काँग्रेस, भाजप नेत्यांची राजस्थान विधानसभा निवडणुकीत का खालावतेय भाषा?

Dr. C.P. Joshi Image copyright Twitter/Dr. C.P. Joshi

राजस्थानात राजकारणाची भाषा दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे सत्तारुढ भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही पक्षांनी यासाठी एकमेकांना जबाबदार ठरवलं आहे.

समाजशास्त्रांच्या मते सध्याच्या राजकारणाच्या भाषेमुळे समाजात भय आणि आक्रमकतेचं वातावरण आहे. या वृत्तीमुळे मॉब लिंचिंगसारख्या घटना घडतात.

राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करणाच्या प्रयत्नात असलेल्या महिलांच्या मते भाषेच्या मर्यादांचं जेव्हा उल्लंघन होतं तेव्हा त्याचा सगळ्यांत जास्त फटका महिलांना बसतो.

निवडणूक प्रचारादरम्यान सत्तेचे प्रबळ दावेदार असलेल्या दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिस्पर्धी पक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत तक्रार केली आहे. यापैकी काही नेत्यांकडे आयोगानं नोटीस देऊन स्पष्टीकरण मागितलं आहे. मात्र हे प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीयेत.

सत्तारुढ भाजपने या निवडणुकांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तीन आमदारांचं तिकीट कापलं. त्यातील धनसिंह रावत मंत्री आहेत तर ज्ञानदेव आहुजा आणि बनवारीलाल सिंघल अल्वर जिल्ह्यातले आमदार आहेत.

दुसरीकडे भाजपनचं अहुजा यांना पक्षात उपाध्यक्ष करत त्यांना मान परत मिळवून दिला तर राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे बाडमेरमधल्या बायतूचे आमदार कैलाश चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते त्याच्यामागे काही कारणं आहेत.

तिकीट का कापलं?

या आमदारांचं तिकीट वादग्रस्त वक्तव्यांमुळे कापलं का, असा प्रश्न आम्ही भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना विचारला.

त्रिवेदी यांनी या आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, "असं तुम्ही कसं म्हणू शकता? अहुजा यांना उपाध्यक्ष केलं. इथं मुद्दा भाषेचा नाही. कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पक्ष आपल्या सोयीनं घेतो. भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदल ही एक नियमित प्रक्रिया आहे. यापेक्षा अधिक या प्रकरणात जास्त डोकावण्याची गरज नाही."

नुकतंच काँग्रेसचे माजी मंत्री सी. पी. जोशी यांच्या भाषणावर आणि आणखी काही नेत्यांच्या वक्तव्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्याचवेळी काँग्रेसनेही भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणांवर आक्षेप घेतला आहे आणि त्यासंबंधी तक्रार केली आहे. मात्र प्रत्येक नेता वादग्रस्त वक्तव्यानंतर ते विधान चुकीच्या पद्धतीनं प्रस्तुत करण्यात आल्याचा आरोप लावतो.

काही लोकांच्या मते राजकारण सेवा आहे तर काही लोकांच्या मते राजकारण व्यापार आहे. मात्र मधूर वाणी हा व्यापाराचा गाभा आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणतात की, राजकारणात वक्तव्यांची पातळी याआधी कधीच इतकी खालावली नव्हती.

त्यासाठी ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या काळाचं उदाहरण देतात. "जेव्हा वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हाचा काळही आम्ही पाहिला आहे. तेव्हा कोणाचीच एकमेकांविरुद्ध जीभ घसरायची नाही. मात्र आता एक नवीन परंपरा समोर येते आहे. खेदाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टींना सर्वोच्च नेतृत्वाचा पाठिंबा असतो. या सरकारमध्ये असं लक्षात आलं आहे की जो असे वक्तव्य करतो त्याला पदोन्नती मिळते."

साधू संत पीर फकीर गेल्या अनेक शतकांपासून मधुर वाणीचं महत्त्व सांगतात खरं. पण राजकारणात त्याचं काय स्थान आहे? यावर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणतात, "भाषेचा स्तर योग्य ठेवणं ही सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे. जे पक्ष मोठे आहेत, त्यांची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. काँग्रेस आणि भाजप मोठे पक्ष आहे त्यामुळे त्यांची जबाबदारीही मोठी आहे."

Image copyright Facebook

त्रिवेदी यांच्या मते भाषेची खालावणारी पातळी ही काळजीची गोष्ट आहे. मात्र या सगळ्यांची सुरुवात कशी झाली असाही प्रश्न ते विचारतात. ते म्हणतात की जेव्हा उच्चपदावर बसलेले लोक खुलेआम असभ्य भाषा वापरतात तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होईल. 2007 मध्ये सोनिया गांधी नरेंद्र मोदींबद्दल काय बोलल्या होत्या ते आठवण्याचा सल्लाही ते देतात.

महिलांना लक्ष्य

शब्द हेची शस्त्र असं म्हणतात. मात्र या शस्त्राचा सातत्याने दुरुपयोग होताना दिसतोय. भाजप नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा सांगतात की, भाषेच्या घसरत्या पातळीमुळे सगळ्यांत जास्त महिला दु:खी आहेत.

त्या म्हणतात, "मी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. मात्र जे लोक लाखो मतांच्या फरकानं जिंकून येतात ते जनतेचे नेते असतात. जेव्हा मंचावर अशा भाषेचा प्रयोग होतो तेव्हा दु:ख होतं. महिलांविषयी लोक इतकं वाईट बोलतात की त्या राजकारणात कशा येतील असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमन शर्मा म्हणतात, "ज्या महिलांना असं वाटतं की त्यांची लोकसंख्या अर्धी आहे आणि ज्यांना राजकारणात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्याची इच्छा आहे त्या सध्या प्रचंड काळजीत आहेत. कारण काही जण त्यांना नाचणारी असं म्हणतात तर काही लोक अजून वेगवेगळ्या नावानं संबोधतात.

Image copyright Getty Images

समाजशास्त्रज्ञ राजीव गुप्ता म्हणतात, "अशा भाषांमुळे समाजात भीती आणि आक्रमकपणा जास्त झाला आहे. दहशतीचं वातावरणही तयार झालं आहे. अशा भाषेमुळे रस्त्यावर येऊन हिंसाचारालासुद्धा वाव मिळाला आहे.

डॉ. गुप्ता म्हणतात, "भाषेपासून सुरू झालेला हा हिंसाचार मॉब लिंचिंगपर्यंत गेला आहे. गटांमध्ये ध्रुवीकरण झालं आहे. अमेरिकेत ट्रंपसुद्धा अशाच भाषेचा वापर करत आहेत.

डॉ गुप्तांच्या मते हा सगळा प्रकार शिव्याशापांपेक्षा सुद्धा वाईट आहे कारण काही समाजात शिव्या हा संस्कृतीचा भाग आहे.

गंगेच्या घाटावर भ्रंमती करताना संत कबीर शेकडो वर्षांपूर्वी बोलून गेले आहेत, "शब्द संभाले बोलिए, शब्द के ना हाथ पांव, एक शब्द औसध करें, एक करे घाव."

आता ते राजकारणात लागू होतंय की नाही हे बघावं लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)