स्वयंपाकघरातून जगावर राज्य करणारी महिला

गरिमा अरोरा Image copyright GAA

भारतीय स्त्री आपल्या आयुष्यातला बराचसा काळ स्वयंपाक घरात घालवते, असं म्हणतात.

मात्र त्याच स्वयंपाकघरात उभी राहून ती जगभर आपला ठसाही उमटवू शकते आणि हेच गरिमा अरोरा यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या गरिमा शेफ आहेत. त्या थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये 'गा' नावाने एक रेस्टॉरंट चालवतात. 32 वर्षांच्या गरिमा आपल्या रेस्टॉरंटसाठी मिशेलीन स्टार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

फूड इंडस्ट्रीमध्ये मिशेलीन स्टार असलेल्या रेस्टॉरंटची गणना उत्कृष्ट श्रेणीतील रेस्टॉरंट म्हणून होते. मात्र इथवरचा गरिमाचा प्रवास फारच सुरस आहे.

बटर चिकन आणि पराठ्यांची आवड असलेल्या पंजाबी कुटुंबातल्या गरिमा यांना लहानपणापासूनच खाण्याची आवड होती.

Image copyright GAA Bangkok

घरी त्यांचे वडील वेगवेगळे पदार्थ बनवायचे. तिथूनच त्यांना स्वयंपाक करायचा छंद लागला. गरिमा सांगतात त्यांचे वडील नव्वदच्या दशकातच इटली आणि पश्चिम आशियातले असे पदार्थ घरी बनवायचे जे भारतात क्वचितच कुणाला माहीत असतील.

गरिमा यांनी मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमधून उच्चशिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार म्हणूनही काही काळ काम केलं. पण आपण आपला छंदच जोपासायला हवा, हे त्यांना लवकरच कळून चुकलं.

स्वप्नपूर्तीसाठी गाठलं पॅरिस

21 वर्षांची असताना त्या आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पॅरिसला गेल्या आणि तिथल्या नावाजलेल्या कॉर्डन ब्लू कलिनरी शाळेत शेफचं बनण्यासाठी प्रशिक्षण घेतलं.

यानंतर त्यांनी दुबई, डेन्मार्क आणि कोपनहेगन इथल्या मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये काम केलं. गरिमा यांनी सुप्रसिद्ध शेफ गगन आनंद यांच्यासोबतही काम केलं आहे.

1 एप्रिल 2017 रोजी गरिमा यांनी 'गा' नावचं स्वतःचं रेस्टॉरंट उघडलं.

Image copyright GAA@FB

त्या म्हणतात, "माझ्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना तुम्हाला आपण हॉटेलमध्ये नाही तर कुणाच्या तरी घरीच जेवत असल्यासारखं वाटेल. आपल्या पाहुण्यांना आनंद आणि चांगला अनुभव देणं हाच आमचा उद्देश आहे."

एखादा पदार्थ बनवण्यातली क्रिएटिव्हिटी त्यांना अभूतपूर्व समाधान देते. गरिमा यांच्या रेस्टॉरंटमध्ये अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ मिळतात. यात भारतासह अनेक देशांची चवही आहे.

गरिमा सांगतात भारत आणि इतर देशांच्या चवीच्या संयोगातून काहीतरी वेगळं बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

'गा' रेस्टॉरंटमध्ये फणस, भोपळा, क्रे-फिश आणि पेरू यांसारख्या गोष्टीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

हे मिशेलीन गाईड नक्की असतं तरी काय?

एखाद्या रेस्टॉरंटला मिशेलीन स्टार मिळणं खूप मोठा सन्मान समजला जातो. हा स्टार रेस्टॉरंटच्या उत्कृष्टतेची ओळख आहे आणि हा स्टार मिळाला तर रेस्टॉरंटची कमाईसुद्धा रातोरात वाढते.

मिशेलीन ही कंपनी दरवर्षी एक गाईड प्रसिद्ध करते. सन 2019च्या गाईडमध्ये गरिमाच्या रेस्टॉरंटला स्टार मिळाले आहेत.

मिशेलीन गाईडच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लाल रंगाच्या छोट्याशा पुस्तकाची गोष्टही फार मनोरंजक आहे.

ही कहाणी 1889 साली फ्रान्सच्या क्लेरमोंट-फेरंडमध्ये सुरू झाली. आंद्रे आणि इदुआर मिशेलीन या दोन भावांनी एक टायर कंपनी सुरू केली होती. त्याकाळी फ्रान्समध्ये केवळ तीन हजार कार होत्या.

आपल्या व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी एक गाईड तयार केलं. या गाईडमध्ये प्रवाशांसाठी माहिती असायची.

Image copyright GAA@FB

या गाईडमध्ये नकाशे असायचे, टायर कसे बदलायचे, पेट्रोल कुठे भरावं अशी माहिती असायची. याव्यतिरिक्त राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था असलेल्या ठिकाणांची माहितीही असायची.

हे गाईड वाचून लोकांनी भटकंतीला निघावं, असं मिशेलीन भावंडांना वाटायचं. यामुळे कार जास्तीत जास्त चालेल, त्यांचे टायर झिजतील आणि यातून त्यांचा खप वाढेल.

दरवर्षी प्रकाशित होणारी हे गाईड सुरुवातीचे वीस वर्षं लोकांना मोफत मिळायचं. मात्र एकदा आंद्रे मिशेलीन एका टायरच्या दुकानात गेले तेव्हा त्यांना त्यांचं गाईड एका टेबलावर असंच पडलेली दिसलं.

जी वस्तू लोकांना मोफत मिळते त्याची लोकांना किंमत नसते, असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

यानंतर त्यांनी 1920मध्ये नवीन मिशेलीन गाईड लॉन्च केलं आणि सात फ्रँकच्या दराने ते विकली.

यावेळी गाईडमध्ये पहिल्यांदा पॅरिसमधल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची यादी टाकण्यात आली होती. सोबतच जाहिरातींसाठीही जागा सोडली होती.

रेस्टॉरंट इन्स्पेक्टर

या गाईडच्या रेस्टॉरंट सदराला लोकांची चांगली पसंती मिळाली. यानंतर मिशेलीन भावंडांनी काही लोकांची टीम बनवली. ही माणसं आपली ओळख लपवून रेस्टॉरंटमध्ये जायची आणि तिथे जेवण करून जेवणाला रेटिंग्ज द्यायची. या गुप्त ग्राहकांना त्याकाळी 'रेस्टॉरंट इन्स्पेक्टर' म्हटलं जाई.

1926 मध्ये हे गाईड उत्कृष्ट जेवण देणाऱ्या रेस्टॉरंटला स्टार रेटिंग देऊ लागली. सुरुवातीला ते केवळ एक स्टार द्यायचे. पाच वर्षांनंतर शून्य, एक, दोन, तीन स्टार देऊ लागले.

1936 मध्ये रेटिंग्ज देण्यासाठी नवी नियमावली बनवण्यात आली.

Image copyright GAA@FB

विसाव्या शतकातल्या उत्तरार्धात तर मिशेलीन गाईड बेस्ट सेलर बनलं. आज हे गाईड तीन खंडांमध्ये तीसहूनही जास्त प्रदेशांमधल्या 3000 हॉटेल आणि रेस्टॉरंटला रेटिंग देतं.

यात बँकॉक, वॉशिंग्टन डीसी, हंगेरी, पोलंड, स्वीडन, सिंगापूर आणि नॉर्वेचा समावेश होतो. मात्र ते भारतातल्या रेस्टॉरंटला रेंटिंग्ज देत नाही.

जगभरात आजवर ३ कोटींहूनही जास्त मिशेलीन गाईडची विक्री झालेली आहे.

आपली टीम आणि आपल्या रेस्टॉरंटचा आपल्याला अभिमान असल्याचं गरिमा सांगतात. त्यांना 'गा'ला अजून पुढे घेऊन जायचं आहे.

एक शेफ म्हणून त्यांची नेहमी एकच इच्छा असते, जो कुणी त्यांच्या हाताचे पदार्थ चाखेल त्याने 'इतकं स्वादिष्ट जेवण आपण यापूर्वी कधीही जेवलेलो नाही', असं म्हणतच बाहेर पडावं.

जगातल्या टॉप शेफच्या यादीवर नजर टाकली तर त्यात बहुतांश पुरूषच आहेत. घराघरात आपल्या पाककौशल्याची जादू चालवणाऱ्या अन्नपूर्णा या क्षेत्रात क्वचितच दिसतात. पण ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं, हे गरिमा अरोरा यांनी दाखवून दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)