अंदमान निकोबारच्या सेंटिनल जमातीला भेटणारे टी. एन. पंडित

टी. एन. पंडित Image copyright TN pandit

अंदमानमधल्या सेंटिनल बेटांवरील लोकांकडून काही दिवसांपूर्वी 27 वर्षीय अमेरिकन जॉन अॅलन चाऊ या तरुणाची हत्या झाल्याचा आरोप आहे. सेंटिनली लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता असं म्हटलं जात आहे.

सेंटिनल ही जमात बाहेरच्या जगाच्या संपर्कात नाही. बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येणं हे त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं असं मानववंशशास्त्रज्ज्ञ टी. एन. पंडित यांचं म्हणणं आहे. पंडित हे काही काळ सेंटिनेली जमातीसोबत राहून आले आहे. त्यांचा अनुभव त्यांनी बीबीसीला सांगितला.

सेंटिनल जमातीबदद्ल जितकी माहिती पंडित यांच्याकडे आहे कदाचित जगात इतर कुणाकडेच नसेल असं म्हटलं जातं. भारत सरकारच्या आदिवासी विभागाचे ते विभाग प्रमुख होते. आपल्या सेवेच्या काळात त्यांनी सेंटिनेल बेटाला अनेकदा भेट दिली.

असं म्हटलं जातं की गेल्या हजारो वर्षांपासून सेंटिनेल जमातीचा बाह्य जगाशी संपर्क नाही. 27 वर्षीय धर्म प्रचारकानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सेंटिनल जमातीबद्दल चर्चा सुरू झाली.

Image copyright Survival international

पंडित आपल्या स्वानुभवाने सांगतात की सेंटिनली हे शांतताप्रिय लोक आहेत. ते खूप भयानक आहेत असा लोकांचा समज आहे पण तो चुकीचा असल्याचं ते सांगतात.

"आम्ही जेव्हा त्या बेटावर गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला धमकावलं, पण आम्हाला त्रास होईल किंवा मारलं जाण्यापर्यंत स्थिती गेली नाही. जेव्हाही ते चिडले आहेत असं वाटलं तेव्हा आम्ही तिथून माघार घेतली," पंडित सांगतात.

"मला अमेरिकन तरुणाच्या मृत्यूचं दुःख आहे. पण त्याने चूक केली. स्वतःला वाचवण्याची त्याच्याकडे संधी होती. पण तो हट्टाला पेटला," ते सांगतात.

1967 साली पहिल्यांदा पंडित यांनी उत्तर सेंटिनल बेटाला भेट दिली होती. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पंडित आणि त्यांच्या समूहाला पाहिलं तेव्हा सेंटिनेल लोक जंगलात लपून बसले. नंतर त्यांनी बाण देखील मारून पाहिले, असं पंडित सांगतात.

Image copyright TN pandit

त्यांच्याशी ओळख व्हावी म्हणून पंडित यांचे सहकारी त्यांच्यासाठी वस्तू नेत असत.

"आम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू नेल्या होत्या. जसं की भांडी, तवे, शहाळे, हत्यारं, भाले आणि चाकू नेले होते. त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून आम्ही दुसऱ्या जमातीतील तीन जणांना सोबत नेलं होतं. ते ओंज या जमातीतील लोक होते. सेंटिनल काय बोलत आहेत आणि त्यांच्या वागणुकीचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांना नेलं होतं," पंडित सांगतात.

"पण आम्हाला पाहून त्यांनी त्यांचे भाले आणि धनुष्य-बाण तयार ठेवले. आपल्या जमिनीचं रक्षण करण्यासाठी ते तत्पर होते. आम्ही नेलेल्या वस्तू तिथेच ठेवल्या आणि परतलो. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर 1991मध्ये ते आमच्याजवळ आले," ते पुढे सांगतात.

Image copyright Instagram/john chau

"आम्हाला भेटायला ते का तयार झाले हे कोडं आम्हाला पडलं. पण ते भेटले. ही भेट पूर्णतः त्यांनी जसं ठरवलं त्याप्रमाणे झाली. आम्ही आमच्या बोटीतून बाहेर पडलो आणि गळ्यापर्यंत असलेल्या पाण्यात उतरलो. आम्ही त्यांना नारळं आणि भेटवस्तू दिल्या.

"त्या वस्तू देता देता मी माझ्या सहकाऱ्यांपासून वेगळा झालो. तिथं एक तरुण सेंटिनल आला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचित्र चेहरा बनवला आणि त्याच्याजवळ असलेला चाकू त्याने स्वतःच्या गळ्याजवळ नेला आणि कापण्याचा इशारा केला. तेव्हाच मी समजलो की आपलं तो स्वागत करत नाहीये. त्यानंतर आम्ही तिथून निघालो," पंडित सांगतात.

"त्यानंतर भारत सरकारनं त्यांना भेटवस्तू पाठवणं बंद केलं. तसंच इतर लोकांना तिथं जाण्यावर बंदी घातली. जर बाहेरचे लोक त्यांच्या संपर्कात आले तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. ताप किंवा गोवरसारख्या आजराशी लढता येईल इतकी रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्याकडे नाही.

"त्यांच्याकडे जाण्यापूर्वी सर्व सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच त्यांना तिथं नेलं जात असे," अशी माहिती पंडित देतात.

अमेरिकन तरुण चाऊने तिथं जाण्यासाठी परवानगी घेतली नव्हती. स्थानिक मासेमाराला 25,000 रुपये देऊन तो तिथं गेला आणि त्याने त्यांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

त्या तरुणाचा मृतदेह परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेंटिनल जमात ही शांतताप्रिय आहे आणि त्यांना इतरांना इजा पोहोचवण्याची इच्छा नसते असं पंडित सांगतात. ते म्हणतात "आपणच त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी करत आहोत."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
अंदमान : अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा संशय असलेली सेंटिनल जमात कोण?

"ते कधीही बाजूच्या क्षेत्रात आक्रमण करत नाहीत किंवा तिथं जाऊन उच्छाद मांडत नाहीत," असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.

"जर त्यांना भेटवस्तू दिल्या आणि त्यांची इच्छा असली तर आपल्याला अमेरिकन धर्मप्रचारकाचा मृतदेह परत आणता येईल," असं पंडित सांगतात.

"त्यांना सर्व जगापासून अलिप्त राहण्याची त्यांची इच्छा असेल तर आपण त्याचा सन्मान करायला हवा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)