राम मंदिर : 'अयोध्येतील मुस्लीम साशंक आहेत, भयभीत आहेत'

मुस्लीम Image copyright Getty Images

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर विश्व हिंदू परिषद म्हणजे विहिंपची रविवारी अयोध्येत धर्मसभा आहे. त्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. अशा वातावरणात अयोध्येतील मुस्लीम आणि सर्वसामान्य यांना काय वाटतं? काहींनी घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवला आहे तर ज्यांनी 1992ची परिस्थिती पाहिली आहे, अशांना इथल्या परिस्थितीबद्दल शंका वाटते.

अयोध्या शहराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसंच अधिकाऱ्यांच्या गाड्या सायरन वाजवत सतत ये-जा करत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'अयोध्या चलो'च्या घोषणा ऐकू येत आहे, त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था किती महत्त्वाची आहे ते लक्षात येईल.

'जय श्रीराम', 'मंदिर वही बनाऐंगे', 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' अशा घोषणा लक्ष्मण किला या मैदानात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ऐकू येत होत्या. मात्र अशा घोषणा अयोध्येच्या हवेत अनेक दिवसांपासून दुमदुमत आहेत. शिवसेनेची सभा संतांचा आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने आणि याच 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' नावाने आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या अनेक भागांतून शिवसैनिक रेल्वे, खासगी गाड्या आणि मोटरसायकल घेऊन आले आहेत. शिवसैनिकांचा वावर अतिशय आक्रमक होता आणि ते उत्साहात घोषणा देत होते.

उद्धव ठाकरेंच्या एकेका वक्तव्यावर शिवसैनिक घोषणा देत होते. त्यांच्या या घोषणांमुळेच उद्धव ठाकरे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला ते जागं करायला आले आहेत. उद्धव ठाकरे रविवारी अयोध्येत राम ललाचं दर्शन घेतलं.

रविवारी होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाच्या धर्मसभेबद्दल ते म्हणाले, "मंदिराचं निर्माण कोणीही केलं तरी शिवसेनेचं त्यांना समर्थन असेल."

कडक सुरक्षाव्यवस्था

शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यक्रम पाहता अयोध्येत सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या 48 कंपन्या, शीघ्र कृती दल आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे सात अधिकारी तिथे तैनात केले आहेत.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA

लखनौ विभागाचे पोलीस महानिरीक्षक ओंकार सिंह सांगतात, "सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी पोलीस आणि प्रशासनाची आहे. लोकांनी निर्धास्त राहावे. स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या वाहतुकीवरही बंधनं घालण्यात आली आहेत."

असं असलं तरी अयोध्येचे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पांजीटोला, मुगलपूरा अशा मुस्लीमबहुल भागात लोकांनी शंका व्यक्त केली आणि ते वाढणाऱ्या गर्दीमुळे भयभीत झाले आहेत. कारण अशीच स्थिती 1992मध्येही होती.

इश्तियाक अहमद म्हणतात, "प्रशासनाने सुरक्षेची हमी दिली असली तरी दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो. कशा पद्धतीने मुस्लिमांची घरं, दर्गा, मशिदीवर हल्ले झाले ते 1992ला लोकांनी पाहिलं आहे. अनेक लोकांना घरात रहावं लागलं. त्यामुळे थोडी भीती आहेच."

Image copyright SAMIRATMAJ MISHRA

वादग्रस्त परिसरापासून काही अंतरावर राहणारे रईस अहमद सांगतात, "सावधगिरीचा उपाय म्हणून लोकांनी घरात खाण्या-पिण्याचं सामान साठवून ठेवलं आहे. लोकांमध्ये विशेषत: मुस्लिमांमध्ये भीती आहे. मात्र कोणतीही व्यक्ती इथून कुठेही गेलेले नाही."

"सरकारवर भरवसा ठेवावा असं कोणतंही वक्तव्य सरकारने केलं नाही. मागच्या काही दिवसांत पोलिसांसमोरच दुर्दैवी घटना घडल्या आहेत. म्हणूनच त्यांना आपल्या सुरक्षेची खात्री वाटत नाही," असं ते म्हणाले.

महागाई वाढली

अयोध्येत टुरिस्ट गाईडचं काम करणारे संजय यादव म्हणतात, "गर्दी वाढण्याच्या शंकेने इथल्या लोकांना उगाचच अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक कुठेच ये-जा करू शकत नाहीयेत. टप्प्याटप्पावर तपासणी सुरू आहे. गरजेच्या वस्तू मिळत नाहीत. महागाई वाढली आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो."

अप्रिय घटनांच्या भीतीमुळे लोक घरात जीवनावश्यक सामान साठवून ठेवत आहेत, असं तेही म्हणाले. ते म्हणतात, "मी स्वत: घरच्यांसाठी खाण्याचं सामान, प्राण्यांसाठी चारा गोळा केला आहे. अनेकांनी अशी तजवीज केली आहे."

Image copyright SAMIRATMAJ MISHRA

त्याचवेळी उद्धव यांनी राम लल्लाच्या लढाईसाठी आपला दावा ठोकून विश्व हिंदू परिषदेला अडचणीत टाकलं आहे. मात्र प्रशासनाच्या मते आज होणारा विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम अधिक आव्हानात्मक आहे.

विहिंपच्या मते या कार्यक्रमाला दोन लाखांपेक्षा अधिक लोक येतील. मात्र नक्की किती लोक येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)