. पहिल्या पावसानंतर पेरणी करायचे. नवरात्रीनंतर खरीप पिके काढायला सुरुवात व्हायची. जेणे करून दिवाळी साजरी करता येईल. "हीच परंपरा अजूनही चालत आली आहे. पण शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा अंदाज घेतला पाहिजे. त्याप्रमाणे पिकाचं नियोजन करायला पाहिजे," असं पर्यावरणतज्ज्ञ क्षमा खोब्रागडे सांगतात.

हवामान बदलांना जे जिल्हे जास्त असुरक्षित आहेत, त्यांच्यावर अधिक लक्ष देण्यासाठी या संशोधनचा उपयोग होईल, असा या अभ्यासात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)