'भय्यू महाराज असताना निवडणुकीत आश्रमात शेकडो लोक यायचे, पण...'

भैय्यू Image copyright Facebook/BhaiyyuMaharaj

"भय्यू महाराज होते तेव्हा रोज शेकड्यानं लोक यायचे. आता फार कुणी येत नाही," इंदूरमधल्या भय्यू महाराजांच्या आश्रमात मीडिया समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या सचिन पाटील यांचे हे शब्द. शहरातल्या दीनदयाल उपाध्याय चौकात सुखलोया या रहिवाशी भागात हा आश्रम आहे.

मध्य प्रदेशात विधासभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, पण महाराजांच्या या सूर्योदय आश्रमात शुकशुकाट आहे. आधी निवडणुका म्हटलं की या भागात गाड्यांची रांग लागायची, VIP मंडळींची वर्दळ असायची. शेकडो माणसं गोळा व्हायची आणि तेवढ्याच पंगती उठायच्या. पण आता मात्र इथं वेगळंच चित्र आहे.

शनिवारी दुपारी 4च्या सुमारास मी भय्यू महाराजांच्या आश्रमात पोहोचलो. गाडीतून उतरताच पहिलं दर्शन झालं ते चपलांच्या रॅकचं. धूळ खात पडलेल्या या रॅकवर एकही चप्पल नव्हती.

आश्रमाच्या व्हिजिटरबुकमध्ये एन्ट्री करताना लक्षात आलं की 13 नोव्हेंबरनंतर तिथे एंट्री करणारा मी पहिलीच व्यक्ती होतो, तो दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर. 13 तारखेला सुद्धा दोन-चारच एंट्र्या होत्या.

आश्रमात शिरताच सचिन पाटील यांनी माझं स्वागत केलं. मूळ अकोल्याचे आणि आता इंदूरमध्येच स्थायिक झालेले सचिन पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत.

आश्रमाच्या दर्शनी भागातच भय्यूजी महाराजांची मोठी प्रतीमा लावण्यात आली होती. आश्रमातले कर्मचारी आणि पुजारी वगळता तिथं कुणीच नव्हतं.

'महाराज होते, तेव्हा शेकडो लोक यायचे'

सचिन आणि मी आश्रमाच्या पहिल्या माळ्यावरच्या दरबार कक्षात गेलो. एकाचवेळी शंभरएक माणसं बसतील एवढा मोठा तो दरबार होता.

त्यात भय्यू महाराजांची गादी होती, त्यावर त्यांची एक प्रतीमा, काही नारळ आणि काही चिठठ्या ठेवल्या होत्या. खाली दरबाराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेला लाल गालीचा तिथल्या एकेकाळच्या वदर्ळीची साक्ष देत होता.

Image copyright BBC/NILESH DHOTRE

"महाराज होते, तेव्हा शेकडो लोक यायचे, पण महाराजांचं कुणी उत्तराधिकारी नसल्यानं आता फारसं कुणी येत नाही," सचिन सांगू लागले.

"महाराज होते तेव्हा सर्वच क्षेत्रातल्या लोकांची वर्दळ होती. नोकरी मागायला येणारे, संसारात कलह निर्माण झालेले पती-पत्नी, राजकारणी, शेतकरी, सामान्य माणूस, अशी सर्व प्रकारची माणसं येत," ते सांगतात.

आता किती राजकारणी येतात, हा प्रश्न विचारल्यावर सचिन यांनी महाराष्ट्रातून एक-दोन जण येऊन गेल्याचं सांगितलं.

"काही मंडळी त्यांच्या इच्छेची किंवा मागणीची चिठ्ठी ठेवून जातात. काही मंडळी फोनवरून त्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी सांगतात, आम्ही तसं करतो. पण आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही."

आश्रमाचा खर्च कसा चालतो?

मग आश्रमाचा खर्च कसा चालतो? सचिन सांगतात की, "दानधर्मावर हा सर्व खर्च चालतो. तसंच ट्रस्टच्या माध्यमातूनच कारभार चालतो. हा आश्रम कधीही उत्पन्नाचं साधन होता कामा नये, असं भय्यू महाराजांचं कायम म्हणणं होतं."

Image copyright BBC/NILESH DHOTRE

फिरत फिरत आम्ही दुसऱ्या माळ्यावर आलो, तिथं विधवा महिलांना वाटप करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिलाई मशीन ठेवण्यात आले होते. त्यावेळी आश्रमाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं लक्षात आलं. महाराज असतानाच रिनोव्हेशनचं काम सुरू करण्यात आलं होतं, पण ते आता मागे पडलंय.

खालच्या मजल्यावर किचन आणि भांडार आहे. तिथे भांडारात बऱ्यापैकी जिन्नस आणि अन्नधान्य ठेवल्याचं दिसून आलं. महाराज होते तेव्हा रोज 500 माणसांचं जेवण शिजायचं. आता साधारण 50 माणसांसाठी शिजतं.

'महाराज लॉबिंग करायचे'

शेवटी सचिन मला बाहेर घेऊन आले. सर्वोदय आश्रमामार्फत चालवल्या जाणाऱ्या अँम्ब्युलन्स दिसल्या. त्याही बऱ्याच काळापासून वापरल्या गेल्या नसल्याचं लक्षात आलं.

आश्रमाच्या समोरचं भय्यू महाराजांच्या पुढाकारानं बांधण्यात आलेलं भारतमातेचं मंदिर आहे.

Image copyright BBC/NILESH DHOTRE

आश्रमातून निघेपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. पुजाऱ्यांनी पूजेची तयारी सुरू केली होती. गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी एक इसम इथं येऊन बसलेला दिसला. पारायणासाठी सात-आठ गुरुचरित्र ग्रंथ आणि चौरंग तयार ठेवण्यात आले होते. मध्य प्रदेशात दत्तगुरूंची पूजा फारशी मंडळी करत नाहीत, त्यामुळे इथं पारायणासाठी फारशी माणसं येत नाहीत, असा पुष्टी सचिन यांनी पुढे जोडली.

पण भय्यू महाराजांनंतर त्यांच्या आश्रमाच्या आतलं जसं दृश्य होतं, बाहेरून सुद्धा ते तसंच दिसतंय का?

स्थानिक पत्रकार सचिन शर्मा सांगतात, "भय्यू महाराज यांच्या आश्रमात कुठल्याही प्रकारचा पैसा घेतला जात नव्हता. उलट लोक त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी यायची, त्यांची कामं होत होती. पण लोक काम झाल्यानंतर मात्र दानपेटीत स्वेच्छेनं पैसे टाकायचे. भय्यू महाराजांनी पैसे कमावण्याचा कधीच प्रयत्न केला नाही."

यामुळेच महाराज आर्थिक विवंचनेत होते का, असा सवाल केल्यानंतर मात्र त्यांनी त्याबाबत फारशी माहिती नसल्याचं सांगितलं.

Image copyright BBC/NILESH DHOTRE

मग मध्य प्रदेशाच्या राजकारणावर भय्यू महाराजांच्या जाण्याने काय परिणाम झाला, असं विचारल्यावर स्थानिक वृत्तपत्र 'प्रजातंत्र'चे डिजिटल एडिटर प्रकाश हिंदुस्तानी सांगतात, "भय्यू महाराजांचा प्रभाव मध्य प्रदेशात अजिबात नव्हता. त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात होता. त्यामुळे ते नसल्याचा काहीच फरक इथल्या राजकारणावर पडत नाही."

मग राजकारणी मंडळी त्यांच्याकडे का सतत ये-जा करायची? हिंदुस्तानी सांगतात, "महाराज एक लॉबिस्ट होते. ते लॉबिंग करायचे आणि त्यासाठीच ते ओळखले जात, त्यासाठीच लोक त्यांच्याकडे जात. काही लोक त्यांच्याबाबत बोलताना हलक्या शब्दांचा वापर करायचे, पण मी ते बोलणं योग्य समजत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)