जेव्हा मेरी कोमला सुंदर मुलींना ठोसा मारायला नको वाटायचं...

मेरी कोम, बॉक्सिंग, मणिपूर, खेळ Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरी मार्गदर्शन करताना

मणिपूर राज्यातल्या छोट्याशा गावातल्या बॉक्सिंगपटू मेरी कोमची कहाणी विलक्षण अशी. खेळ दूर, दररोज जगण्याचा संघर्ष पेलणाऱ्या मेरीने समाजातील साचेबद्ध प्रतिमांना छेद देत पुरुषबहुल खेळात प्रवेश केला. नैसर्गिक नैपुण्याला प्रचंड मेहनतीची जोड देत मेरीने लोकल ते ग्लोबल अशी दमदार भरारी घेतली. मेरीचा प्रवास दंतकथा वाटावी असाच काहीसा. तीन लेकरांची आई असणाऱ्या 35 वर्षीय मेरीने शनिवारी राजधानी दिल्लीत सहाव्या विक्रमी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ऑलिम्पक पदकासह 6 विश्वविजेतेपदं, 2 आशियाई स्पर्धांची जेतेपदं, 5 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदांसह राष्ट्रकुल स्पर्धेचं जेतेपद असा भरभक्कम ऐवज मेरीच्या नावावर आहे. बॉक्सिंग हेच आयुष्य असलेल्या मेरीचं माणूसपण उलगडण्याचा हा प्रयत्न.

जगण्याचा लढा

मेरीचा जन्म मणिपूरमधल्या चुराचंदपूर जिल्ह्यातल्या कांगथेई गावी झाला. मणिपूरची राजधानी इंफाळपासून हे गाव साधारण शंभर किलोमीटरवर वसलेलं. भारताच्या नकाशात मणिपूरचंच अस्तित्व एका टिंबाएवढं आहे. या मणिपूरमधल्या एका टिकलीएवढ्या गावात मँगटे टोन्पा कोम आणि मँगन्टे अखाम कोम या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या मेरीचा जगण्याचाच संघर्ष खडतर असा होता. आईवडील दोघेही शेतमजुरी करून पोट भरणारे. मेरीची भावंडं आणि ते दोघे मिळून पसारा पाच माणसांचा. हातातोंडाची गाठ पडण्याचीही मारामार होती. मेरीचे बाबा बॉक्सिंग खेळायचे पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये बॉक्सिंग मागे पडलं.

काटक शरीरयष्टीची मेरी शाळेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, रनिंग अशा सगळ्याच खेळांमध्ये अग्रेसर असे. पण बॉक्सिंग हे पहिलं प्रेम वगैरे नव्हतं. पण मणिपूरच्याच डिंको सिंग या बॉक्सरने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाने मेरीला खुणावलं. छोट्या गावात तसंच अनाथालयात वाढलेल्या डिंको यांनी 1998 मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. या क्षणाने मेरीच्या डोक्यात बॉक्सिंग पक्कं झालं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक विजयानंतर मेरी

बॉक्सिंग किटची वानवा

"मेरी पहिल्यांदा ट्रेनिंगसाठी आली तेव्हा तिचे कपडे विरलेले होते. बॉक्सिंग किट वगैरेचा प्रश्नच नव्हता. तिच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. ती अगदी वेळेवर येत असे आणि प्रचंड मेहनत करत असे. तिचा दृढनिश्चय कमालीचा होता. अन्य बॉक्सर्सच्या तुलनेत मेरी वेगळी भासत असे," असं तिचे पहिले कोच कोसाना मेईतेई सांगतात.

प्रगत प्रशिक्षणासाठी गाठलं इंफाळ

गावी राहून व्यावसायिक पातळी गाठणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर मेरीला मणिपूरची राजधानी इंफाळमधल्या स्पोर्ट्स अकादमीत दाखल करण्यात आलं. तेव्हा मेरी पंधरा वर्षांची होती. मात्र तेव्हा महिला बॉक्सिंगला अधिकृत तत्त्वावर मान्यताच नव्हती म्हणून अकादमीत जनरल अॅथलिट म्हणून मेरीची नोंद करण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरी कोम सरावादरम्यान

अॅथलेटिक्सच्या बरोबरीने ती बॉक्सिंगचा सराव करत असे. अवघ्या तीन महिन्यांत मेरीने मिळवलेला एक विजय चांगलाच गाजला. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये मेरीचे फोटो झळकले. तिच्या घरच्यांना याची कल्पना नव्हती. आपल्या समाजातली कोण ही मुलगी असा विचार करत असतानाच त्यांनी पेपर पाहिला आणि त्यांना सुखद धक्का बसला.

बॉक्सिंगने चेहरा खराब होईल आणि लग्न होणार नाही म्हणून होता विरोध

मेरीचे वडील स्वत: बॉक्सर होते. या खेळातल्या खाचाखोचा त्यांना ठाऊक होत्या. बॉक्सिंगमध्ये दुखापतींची शक्यता असते. मेरीने बॉक्सिंग स्वीकारलं आणि पुढेमागे खेळताना चेहऱ्याला लागलं, जखम झाली तर तिचं लग्न होणार नाही अशी भीती वडिलांना होती. म्हणूनच सुरुवातीला मेरीच्या बॉक्सिंगला त्यांचा पाठिंबा नव्हता. पण मेरीचा दमदार खेळ आणि आत्मविश्वास पाहून त्यांनी होकार दिला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरी कोम मुलांसमवेत

साथीदार मिळाला

स्थानिक, राष्ट्रीय पातळीवर मेरीची घोडदौड सुरू असतानाच मेरीला हक्काचा साथीदार मिळाला. मेरीवर मनापासून प्रेम करणारा आणि तिच्या करीअरसाठी सर्वतोपरी साथ देणारा करोंग ओंखलोर कोम यांची भूमिका मोलाची आहे. मेरी सातत्याने स्पर्धा, सराव, प्रवास यामध्ये व्यग्र् असताना घर, मुलं यांची काळजी मेरीचा नवरा घेतो. ते मेरीचे मॅनेजर आणि मेंटॉर दोन्ही आहेत. बॉक्सिंग स्पर्धेत मेरी खेळत असताना मितभाषी ओखलर दृष्टीस पडतात.

मी भारतीय आहे

मणिपूर राज्याची एक सीमा म्यानमारला लागून आहे. इथल्या मंडळींचे चेहरेपट्टी थोडी वेगळी आहे. मेरीने सुरुवातीला खेळायला सुरुवात केली तेव्हा आपल्याच देशातली मंडळी तिला जपान, थायलंड, चीन इथली खेळाडू आहे असं समजत. 'मणिपूर भारतात आहे आणि मी पक्की भारतीय आहे,' असं मेरी ठामपणे सांगते. माझ्या निमित्ताने नॉर्थइस्ट अर्थात पूर्वांचलाची बाकी भारताला ओळख झाली असं मेरी सांगते.

सुंदर मुलींना ठोसा मारायला नको वाटतं

मुळातच बॉक्सिंग हा पुरुषप्रधान खेळ. महिला त्याकडे अभावनेच वळतात. असं समीकरण असल्याने मेरी कारकीर्दीत सुरुवातीला पुरुष बॉक्सिंपटूंबरोबर सराव करत असे. व्यावसायिक पातळीवर महिला बॉक्सिंगला मान्यता मिळाल्यानंतर मेरी महिला खेळाडूंबरोबर खेळू लागली. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडू सुंदर आणि गोड चेहऱ्याची असेल तर ठोसा मारायला तिला भीती वाटायची. "एखादा वर्मी घाव बसला तर तिचा चेहरा खराब होऊ शकतो, असं वाटून मी हळू पंच मारायचे," असं मेरी सांगते. मात्र नंतर हा खेळ आहे आणि ठोसा मारला नाही तर मॅच गमवावी लागू शकते हे लक्षात आल्यावर मेरीने सुंदर प्रतिस्पर्धींनाही जोरदार ठोसे लगावायला सुरुवात केली. मात्र आजही समोरच्याला आपल्या ठोशाने जबरी मार बसला तर मेरी हळहळते. बॉक्सिंग रिंगमध्ये त्वेषाने खेळणारी मेरी मॅच संपल्यावर प्रतिस्पर्धी खेळाडूची विचारपूस करते. जोरदार ठोशासाठी माफीही मागते. "कोणाला लागलं, वेदना होत असतील तर वाईट वाटणं साहजिक नाही का?" असा सवाल मेरी करते.

टॉमबॉय नाही

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरीची एक प्रसन्नमुद्रा

"बॉक्सिंगसारख्या पुरुषबहुल खेळात असूनही मी टॉमबॉय नाही, मला बायकांसारखंच शॉपिंग करायला आवडतं असं मेरी आवर्जून सांगते. मला नटायला आवडतं. वेगवेगळे ड्रेस ट्राय करायला आवडतात. शॉपिंगला गेल्यावर दुकानदाराशी दरावरून घासाघीस करायला आवडते. महिला म्हणून असलेली ओळख महत्त्वाची वाटते," असं मेरी सांगते.

धार्मिक मेरी

बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना जोरदार ठोसे लगावणारी मेरी धार्मिक आहे. ती सांगते, "मॅचपूर्वी मी प्रार्थना करते. माझी देवावर श्रद्धा आहे. तोच मला बळ देतो. रिंगमध्ये उतरल्यावर लढाई माझी एकटीची असते. कुटुंबीयांचा पाठिंबा आहे, कोचचं मार्गदर्शन आहे पण खेळायचं मला आहे. दुसरं कोणीही मदतीला येणार नसतं. आरपारची लढाई असते. या लढाईसाठी बळ मिळावं यासाठी प्रार्थना करते. डेव्हिड आणि गॉलिथची गोष्ट मला आपलीशी वाटते. मी एका छोट्या राज्याचं प्रतिनिधित्व करते. मी स्वत: छोट्या चणीची आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडू धिप्पाड असते. त्यांच्या नावाला वलय असतं. पण डेव्हिडप्रमाणे मी बाजी मारते. मी बॉक्सिंगला खेळायला सुरुवात केली तेव्हा लोकांना वेगळंच वाटायचं. पण मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. जगण्याचा संघर्ष प्रबळ असताना बॉक्सिंग माझं आयुष्य झालं."

बॉक्सिंगमुळेच विनयभंग टळला

सहावेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या विक्रमी मेरीला कारकीर्दीत सुरुवातीला एक स्त्री म्हणून कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. "मणिपुरी पद्धतीचा पायघोळ घागरा घालून मी रिक्षातून चालले होते. मी एकटी असल्याचं पाहून रिक्षावाल्याने आडवाडेचा रस्ता निवडला. वर्दळ नसल्याचं पाहून त्याने शाब्दिक छेडछाड करायला सुरुवात केली. माझ्या बॉक्सिंगने त्याला इंगा दाखवला. त्यावेळी बाजूने दोन फुटबॉलपटू जात होते. त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी मदत केली," असं मेरी सांगते. मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे,बॉक्सिंग किंवा मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यावं असंही मेरीला वाटतं.

ऑलिम्पिक पदकाने बदललं आयुष्य

विश्वविजेतेपदाने बॉक्सिंग वर्तुळात मेरीचं नाव दुमदुमलं होतं. लंडन ऑलिम्पिकमधल्या पदकाने मेरीचं आयुष्यच बदललं. देशवासियांना मेरीची महती उमगली. माध्यमांद्वारे तिचा संघर्ष टिपला गेला. अनेकींसाठी मेरी प्रेरणास्थान झाली. मेरीवर बक्षीसांचा वर्षाव झाला. खेळासाठी उपयुक्त ठरतील असे प्रायोजक मिळाले. मणिपूरची मेरी आता समस्त भारतवासीयांची मेरी झाली होती.

मेरी कोम अकादमी

स्वत:पुरतं मर्यादित न राहता भविष्यात बॉक्सिंगपटू घडवण्यासाठी मेरीने बॉक्सिंग अकादमीची स्थापना केली. मणिपूरमध्येच लांगोल डोंगराच्या पायथ्याशी वसलेली ही अकादमी साडेतीन एकर परिसरात पसरली आहे. या अकादमीत सुसज्ज व्यायामशाळा असून, सरकारने या अकादमीसाठी मेरीला जमीन दिली आहे. या निवासी अकादमीत 45 युवा बॉक्सिंगपटू सराव करतात. अकादमी मेरी कोम रिजनल बॉक्सिंग फाऊंडेशनचा भाग आहे. आता ही अकादमी साई अर्थात स्पोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडियाचं एक्स्टेंशन सेंटर आहे.

मेरीच्या आयुष्यावर चित्रपटही, आत्मचरित्रही

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरी कोम चित्रपटात प्रियंका चोप्राने मेरीची भूमिका साकारली होती.

'अनब्रेकेबल' नावाने मेरीचं आत्मचरित्र 2013 मध्ये प्रसिद्ध झालं. मेरी आणि दिना सर्तो यांनी एकत्रित हे लिहिलं आहे. मेरीचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं हे लक्षात घेऊन तिच्या आयुष्यावर बेतलेला 'मेरी कोम' हा चित्रपट तयार करण्यात आला. ओमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, प्रियंका चोप्राने मेरीची भूमिका साकारली आहे.

राज्यसभा सदस्य

दोन वर्षांपूर्वी मेरीची राज्यसभा सदस्य म्हणून शिफारस करण्यात आली. 25 एप्रिल 2016 रोजी मेरीने राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. 2017 मध्ये युवक आणि क्रीडा मंत्रालयाने मेरी कोमची बॉक्सिंग खेळासाठीची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)