राम मंदिरसाठी कायदा करण्याची मोहन भागवत यांची विहिंपच्या मागणी

हुंकार सभा

भाजप नेते फक्त प्रचाराच्या वेळी राम राम करतात, बाकीवेळ आराम करतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत लगावला. अयोध्येतील दौरा पूर्ण करून दुपारी ते मुंबईला परतले आहेत. तर नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेची हुंकार सभा सुरू झाली आहे. या सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत. त्यांनीही मंदिर निर्मितीसाठी कायदा करावा, अशी मागणी केली. तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राम मंदिराचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी वापरत आहेत, अशी टीका केली आहे.

राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणावा, शिवसेना त्यासाठी सहकार्य करेल, अशी भूमिका त्यांनी काल अयोध्येत मांडली आहे. पहिल्या दिवशी लक्ष्मण किला इथं कलश पूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली होती. शनिवारी दिवसभरात काय काय घडलं? पाहा संपूर्ण घटनाक्रम इथे

रविवारी सकाळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब रामलला येथे दर्शन घेतलं. आज विश्व हिंदू परिषदेची 'धर्मसभा'ही अयोध्या, नागपूर आणि बेंगलुरूमध्ये होत असल्याची माहिती विहिंपच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आज अयोध्या शहरात कडक सुरक्षा व्यवस्थाही आहे.

राम मंदिर संदर्भात आज दिवसभर घडलेल्या ठळक घडामोडी अशा.

पाहा लाईव्ह अपडेटस् इथे -

सायंकाळी 5.45 वाजता : राम मंदिर निर्मितीसाठी कायदा करा - भागवत

हिंदू समाज कायद्याने चालणारा आणि सर्वांप्रति प्रेम ठेवणारा आहे. म्हणूनच या मुद्द्याला 30 वर्षं लागली आहेत. राम मंदिर प्राधान्याचा विषय नाही, असं न्यायालयाने सांगितल्यानेही विलंब होत आहे. म्हणूनच राम मंदिर निर्मितीसाठी कायदा व्हावा, अशी भूमिका भागवत यांनी मांडली. वादग्रस्त जागी जमिनीखाली मंदिर असल्याचं सिद्ध झालं आहे, असा दावाही त्यांनी केला.

"राम आणि कृष्ण समजाला जोडणारे आहेत, हिंदूंच्या भावना रामाशी जोडल्या आहेत. बाबरला मुस्लिमांसोबत जोडणे हा द्वेष पसरवण्याचा प्रकार आहे," असं ही ते म्हणाले.

सायंकाळी 16.50 : नागपूरमध्ये मोहन भागवत यांच्या उपस्थिती हुंकार सभेला सुरुवात

नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राम मंदिराच्या मुद्द्यावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही नुकतीच सुरू झाली असून सभेला सरसंघचालक मोहन भागवत, साध्वी ऋतंभरा उपस्थित आहेत.

राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका सभेत अयोध्येच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा अयोध्येची सुनावणी सुरू होती, तेव्हा काँग्रेसच्या राज्यसभेतील सदस्यांनी 2019पर्यंत सुनावणी टाळावी अशी मागणी केली होती. देशाच्या न्यायव्यवस्थेला राजकारणात ओढण उचित आहे का? जेव्हा सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती अयोध्यासारख्या गंभीर विषयावर देशाला न्याय देण्यासाठी सर्वांचा ऐकून घेणार असतात तेव्हा राज्यसभेतील काँग्रेसचे वकील न्यायमूर्तींविरोधात महभियोग आणतात."

यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल म्हणाले, "काँग्रेस किंवा भाजप या खटल्यात पक्षकार नाहीत. मी एका पक्षकाराचा प्रतिनिधी आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या कालवधीत सुप्रीम कोर्टात या खटल्यात प्रतिनिधित्व केलेलं नाही. ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी हा खटला प्राथमिकता नसल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांचं न्यायव्यवस्थेविरोधात बोलण्याचं धाडस होतं. त्यांना हा निवडणुकीचा मुद्दा करायचा आहे."

दुपारी 3.50 : उद्धव ठाकरे मुंबईला पोहोचले

उद्धव ठाकरे मुंबईला परतले असून मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं.

दुपारी 1.00 - विहिंपच्या 'धर्मसभे'ची तयारी

"अयोध्येत विहिंपच्या 'धर्मसभे'साठी लखनऊ, बाराबंकी, फैजाबाद, सीतापूर आणि नजीकच्या जिल्ह्यातून कार्यकर्ते अयोध्येत पोहोचले आहेत. रस्ते या सभेसाठी आलेल्या कार्यरर्त्यांनी खच्चून वाहत आहे, त्यामुळे ट्राफिक जाम लागला आहे," अशी माहिती बीबीसी मराठी प्रतिनिधी निरंजन छानवाल यांनी दिली.

श्रीरामाची जयघोष करणारे कार्यकर्ते मधूनच 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देत आहेत. एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून शिव्यांसारखी घोषणाही ऐकायला मिळाल्यात. काहींच्या हातात त्रिशूलही दिसले, असंही छानवाल यांनी सांगितलं.

दुपारी 12.30 - शिवसैनिक परतण्याच्या तयारीत

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत आलेले शिवसैनिक महाराष्ट्राकडे रवाना होत आहेत. नाशिकसाठी एक रेल्वे काल रात्री 10 वाजता निघाली असून ठाण्यासाठी आज 4 वाजता एक रेल्वे निघेल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.


सकाळी 11.45 वाजता - बाबरीचे पक्षकार काय म्हणतात?

कोर्टात चालू असलेल्या या प्रकरणाच्या खटल्याचे एक पक्षकार असलेले मो. इकबाल अंसारी यांना अयोध्येच्या आंदोलनांविषयी विचारल्यावर ते सांगतात की गेल्या 70 वर्षांपासून अयोध्येचा खटला सुरू आहे.  यात आठ पक्षकार हिंदूची बाजू मांडत आहेत तर तीन पक्षकार मुस्लिमांची बाजू मांडत आहेत.

"हिंदू-मुस्लीम पक्षकारांनी एकत्र चर्चा करून हा मुद्दा निकाली काढावा. हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य राहिल, असं आम्ही अनेकदा म्हटलं आहे. राष्ट्रपतींना तसं निवेदनही दिलं आहे. तरीसुद्धा आज अयोध्येत गर्दी करण्यात आली आहे. 

राजकारणामुळे इतके दिवस हे प्रकरण लटकत राहिलं.  सरकारनं यावर लवकर तोडगा काढावी, हीच आमची इच्छा आहे. 


सकाळी 11.30 वाजता - मंदिराची निर्मिती न होणं हिंदूंवर अन्याय - केशव उपाध्ये यांचं

"अनेक वेळा संधी आली पण चर्चा पुढे गेली नाही. 1992 नंतर दोन्ही गट चर्चेसाठी सोबत येऊ लागले, पण नंतर बाबरी मशीद समर्थक गटाने या चर्चेला हजर राहणं सोडलं. त्यामुळे हा मुद्दा लांबला," अशी माहिती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

"समस्त हिंदू लोकांना वाटतं मंदिराची निर्मिती न होणं हा आमच्यावर अन्याय आहे," असंही ते ABP माझाशी बोलताना म्हणाले.


सकाळी 11 वाजता - ठाकरे कुटुंब मुंबईला रवाना

पत्रकार परिषदेनंतर ठाकरे कुटुंबाची मुंबईला परतण्याची तयारी


सकाळी 10.40 वाजता - शिवसेनेची पत्रकार परिषद

'रामलला मंदिराच्या' दर्शनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या संवादातले प्रमुख मुद्दे -

  • निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा नेहमी येतो. पण निवडणूक झाल्यावर सर्वजण विसरतात. राम मंदिराचं निर्माण न होणं हे दुःख दायक आहे
  • एक अध्यादेश आणा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबतच आहोत. हिंदूंच्या भावनासोबत खेळणं थांबवा.
  • अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं की हिंदू हे आता मार खाणार नाहीत. आता ती परिस्थिती नाही की हिंदूंना कुणी त्रास देईल. इतका आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे.
  • भाजपच्या जाहीरनाम्यात हा उल्लेख आहे की राज्यघटनेच्या कक्षेत राम मंदिराच्या निर्माणाच्या दिशेने प्रयत्न केला जाईल. पण त्या वचनाचं काय झालं? जर तुमच्याकडून मंदिर बांधणं होत नसेल तर जाहीर सांगा की हा एक निवडणुकीसाठी 'जुमला' होता.
  • सरकारनं नोटाबंदीच्या वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला नाही. मग आता कशाची वाट पाहत आहेत?
  • 'प्रचाराच्या वेळी रामराम, नंतर फक्त आराम,' असं सरकार करत आहे.

सकाळी 10.30 वाजता - सुरक्षेच्या प्रश्नावरून अखिलेश विरुद्ध V. K. सिंह

"विहिंपच्या 'धर्मसभे'च्या आयोजनामुळे अयोध्येत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अयोध्येत लष्कर आणा," अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली होतं.

त्याला परराष्ट्र राज्यमंत्री V. K. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भाजपचं सरकार हे इतर पक्षांच्या सरकारप्रमाणे नाही. मला खात्री आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही," असं V. K. सिंह यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

सकाळी 10 वाजता - नागपुरातही विहिंपची हुंकार रॅली

Image copyright Surbhi Shirpurkar
प्रतिमा मथळा विश्व हिंदू परिषदेची नागपूर येथील हुंकार रॅली

राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेने अयोध्येसह नागपूर आणि बंगळुरूमध्ये तीन धर्मसभांचं आयोजन केलं आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या साध्वी ऋतुंभरा देवी या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती नागपूरहून पत्रकार सुरभी शिरपूरकर यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी विहिंपने कुठल्याही राजकीय पक्षाला निमंत्रित केलेलं नाही. "पण ज्या भाजप आमदारांना असं वाटतं की राम मंदिर व्हावं ते नेते या कार्यक्रमात येऊ शकतात," असं विहिंपनं जाहीर केलं आहे.


सकाळी 9.30 वाजता - हनुमान गढीच्या प्रवेशद्वारावर गर्दी


सकाळी 7 वाजता - लोकांची गर्दी करण्यास सुरुवात

लोकांनी पहाटेपासूनच अयोध्येत येण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निरंजन छानवाल यांनी अयोध्येहून दिली.

प्रतिमा मथळा सुरक्षा बंदोबस्त

या 'धर्मसभे'साठी हजारो लोक येणार असल्याचा दावा विहिंपने केला आहे.

शहरात कडक बंदोबस्त असून अतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 काँन्स्टेबल, पीएसीच्या 42 तसंच आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)