किती काळा पैसा विदेशातून आणला हे सांगण्यास PMO चा नकार : #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. किती काळा पैसा विदेशातून आणला हे सांगण्यास PMO चा नकार

केंद्रीय माहिती आयोगाने आदेश देऊनही विदेशातून किती काळा पैसा भारतात परत आणला याची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

किती काळा पैसा भारतात परत आणण्यात आला आहे याची माहिती संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला मागितली होती. ही माहिती पुरवण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला. त्यानंतर ते माहिती आयोगाकडे गेले. चतुर्वेदी यांनी मागितलेली माहिती देण्यात यावी असा आदेश आयोगाने दिला. या आदेशानंतरही पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्यास नकार दिला आहे.

ही माहिती उघड केल्याने देशाच्या सुरक्षेस धोका पोहचू शकतो, त्यामुळे ही माहिती देता येणार नाही असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं.

2. हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे २० ट्रेकर्स अडकले

अकोले तालुक्यात हरिश्चंद्र गडावर कल्याण येथील २० ट्रेकर्स अडकले आहेत. हे ट्रेकर्स उतरताना रस्ता चुकल्याने अडकले आहेत. अडकलेल्या पर्यटकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधल्याने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रात्र असल्याने मदतकार्यात अडथळे येतील म्हणून सकाळी ठाण्याच्या प्रशिक्षित गिर्यारोहकांकडून शोध घेतला जाईल अशी माहिती महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे एक हजार फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी NDRFची मदतही घेण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

3. मुत्तेमवारांनी मोदींच्या वडिलांबाबत भाष्य केल्यामुळे गदारोळ

काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांबाबत भाष्य केल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांच्या वडिलांबाबतही कुणाला माहीत नव्हतं. राहुल गांधी यांच्या वडिलांबाबतची माहिती मात्र सर्वांकडे आहे अशा आशयाचं विधान त्यांनी केलं असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

या विधानाला पंतप्रधानांनी उत्तर दिलं आहे. माझ्या दिवंगत वडिलांना राजकारणात ओढयाची गरज काय असा सवाल मोदी यांनी केला आहे.

4. काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सात कट्टरवादी ठार

लष्कर आणि कट्टरवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात कट्टरवादी ठार झाल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकी झाल्या.

प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

15 नोव्हेंबरपासून इथे झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण 29 नागरिक आणि 19 कट्टरवादी ठार झाले आहेत.

शोपियान येथे झालेल्या चकमकीत भारताच्या एका जवानाचा मृत्यू झाला. 36 राष्ट्रीय रायफल्सचे नाझीर अहमद हे अत्यंत धाडसी सैनिक होते. तसेच त्यांना दोनदा सेना पदकाचा बहुमान मिळाला होता असं लष्कराधिकाऱ्यांनी सांगितलं.

5. दीपा कर्माकरला आर्टिस्टिक विश्वचषकात कांस्य पदक

जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टिस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. व्हॉल्ट प्रकारात २५ वर्षीय दीपानं १४.३१६ गुणांची कमाई करत कांस्य पदक मिळवलं, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं.

Image copyright EPA

या विजयामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या दीपाच्या आशा कायम राहिल्या आहेत. दीपाच्या गुडघ्यावर काही महिनांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर दीपानं ही नेत्रदीपक कामगिरी केलीय. ब्राझीलच्या रेबेका एंड्रेडनं सुवर्णपदक तर अमेरिकेच्या जेड कारेनं रौप्यपदक पटकावलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)