अयोध्येत संजय राऊत : 'नोटाबंदीसारखा राम मंदिरासाठी 24 तासांत कायदा का नाही होत?'

२४ तासांत जर देशात नोटाबंदी लागू होत असेल तर राम मंदिराचा कायदा बनवण्यात अडचण काय, असा प्रश्न शिवसेनेने नरेंद्र मोदी सरकारला अयोध्येतून केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर संसदेत अध्यादेश आणला पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पक्षाचे जवळपास सगळेच मोठे नेते इथे ठाण मांडून बसले आहेत. पण अयोध्येत सभा आयोजित केली जाईल, असं शिवसेनेतर्फे कधीच सांगण्यात आलं नव्हतं, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

लखनौपासून अयोध्येपर्यंत शिवसेनेने अनेक ठिकाणी पोस्टर लावले आहेत. "आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचंच नाही. हा राजकीय कार्यक्रम नाही," असं राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"अयोध्येला येण्याची बाळासाहेबांची इच्छा होती. ते येऊ शकले नाहीत. पण उद्धव ठाकरे येत आहेत," ते म्हणाले.

पण 25 तारखेला अयोध्येत विश्व हिंदू परिषदेचीही 'धर्मसभा' असल्याने एक प्रकारचं 'पोस्टरयुद्ध' शहरात पाहायला मिळत आहे. विहिंपने या 'धर्मसभे'साठी मोठा जोर लावला असून एक लाख लोक जमणार असल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आले आहे.

संजय राऊत यांनी विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यक्रमाचं स्वागत केलं आहे, मात्र "शक्तिप्रदर्शन करून किंवा गर्दी जमवून राम मंदिर नाही होणार," असंही सांगायला ते विसरले नाहीत.

Image copyright Niranjan Chhanwal/BBC

शुक्रवारी पौर्णिमेनिमित्त शरयू नदीत स्नान करण्यासाठी अयोध्येत मोठी गर्दी झालेली होती. पुढचे दोन दिवस आणखी गर्दीचेच राहण्याची शक्यता आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव अर्धसैनिक दलाच्या सात तुकड्या अयोध्येत तैनात करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी मोदी सरकारने 2016च्या नोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणे राम मंदिरासाठीही अध्यादेश आणण्याची मागणी केली.

ऐन निवडणुकीच्या वेळेसच हा मुद्दा कसा आठवला, असं राऊत यांना विचारलं असता त्यांनी "2019 नंतर हा मुद्दा काहींना आठवू नये, यासाठीच आम्ही हा मुद्दा उचलला आहे," असं उत्तर दिलं.

शनिवारी दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांचं अयोध्येत आगमन होणार आहे. त्यानंतर ते लक्ष्मणकिलाच्या संत-महंतांचे आर्शीवाद घेतील. त्यानंतर शरयू नदीची आरती करतील आणि 25 तारखेला सकाळी रामाचं दर्शन घेतील.

या दौऱ्याच्या आतापर्यंतच्या घडामोडी

दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी कायदा आणा, असं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदींना जमत नसेल तर शिवसेना राम मंदिर बांधेल, अशी जाहीर घोषणा दसरा मेळाव्यात केली होती. "राम मंदिर जुमला आहे, हे जाहीर करा," असं आव्हान भाजपला देत त्यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती.

Image copyright Niranjan Chhanwal/BBC

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणल्यानंतर शिवसेनेने त्यात उडी घेतली. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेनेच्या नेत्यांचे अयोध्या दौरे वाढले. संजय राऊत यांनी आपण ऑगस्ट महिन्यापासूनच तयारी करत असल्याचा दावा केला.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये संबध ताणले गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनदा भेटले. नंतर 25 नोव्हेंबरलाच अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने धर्मसभा घेण्याची घोषणा केली. हा कार्यक्रम आधीच ठरलेला होता, असा दावा परिषदेने केला आहे.

दौऱ्याला एका आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना उद्धव ठाकरे यांनी, 'हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा दिली. आपण निवडणुका डोळ्यांसमोरच ठेऊन जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरवेळेस निवडणुकीच्या वेळीच हा विषय कसा काढला जातो, याचा जाब विचारण्यासाठी आणि सरकारला आठवण करून देण्यासाठीच आपण हा मुद्दा उचलल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडून ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मोठ्या नेत्यांचं किंवा पक्षाचं अधिकृत भाष्य समोर आलं नसलं तरी अयोध्येतल्या सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून अडचणी येत असल्याची चर्चाही माध्यमांमधून झाली.

21 नोव्हेंबरला शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि इतर नेते अयोध्येत पोहोचले. लक्ष्मणकिला इथे स्तंभपूजन करण्यात आलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याची टीका केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं. आखाडा परिषद यात सहभागी होणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी "आमचा कार्यक्रम सोडून शिवसेनेच्या कार्यक्रमात सहभागी होणं आम्हाला शक्य नाही" असं ABP माझाशी बोलताना सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी 22 तारखेला शिवनेरीवर जाऊन तिथली माती एका कलशात घेतली. मंदिर उभारण्यासाठी ही पवित्र माती इथून घेऊन जात असल्याचं ते म्हणाले. "'मंदिर वही बनायेंगे' हे किती पिढ्यांनी ऐकायचं?" असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक अयोध्येला पोहोचत आहेत.

प्रतिक्रिया

शिवसेना राम मंदिराचा मुद्दा संघ परिवाराकडून हिसकावून घेत आहे का? असा प्रश्न बीबीसी मराठीने वाचकांना विचारला होता. त्यावर वाचकांनी विविधांगी मत व्यक्त केली आहेत.

शशांक महाडिक म्हणतात, "भाजप सत्तेत असल्याने हा मुद्दा उचलू शकत नाही. म्हणून शिवसेनेला पुढे केलं आहे. लोक मूर्ख आहेत का नाही, हेच आता पाहायचं आहे."

Image copyright facebook

तर नरेश चव्हाण म्हणतात शिवसेनेला भाजपशी काडीमोड करायचा असेल तर राष्ट्रीय मुद्दा लागेल. निक महाजन यांनी उद्धव यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

विनायक बागडे म्हणतात सर्वसामान्य माणूस आणि त्यांचे प्रश्न यावर चर्चा व्हावी आणि मार्ग निघावा. राम मंदिर 1986पासून फक्त मुद्दाच बनून राहिला आहे.

Image copyright Facebook

तर भाजप आणि शिवसेना लोकांना वेड्यात काढत आहेत, अशी प्रतिक्रिया आबासाहेब कदम यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत, असं ते म्हणतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)