मराठा आरक्षण विधेयक 29 नोव्हेंबरला विधिमंडळात मांडलं जाणार #5मोठ्याबातम्या

मराठा आरक्षण Image copyright Hindustan Times/Getty Images

विविध वर्तमानपत्रात आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत :

1. मराठा आरक्षण विधेयक 29 नोव्हेंबरला मांडले जाणार

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये २९ नोव्हेंबरला मांडण्यात येणार आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

मराठा आरक्षणावर स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही शिफारशी समितीने स्वीकारल्या असून आयोगाच्या अहवालावर कृती अहवाल (अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट) सरकार सादर करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

विधिमंडळात सादर करायच्या मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका झाल्या. किती टक्के आरक्षण द्यायचं याचा निर्णयही ही समिती करणार आहे. विधेयकाच्या मसुद्यात काही त्रुटी असतील तर त्यावर विधिमंडळात चर्चा केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

2. छत्तीसगढमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये आठ नक्षलवादी ठार

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी आणि दोन पोलीस कर्मचारी ठार झाले.

किस्टारामच्या जंगलात ही चकमक झाल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधिक्षक अभिषेक मीना यांनी दिली आहे. हे जंगल तेलंगणाच्या सीमेवर आणि राजधानी रायपुरपासून 500 किमी अंतरावर आहे.

3.मुंबई टँकरचा स्फोट होऊन भीषण आग

मुंबईतल्या वडाळा भागात मिथेनॉल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास आयमॅक्स सिनेमाजवळ घडली. या आगीत टँकर चालकाचा मृत्यू झाला.

ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी आगीचे ५ बंब रवाना झाले. रात्री उशिरा आग विझविण्यात आली.

4.पहिली, दुसरीच्या मुलांची गृहपाठातून सुटका

पहिली आणि दुसरीतील मुलांसाठी 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून पहिली, दुसरीच्या मुलांना गृहपाठापासून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

Image copyright SOPA Images

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकानुसार, शालेय विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येणार नाही. त्याशिवाय दप्तराचं वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असणार आहे.

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हे दोनच विषय शिकवण्यात यावे, तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

5. सरकारी कार्यालयामध्ये दोन तास माहिती अधिकाराचे

माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. यापुढे दर सोमवारी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या कामकाजाचे दुपारी 3 ते 5 असे दोन तास माहिती अधिकारासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या वेळेत नागरिकांना संबंधित कार्यालयातील फायली आणि इतर कागदपत्रे प्रत्यक्ष पाहता येतील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे महापालिकेत तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी विविध विभागातील कामकाजात पारदर्शकता आणण्याबरोबरच माहिती अधिकारासाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या कमी करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)