टीव्हीवर जाहिरातीत देण्यात भाजप नेटफ्लिक्स, अॅमेझॉनच्याही पुढे #5मोठ्याबातम्या

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजपने नेटफ्लिक्स, अमेझॉन तसंच ट्रिव्हागो सारख्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजपने नेटफ्लिक्स, अमेझॉन तसंच ट्रिव्हागो सारख्या कंपन्यांना मागे टाकलं आहे.

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. टीव्हीवर जाहिरातींवर खर्चात भाजप आघाडीवर

भारतीय टेलिव्हिजनवरील आघाडीचे जाहिरातदार म्हणून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजपने नेटफ्लिक्स, अमेझॉन तसंच ट्रिव्हागो सारख्या कंपन्यांना मागे टाकलं आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिलने (BARC) गुरुवारी ही माहिती सादर केल्याचं 'इकॉनॉमिक टाइम्स'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे भाजपने विविध माध्यमांतून जाहिरातींचा जोर लावला आहे.

टीव्हीवरील भाजपच्या जाहिरातींचे प्रमाण सर्वाधिक आहे. टीव्ही हे शहरी-ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्याचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याने वस्तू, सेवा पुरवठादार असो की राजकीय पक्ष, त्यांचा जाहिरात देण्याचा भर टीव्हीवर असतो, असं बार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी सांगितलं.

2. पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्याचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी अनंतनाग जिल्ह्यातल्या बीजबेहरा या ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या कट्टरतावादी संघटनेच्या सहा कट्टरतावाद्यांचा खात्मा केला. या सहा जणांपैकी एक आझाद अहमद मलिक याचा ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणात हात होता, अशी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने बातमी दिली आहे.

'काश्मीर रीडर'चे संपादक आणि खोऱ्यातले ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची जून महिन्यात गोळ्या घालून हत्या झाली होती.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा पत्रकार शुजात बुखारी

दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी अतिरिक्त आरोपपत्र दाखल केलं. या 9,235 पानी आरोपपत्रात 18 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

सप्टेंबर 2017 मध्ये बंगुळरू इथे लंकेश यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी पहिल्यांदा आरोपीला अटक केली. त्यानंतर तपासाचा वेग वाढला आणि काही महिन्यात पोलीस सुजीत कुमार उर्फ प्रवीणपर्यंत पोहोचले. यांच्यामुळे अमोल काळे आणि अमित डेगवेकर यांचा पोलिसांनी माग काढला. या सगळ्या घटनाक्रमात महत्त्वाचा दुवा असलेल्या मनोहर एडवेलाही पोलिसांनी अटक केली.

लंकेश यांच्यावर गोळी झाडण्याचा आरोप असलेल्या परशुराम वाघमारेला जूनमध्ये SITने अटक केली. परशुरामला मदत करणाऱ्या अमित बाड्डी, गणेश मिस्कीन यांच्यासह राकेश बंगेरा यांनाही SITने अटक केली.

3. 'दिल्लीची जामा मशीद पाडा, मूर्ती सापडतील'

जामा मशीद पाडा, तिथे मूर्ती सापडल्या नाहीत, तर मला खुशाल फासावर लटकवा, असं धक्कादायक वक्तव्य भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. उन्नाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साक्षी महाराज असं बोललं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

राम मंदिराच्या निर्मितीवरूनही साक्षी महाराजांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. काहीही झालं तरी 2019 निवडणुकांआधी राम मंदिराचं काम सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक अनावश्यक प्रकरणांमध्ये न्यायालयाने निकाल दिले आहेत. मात्र राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घ्यावासा वाटत नाही. ही दुर्देवी बाब आहे. सर्वोच्च न्यायालय राम मंदिराच्या बाबतीत टाळाटाळ करत आहे असंही त्यांनी सांगितलं.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा भाजप साक्षी महाराज

अयोध्या, मथुरा, काशी सोडा. सर्वात आधी जामा मशीद तोडा. तिथल्या शिड्यांखाली तुम्हाला मूर्ती मिळाल्या नाहीत तर मला खुशाल फासावर लटकवा असं साक्षी महाराज म्हणाले. मुघलांच्या काळात हिंदू धर्मावर अन्याय झाला. अनेक मंदिरं फोडण्यात आली आणि त्याजागी मशिदी उभारण्यात आल्या असं त्यांनी म्हटलं आहे.

3. प्रेमानंद गज्वी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी

ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

98व्या नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील, अशी बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.

नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे. नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड ही शहरं आयोजनासाठी चर्चेत आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर अशी नावं चर्चेत होती. मात्र गज्वी यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं.

5. मिताली राजच्या मॅनेजरचा कर्णधार हरमनप्रीतवर आरोप

कर्णधार हरमनप्रीत कौर स्वत:चं म्हणणं खरं करणारी, खोटं बोलणारी, अपरिपक्व असल्याची टीका माजी कर्णधार मिताली राजची व्यवस्थापक अनिशा गुप्ता यांनी केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबाबत बातमी दिली आहे.

भारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या ICC Women's World T20 स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. निर्णायक अशा या लढतीत माजी कर्णधार मिताली राजला वगळण्याचा निर्णय सर्वांना चकित करणारा होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मिताली राज

प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली खेळू शकली नव्हती. मात्र उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मिताली फिट होती. विजयी संघाचं कॉम्बिनेशन बदलायचं नसल्याने मितालीला संघात समाविष्ट करण्यात आलं नाही, असं कारण संघव्यवस्थापनातर्फे देण्यात आलं.

T20 प्रकारात सर्वाधिक धावा आणि प्रदीर्घ अनुभव नावावर असणाऱ्या मितालीला संघात न घेतल्याने भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे.

BCCIला खेळापेक्षा राजकारणात रस आहे, असंही अनिशा यांनी म्हटलं. व्हेरिफाइड नसलेल्या ट्वीटर हँडलवरून अनिशा यांनी टीका केली होती. थोड्या वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)