धवलक्रांतीचे जनक वर्गिस कुरियन यांनी फक्त ख्रिश्चनांना देणगी दिली?

भाजपा Image copyright Dileep Sanghani
प्रतिमा मथळा दिलीप संघानी

जर ते आज जिवंत असते ते 97 वर्षांचे असते. मात्र मृत्यूनंतर सहा वर्षांनंतर धवलक्रांतीचे जनक वर्गिस कुरियन यांचं नाव आज पुन्हा चर्चेत आहे.

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या दिलीप संघानी यांनी शनिवारी गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्य केलं. इंडियन एक्सप्रेसने दिलीप संघानी यांच्या हवाल्याने लिहिलं आहे की वर्गिस कुरियन यांनी अमूलचे पैसे गुजरातच्या डांग जिल्ह्यातल्या धर्मांतरणाच्या कार्यक्रमासाठी दिले होते.

मात्र बीबीसी प्रतिनिधी अनंत प्रकाश यांच्याशी बोलताना संघानी म्हणाले की अमरेलीच्या अमर डेअरीच्या एका कार्यक्रमात ते जे बोलले त्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

ते म्हणतात, "मी त्यांचा (वर्गिस कुरियनांचा) आदर करतो. त्यांच्या क्षमतेबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. मात्र गुजरातमधील डांग जिल्ह्यातल्या शबरीधामचं निर्माण करणारे लोक जेव्हा वर्गणीसाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा माझा या सगळ्यावर विश्वास नाही असं म्हणत त्यांनी वर्गणी दिली नाही. पण याच सुमारास त्यांनी ख्रिश्चन संस्थांना मात्र वर्गणी दिली."

भाजप नेते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे. अमूलतर्फे दिलीप संघानी यांच्या वक्तव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाही. सध्या प्रतिक्रियेची वाट पाहिली जात आहे.

वर्गिस कुरियन कोण होते?

वर्गिस कुरियनांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांना भारताच्या धवलक्रांतीचे जनकही म्हटलं जातं. कुरियन यांनी डेअरीच्या विकासाचं मॉडेल तयार केलं. त्यांच्या कामामुळेच भारत आज जगातला सगळ्यात मोठा दुग्ध उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

1973 मध्ये त्यांनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (GCMF) ची स्थापना केली आणि 34 वर्षं ते या संस्थेचे अध्यक्ष होते. याच संस्थेतर्फे अमूल या नावाखाली दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन केलं जातं.

11 हजारहून जास्त गावांमधले जवळपास 20 लाखांहून अधिक शेतकरी सदस्य असलेल्या या संस्थेने दुध आणि अन्य उत्पादनांच्या बाबतीत इतिहास रचला आहे.

Image copyright Getty Images

कुरियन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच त्यांना 1965 मध्ये मॅगेसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

वर्गिस कुरियन आणंद येथील Institute of Rural Management (IRMA) चे अध्यक्ष होते. त्यांना 'भारताचा मिल्कमॅन' असंही म्हटलं जातं.

जेव्हा भारतात दुधाचा तुटवडा होता तेव्हा कुरियन यांच्या नेतृत्वाखाली दुग्धउत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दिशेने काम सुरू झालं. नव्वदचं दशक जवळ येता येता दुग्धउत्पादनात भारताने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं.

वर्गणीचा वाद

मात्र ख्रिश्चन संस्थांना वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्याने वर्गिस कुरियन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पण कोणालाही वर्गणी देणं हा विशेषाधिकाराचा प्रश्न आहे.

यावर दिलीप संघानी म्हणतात, "हिंदूंची एक संस्था शबरीधाम बांधत होती. त्यावेळेस निर्माणकर्त्यांनी कुरियन यांच्याकडे वर्गणी मागितली. पण आपला या गोष्टींवर विश्वास नाही असं म्हणत त्यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. जर त्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता मग त्यांनी कुणालाच वर्गणी द्यायची नव्हती. तेच योग्य ठरलं असतं. एकाला देऊन दुसऱ्याला दयायची नाही याला काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टींची नोंद आहे."

Image copyright NurPhoto

स्वतः मंत्री असताना संघानी यांनी या मुद्द्यावर काय केलं या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. आमच्या चौकशीत असं समोर आलं की, त्यांनी शबरीधामला वर्गणी देण्यास नकार दिला होता. मात्र ख्रिश्चन मिशनरीजला वर्गणी दिली. खरंतर सरकार या प्रकरणी काहीच करू शकत नाही."

ऐतिहासिक राजीनामा

भाजपा नेत्याचं असंही म्हणणं आहे की कुरियन चुकीच्या पद्धतीने 15 वर्षं को ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष होते.

2006 मध्ये प्रतिकुल परिस्थितीत त्यांना अमूलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यावेळी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते की गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या सदस्य असणाऱ्या सहकारी समित्यांचा विश्वास गमावल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता.

वर्गिस कुरियन यांच्या विरोधात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला होता. संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)