कर्तारपूर साहिब कॉरिडॉर : 'आमचे गुरू काळजी घेतील'

पंजाब Image copyright AFP

पंजाबला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या डेरा बाबा नानक शहरातून पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं भूमिपूजन झालं.

सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या शहराच्या अगदी जवळच उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांसाठी एक मोठा शामियाना उभारण्यात आला होता. तिथे या नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये सुधार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, "भारत दहशतवाद सहन करणार नाही. निरपराध लोक मरत असतील तर ते योग्य नाही. हा मार्ग नाही, हे समजून घेतलं पाहिजे."

कॅप्टन अमरिंदरसिंग

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी यावेळी पाकिस्तानच्या लष्कराला इशारा दिला. "पंजाबमध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. आम्ही कटकारस्थान खपवून घेणार नाही. अमृतसरमध्ये निष्पाप लोक मारले गेले. त्यात एक लहान मुलगा होता तर एका लहान मुलगा जखमी झाला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या लष्करावर नियंत्रण ठेवावं," असं ते म्हणाले.

जागेचं महत्त्व

कर्तारपूर गुरुद्वारा साहिब पाकिस्तानच्या भागात येतो. मात्र तो या जागेपासून साडेचार किमी अंतरावर आहे. अनेक लोक तिथे दुर्बिण घेऊन दर्शनाला येतात. या सगळ्यावर सीमा सुरक्षा दलाची करडी नजर असते. शिखांचे पहिले गुरू गुरुनानक इथे 1522मध्ये आले. तिथे त्यांनी जमिनीचा विकास केला. तिथेच त्यांचे निधन झाले.

कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिबला मोठं महत्त्व आहे. याशिवाय पाकिस्तानात डेरा साहिब लाहोर, पंजा साहिब आणि ननकान साहिब ही धार्मिक स्थळं शीख समाजासाठी महत्त्वाची आहेत.

कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहेबमध्ये एक विहीर आहे. ही विहीर गुरुनानक यांच्या काळापासून इथं असल्याचं सांगितलं जातं. या विहिरीलाही मोठं महत्त्व आहे. इथं सेवेसाठी मुस्लीम आणि शीख दोन्ही समाजांचे लोक सहभागी असतात.

रावी नदीला आलेल्या पुराने या गुरुद्वाऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. 1920-1929 या कालावधीत महाराजा पटियाला यांनी या गुरुद्वाऱ्याची डागडुजी केली. त्यासाठी 1 लाख 35 हजार रुपये खर्च आला होता. भारत-पाकिस्तान फाळणीत हा गुरुद्वार पाकिस्तानच्या हद्दीत गेला. 1995ला पाकिस्तानने या गुरुद्वाऱ्यातील काही भागाचं पुनर्निर्माण केलं.

करतारपूर साहेबसंदर्भात 1998ला भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली होती. 20 वर्षांनंतर या संदर्भात पहिल्यांदा काही ठोस पावलं उचलली गेली आहेत.

स्थानिक काय म्हणतात?

तेथील स्थानिकांमध्ये सोमवारच्या कार्यक्रमाबदद्ल तसंच शासनाच्या घोषणांबद्दल उत्सुकता होती. तिथे जागेचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे, तसंच पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे.

मात्र काही लोकांना याबाबत शंका आहे. इथल्या रहिवाशांमध्ये काळजीच वातावरणही आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवानही तिथे तैनात करण्यात आले आहेत.

त्यांच्या मते ते अधिक माहितीची वाट पाहत आहेत. "सध्या जी माहिती मिळतेय ती अर्धवट आहे. आम्हाला माहिती नाही की कुठे आणि कशा प्रकारचा कॉरिडॉर तयार होणार आहे," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. "एकदा या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली की त्याचा परिणाम कसा होतो ते कळेल," असं ते म्हणाले.

बीरा गुरुद्वाराच्या बाहेर खेळणी विकण्याचं काम करते. तिच्या मते रोज 1500 लोक या जागेला भेट देतात. मात्र जेव्हापासून ही घोषणा झाली आहे तेव्हापासून पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ झालेली नाही, असं त्यांना वाटतं.

"हे चांगलं आहे की वाईट हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे सध्या फक्त वातावरणाचा आनंद घ्यावा," असं त्या म्हणतात. दुर्बिण जिथे लावली आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या उत्साही लोकांकडे पाहून बीना बोलत होत्या.

Image copyright GURPREET/BBC

जोगिंदर सिंग शेजारच्या पाखोके गावात राहतात. तिथे त्यांचं शेत आहे. इथे बराच विकास दिसत असल्यामुळे ते देवाचे आभार मानतात. "हे एक सुचिन्ह आहे. मात्र इथे लोकांची ये-जा वाढल्यानंतर आम्हाला हाकलणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो. आमचे गुरू याची नक्कीच काळजी घेतील." ते म्हणतात.

सीमा सुरक्षा दलाच्या लोकांना वेगळीच चिंता आहे. "इथे हालचाल वाढणार म्हणजे आमची जबाबदारी वाढेल आणि आम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)