'...नाहीतर लोकच राम मंदिर बांधतील'- रामदेव बाबा #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. '...तर लोकच राम मंदिर बांधतील' - रामदेव बाबा

"लोकांचा संयमाचा बांध फुटला आहे. तुम्ही राम मंदिर बांधा अन्यथा तेच बांधतील," असा विधान योगगुरू रामदेव बाबा यांनी केल्याचं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे.

"लोकांचा संयम ढासळला आहे. राम मंदिरासाठी कायदा आणा, नाहीतर राम मंदिरांचं बांधकाम लोकच त्यांच्या हाती घेतील. जर लोकांनी तसं केलं तर धार्मिक तणावाचं वातावरण तयार होईल. मला वाटतं राम मंदिरावर कुणाला आक्षेप नाही. भारतातले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वच रामाचे वंशज आहेत," असं ते म्हणाले.

तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना वाटतं की राम मंदिराच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा. "जर राम मंदिर आंदोलन पेटलं तर 1992सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणावी," असं आवाहन त्यांनी एक पत्र लिहून संयुक्त राष्ट्रांना केल्याची बातमी टाइम्स नाऊने दिली आहे.

2. कर्नाटकात बस अपघातात 24 ठार

प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस शनिवारी कालव्यात पडल्यामुळे किमान 24 जण ठार झाले आहेत. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातल्या मराडी या गावात खासगी बस कालव्यात पडली. या अपघाताचं कारण अद्याप समजलेलं नाही, असं वृत्त मिंटनं दिलं आहे.

या अपघाताचे वृत्त ऐकताच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आणि घटनास्थळाकडे रवाना झाले. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

3. TDP खासदार Y. S. चौधरी यांच्या घरावर छापा

तेलुगू देसम पक्षाचे खासदार Y. S. चौधरी यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापे मारले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशात अनाधिकृतरीत्या पैसे गुंतवण्याच्या संशयावरून हे छापे मारण्यात आल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.

चौधरी यांनी अंदाजे 5,700 कोटींचा बॅंक गैरव्यवहार केला असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. या संबंधित कागदपत्रं त्यांच्या कार्यालयातून आणि घरातून जप्त करण्यात आल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

4. मुंढेच्या बदलीवर अण्णा हजारेंची नाराजी

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. "चांगल्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या होणे म्हणजे समाज, शहर आणि राज्याचे नुकसान" असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले, असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

"चांगले काम करताना असे अधिकारी समाज आणि देशाचा विचार करतात. मात्र काही लोकांना हेच आवडत नाही. म्हणूनच चांगल्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याचे ते पुढे म्हणाले.

Image copyright facebook

तर, मुंढे यांची बदली झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. तुकाराम मुंढेंच्या समर्थकांना शिवसैनिकांच्या जल्लोषाची तक्रार पोलिसांकडे केली आहे, असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

5. फेसबुक देणार 50 लाख भारतीयांना डिजिटल साक्षरतेचे धडे

छोट्या व्यावसायिकांच्या व्यापारात आणि नफ्यात वृद्धी व्हावी म्हणून फेसबुक भारतातल्या 2021 पर्यंत 50 लाख लोकांना कौशल्य विकसनाचे धडे देणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, पुढील तीन वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागात, तसेच ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना, व्यावसायिकांना डिजिटल स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्याचा कंपनीचा मानस आहे.

फेसबुकचे सध्या दहाहून अधिक योजना भारतात कार्यरत आहेत आणि या माध्यमातून फेसबुकनं आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षण दिल्याची माहिती फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अंखी दास यांनी दिली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)