ग्रीन-टी पिणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - ग्रीन टी पिताय, जरा जपून

जे लोक कप बशीत चहा प्यायचे, त्यांनी निरोगी आरोग्याच्या नावाखाली ग्रीन-टी प्यायला सुरुवात केली. चहाच्या फुरक्यांची जागा ग्रीन टीच्या 'सिप'ने घेतली.

ग्रीन-टीचे इतके गोडवे ऐकू येऊ लागले की लोकांना चांगल्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं वाटू लागलं. अनेकांच्या घरात साखर आणि दूध यायचं कमी होत गेलं. पण नामांकित आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मात्र या सवयीवर बोट ठेवलं आहे.

करीना कपूर, आलिया भट आणि इतर सेलेब्रिटी लोकांना ऋजुता फिटनेस आणि आहाराविषयी मार्गदर्शन करतात. नुकताच त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऋजुता म्हणतात, "ग्रीन-टीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्याचा लाभ होतो. तुमच्या आरोग्यासाठी, पुरेशा अँटी-ऑक्सिडंटसाठी आणि सुंदरतेसाठी आलं घालून केलेला कडक चहाच उत्तम आहे."

Image copyright Instagram

ऋजुता यांच्या व्हीडिओचा एक परिणाम झाला - त्याने लोकांना गोंधळात टाकलं.

ग्रीन-टीचा इतिहास काय आहे?

ग्रीन टीचा इतिहास 5 हजार वर्षं जुना आहे. चीनमध्ये त्याचा सर्वप्रथम वापर होऊ लागला.

Image copyright Alamy

चहा कोणताही असो, मग तो ग्रीन टी असेल किंवा ब्लॅक टी असेल, त्याची झाडं कोणत्या वातावरणात उगवली, त्याची पानं कशी निवडली, त्याच्यावर प्रक्रिया कशी केली, यावर त्या चहाचे गुणधर्म ठरतात.

ग्रीन-टी कसा तयार होतो?

ग्रीन-टीसाठी त्याची झाडे सावलीत उगवावी लागतत, ज्यामुळे कमी सूर्यप्रकाशात ते जास्तीत जास्त क्लोरोफिल उत्पादित करू शकतील. कमी सूर्यप्रकाशामुळे चहाच्या पानात कमी पॉलीफिनॉल नावाचं केमिकल तयार होतं, त्यामुळे चहाला थोडी कडवट चव येते.

चहाची पाने आणि कळ्या तोडून त्या वाळवल्या जातात. कोणत्या प्रकारचा चहा हवा, त्याप्रमाणे ही पानं वाळवली जातात. ग्रीन-टीसाठी ही पाने केवळ एक दिवसच सुकवली जातात आणि वाफेवर शिजवली जातात.

तीच पान आणखी काही दिवस वाळवली आण वाफेवर शिजवली की त्यापासून ब्लॅक-टी म्हणजे कोरा / काळा चहा बनतो. जगात सर्वांत जास्त हा चहा प्यायला जातो. एकूण चहाच्या प्रमाणात याचं प्रमाण सुमारे 78 टक्के आहे.

Image copyright SPL

ग्रीन-टीमध्ये कोणते घटक असतात?

यामध्ये 15 टक्के प्रोटीन, 4 टक्के अमिनो अॅसिड, 26 टक्के फायबर, 7 टक्के कार्बोहायड्रेट, 7 टक्के लिपिड, 2 टक्के पिग्मेंट्स, 5 टक्के मिनरल्स, 30 टक्के फेनॉलिक कंपाउंड्स असतात. हे प्रमाण सुक्या चहामधलं आहे.

या आकड्यांवरून ग्रीन-टी धोकादायक असं सांगणं अवघड आहे. पण काही संशोधनानुसार ग्रीन-टीचे काही अपाय दिसून आले आहेत. हे अपाय ग्रीन-टीच्या प्रमाणावर ठरतात.

वेबमेडच्या या वेबसाइटनुसार ग्रीन-टी पिणं सुरक्षित आहे. पण ग्रीन-टी प्यायल्याने काही लोकांना पोटाचा त्रास झाल्याचं काही संशोधनात दिसून आलं आहे. काहींना यकृत आणि किडनीचा त्रास होऊ लागला.

या वेबसाइटनुसार अधिक प्रमाणात ग्रीन-टी घेतल्यानंतर त्याचा त्रास होऊ शकतो. हे नुकसान चहामधल्या कॅफिनमुळे होतं. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, उल्टी, डायरिया असे प्रकार होतात.

ज्यांना अॅनिमियाचा आजार आहे, त्यांनी ग्रीन-टी पिताना काळजी घ्यायला पाहिजे. तसंच काहींना anxiety disorder, blood disorder, हृदयविकार, डायबेटीसचा प्रकार असेल तर त्यांनी अगदी संतुलित प्रमाणाताच ग्रीन टी प्यायला पाहिजे.

ग्रीन-टीमध्ये कॅफिन कसं काय?

बीबीसी गुडफूडनुसार ग्रीन-टीमध्ये कॅफिन असतं. पण प्रत्येक ब्रँडनुसार त्याचं प्रमाण कमी-अधिक असतं. कॉफीपेक्षा यामध्ये कॅफिनचं प्रमाण खूप कमी असतं. ग्रीन-टी पिणाऱ्यांना यामुळे असं वाटतं की त्यांची ऊर्जा वाढतेय, कामात, अभ्यासात लक्षं लागतंय, फ्रेश वाटतंय.

पण सगळ्यांनाच असा अनुभव येईल, असं नाही. जर तुमचं शरीर कॅफिनबाबत संवेदशील असेल तर तुम्ही ग्रीन-टी संतुलित प्रमाणात प्यावा, असा सल्ला दिला जातो.

ग्रीन-टीच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. इतर चहांप्रमाणे ग्रीन टीमध्येही टॅनिन असते. टॅनिन शरीरातल्या लोहाला प्रभावित करतं. जर तुम्ही जास्त लोहयुक्त पदार्थ खात असाल तर त्यादरम्यान ग्रीन-टी पिऊ नये, असा सल्ला दिला जातो.

ग्रीन-टीचा वाईट परिणाम झाला, अशी खूपच कमी उदाहरणं आहेत. पण जीम मॅकेन्ट्स यांची कहानी काहीशी भीतीदायक आहे.

Image copyright JIM MCCANTS

जीम ग्रीन-टीच्या गोळ्या घ्यायचे. आरोग्य चांगलं राहील या विचाराने जीम यांनी त्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती. पण काही दिवसानंतर डॉक्टरांनी त्यांना त्याचं यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रांसप्लांट) करावं लागेल, असं सांगितलं.

'ग्रीन टी सर्वस्वी धोकादायक नाही'

दिल्लीतल्या फोर्टीस हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ सिमरन सांगतात की त्या ऋजुता यांच्या दाव्यावर त्या 100 टक्के सहमत नाहीत. ग्रीन टीचं एक वेगळं विश्व आहे. त्याची एक ठराविक रेसिपी नाहीये. जिंजर ग्रीन टी, तुलसी ग्रीन टी असे अनेक प्रकार आहेत.

"जर तुम्ही ग्रीन टी योग्य प्रमाणात घेत असाल तर त्याची भीती बाळगायचं काहीच कारण नाही. पण ग्रीन टी कशा प्रकारे घेतला जातो त्यावर त्याचा फायदा किंवा नुकसान ठरवलं जाते," असं डॉ. सिमरन सागंतात.

ग्रीन-टीचं प्रमाण आणि तो पिण्याची वेळ ठरवली नाही तर नक्कीच ते नुकसानकारक आहे, असं त्या सांगतात. जेवल्यानंतर लगेच ग्रीन-टी पिऊ नये.

त्या सांगतात, "अनेकदा भरपेट जेवण झाल्यावर माणसं ग्रीन-टी पितात. यामुळे फॅट जमा होणार नाही, असा विचार करतात. खाल्ल्यानंतर लगेचच ग्रीन-टी घेतला तर पचन व्यवस्थेवर परिणाम होतो."

सिमरन यांच्या मते दिवसातून दोन कप ग्रीन टी पिणं चालू शकतं.

काही दिवसांपूर्वीच ग्रीन-टी संदर्भात एक बाब संशोधनाद्वारे स्पष्ट झाली आहे. रक्तदाब नियंत्रणात राहावा यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा प्रभाव ग्रीन-टीमुळे कमी होतो, असं स्पष्ट झालं आहे. जपानमध्ये झालेल्या संशोधनानुसार ग्रीन-टी प्यायलानंतर काही विशेष रक्तवाहिन्यांच्या कामात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे बीटा ब्लॉकर औषधाचा प्रभाव नाहीसा होतो.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा ग्रीन टी मर्यादित प्रमाणात प्यायला तर फायदे बरेच आहेत.

अन्य तज्ज्ञ आणि संशोधनाला प्रमाण मानलं तर ग्रीन-टी एक आरोग्यदायी पेय आहे. ग्रीन टीमुळे काय फायदे होतात हे लक्षात घेऊया.

- तुम्ही ग्रीन टी पित असाल तर सांधेदुखीला दूर ठेऊ शकता.

- हृदयरोग आणि अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून वाचण्याकरता ग्रीन-टीचा उपाय सांगितला जातो.

- तुम्हाला वजन घटवायचं असेल तर ग्रीन-टी उपयुक्त ठरू शकतो.

- ग्रीन-टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याव्यतिरिक्त त्वचेलाही फायदा होतो.

हे फायदे असले तरी ग्रीन टी एका विशिष्ट मर्यादेत पिणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)