अमिताभ बच्चन यांनी फेडलं शेतकऱ्यांचं 4 कोटींचं कर्ज

अमिताभ बच्चन Image copyright Getty Images

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे 4 कोटी रुपये फेडल्याचं जाहीर केलंय.

शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याचं त्यांनी काल आपल्या ब्लॉगवर जाहीर केलं आहे. या कृतीमुळे त्यांना अतिशय समाधान वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

हे सगळे शेतकरी उत्तर भारतातील आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई, पिकांचं घटत जाणारं प्रमाण आणि आधुनिकतेचा अभाव अशा अनेक समस्यांशी झुंज देत आहेत.

त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. 1995पासून आतापर्यंत देशात अंदाजे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

"ज्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं गेलं आहे आहे, त्यांना मला हे प्रत्यक्ष जाऊन सांगायचं आहे." अमिताभ पुढे लिहितात.

त्यांनी राष्ट्रीयकृत बॅक, बॅक ऑफ इंडियाचं कर्ज फेडल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 'बँकेने सगळी देणी फेडल्याचं प्रमाणपत्र' दिल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं.

अमिताभ यांनी एकूण 1318 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला अमिताभ यांनी महाराष्ट्रातल्या 350 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं.

मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली तसंच लॉन्ग मार्चही आयोजन केलं. शेतकऱ्यांना हमीभआव मिळावा अशीही मागणी त्यांनी केली होती.

अमिताभ आणि शेतजमिनीचा वाद

शेतजमिनीवरुन झालेल्या वादात अमिताभ यांचं नावं आलं होतं. 2007 साली, फैझाबाद न्यायालयाने अभिताभ 'शेतकरी नाहीत' असा निकाल दिला होता. त्यांना मिळालेली 90,000 स्क्वेअर फुट जमीन बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.

त्यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो त्यांनी या जमिनीवरचा मालकी हक्क सोडून दिल्यानंतर, मागे घेण्यात आला.

बच्चन यांचं बॉलिवुडमध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी आजवर 190 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय तसंच ते हॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही झळकलेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)